फलपुष्पधारिणी –
कोरवलीच्या सुरसुंदरी लेख क्र.९ –
कोरवलीच्या मंदिराच्या बाह्य भिंतीवर एकाच वेळी पुष्पाचा आणि फुलाचा सुगंध भरून टाकणारी एक अप्रतिम सुरसुन्दरी विलोभनीय पणे त्रिभंग आवस्थेत उभी आहे.डाव्या हातामध्ये पुष्प अर्थात पद्म आणि उजव्या हातात फल अर्थात फळ धारण करणारी अशी ही सुरसुंदरी म्हणूनच हिला फलपुष्पधारिणी असे म्हणावे का? हा प्रश्न निर्माण होतो.
शिल्पशास्त्राची माहिती सांगणाऱ्या ग्रंथांमध्ये बत्तीस प्रकारच्या सुरसुंदरी चा उल्लेख आढळून येतो .त्यामध्ये अशा प्रकारच्या सुरसुंदरींच्या नावाची चर्चा केली गेलेली नाही. मग हिला फलपुष्पधारिणी असे म्हणावे का? हा प्रश्न निर्माण होतो.नखशिकांत देखणी असणारी ही मदनिका जरी त्रिभंग अवस्थेत उभी असली तरीही तिची नाजूक आणि रसरशीत काया, लयबद्ध करणारी वक्रता पाहणाऱ्यांचे लक्ष वेधून घेते.
लयदार तारुण्यलतिका म्हणूनच या देवांगण एकडे पहावे लागेल. मस्तकाशी असणारे त्रि वलयांकित प्रभावलय इतर सुरसुंदरी च्या मानाने तुलनात्मक मोठे आहे. तिन्हि वलयावर कलाकाराने उभ्या रेखाकृतीची नक्षी काढलेली आहे. त्यामुळे हे प्रभाववलय प्रातःकाली उगवणाऱ्या तेजस्वी सूर्यासारखे भासते. अतिशय चित्ताकर्षक केशरचना आणि डुलणार्या कर्णभूषणामुळे फुललेले तिचे मुखकमल या प्रभवयांकित सूर्यमंडळामध्ये फार शोभून दिसते.
एकाद्या महाराणीने धारण केलेल्या मुकुटा प्रमाणे हिची केशरचना आहे. या देवांगणेच्या स्वरूपास खुलविण्यासाठी कलाकारांनी भरपूर आभूषणे आणि वस्त्र प्रावरणे तिला ल्याहायला भाग पाडलेले आहे.अशा या किंमती आभूषणावरून आणि उंची वस्त्रप्रावरणावरून त्याकाळच्या आर्थिक समृद्धीचे चित्र जसे स्पष्ट होते, तसेच शांततेचा आणि चालुक्यांच्या उत्तम प्रशासनाचा हा काळ होता हे ही लक्षात येते. तिच्या शरीरावर शोभेचे अनेक अलंकार ठसठशीत आणि उठावदारपणा कोरलेले आहेत. कंठहार, हीक्कासूत्र आणि लक्षवेधक स्तनहार तिने परिधान केलेला आहे.
स्कंदमाला, केयूर आणि कटकवलय यामुळे तिच्या दोन्ही करकमलास विलोभनीय केलेले आहे, कटी प्रदेशासाठी वापरलेले कटीसूत्र मुक्तद्दाम, उरुद्दाम आणि मधोमध झुलणारा वस्त्राचा सोगा कलाकाराने मोठ्या कौशल्याने निर्देशित केलेला आहे. दोन्ही पायांमध्ये तिने पादवलय घातल्यामुळे त्यांची ही शोभा वाढलेली आहे .अशी ही तेजस्वी, तारुण्यसुलभ स्वर्गीय अप्सरा, मोहक त्रिभंगा अवस्थेत बोलक्या डोळ्यांनी आणि हसऱ्या चेहऱ्याने कोरवलीच्या मंडोवरावर अंकित करण्यात आली आहे,(कोणत्याहि ग्रंथात ह्या सुरसुंदरीचा उल्लेख आढळून येत नाहि सुरसुंदरीचे एकूण जे ३२ प्रकार सांगितलेले आहेत त्यात हिचा कुठेहि उल्लेख नाहि.हे लेख अभ्यासकांसाठि माहितीपर आहेत.त्यामूळे इतरांनी डोक्याला त्रास न करून घेता मूर्ती वर्णनाचा अस्वाद घ्यावा)
डाॅ.धम्मपाल माशाळकर, सोलापूर