फिरंगोजी नरसाळा | संग्रामदुर्गाचा वीरपुरुष
देव देश अन् धर्मासाठी प्राण घेतले हाती !
फिरंगोजी नरसाळा हे आदिलशाही नोकरी सोडुन स्वराज्यात सामिल झालेले किल्लेदार होते.
महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले होते आणि नेमका याच गोष्टीचा फायदा घेत पुण्यात आलेल्या मोघली सरदार शाहिस्तेखान याने महाराजांचा मुलुख जिंकण्यासाठी मोहिमा काढल्या. पुणे- नाशिक वाटेवर चाकणचा भुईकोट किल्ला होता. हि गडी जिंकल्याशिवाय नाशिक पुणे मार्ग निर्धास्त होऊच शकत नाही. याची जाणीव शाहिस्तेखानाला होती आणि म्हणूनच त्याने चाकणच्या दिशेने कूच केली. या मोहिमेसाठी खान जातीने निघाला. बरोबर प्रचंड तोफखाना आणि वीस हजाराहून अधिक सैन्य सुद्धा होते. या सैन्यात उजबेकखान, गिरीधर कुंवर, सय्यद हसन, जाधवराव, रायसिंह असे नामवंत सरदार होते.
चाकणचा मराठी किल्लेदार होता फिरंगोजी नरसाळा(Firangoji Narasala). फिरंगोजींना खानाच्या या मोहिमेची आधीच माहिती मिळाली होती. त्यांनी चाकणच्या आसमंतातील शेतकऱ्यांना आधीच सावध केले आणि जमेल तेवढे धान्य घेऊन त्यांना सुरक्षित जागी हालविले. उरलेले धान्य मराठ्यांनी जाळून टाकले, जेणेकरून मोघली सैन्याला धान्याची चण-चण भासेल.
वीर फिरंगोजी नरसाळा
२१ जून १६६० रोजी मोघली फौज चाकणला पोचली. मोघली सैन्याने पहिलाच जोरदार हल्ला किल्ल्यावर केला पण तो हल्ला मराठ्यांनी लीलया परतवून लावला. तेव्हा खानाला कळून चुकले कि हा किल्ला जिंकणे तितके सोपे नाही. त्याने किल्ल्याला वेढा घातला जेणेकरून किल्ल्यातील दाणा- गोटा संपला कि किल्ला आपसूक ताब्यात येईल. फिरंगोजींनी अचूक जागी बंदुकधारी आणि तिरंदाज बसविले होते, ज्यामुळे मुघली सैनिकांना किल्ल्याच्या जवळ येणेच कठीण होऊन बसले. खानाने धमधामे रचले त्यावर तोफा चढविल्या आणि किल्ल्यावर मारा केला पण त्याचा काही विशेष परिणाम झाला नाही. रात्री मराठे किल्ल्यातून बाहेर पडीत आणि झोपलेल्या मोघली छावणीवर हल्ला करून जमेल तेवढे नुकसान करून पुन्हा किल्ल्यात पसार होत. असे कित्येक दिवस चालू राहिले.
तोपर्यंत पन्हाळ्याहून महाराज सुद्धा सुखरूप निसटून पुन्हा राजगडावर पोचले. आता खानाला जास्त काळजी होती ती चाकणला बाहेरून मदत मिळण्याची. खानाने गुप्तपणे एक सुरुंग खणायला सुरुवात केली होती. वरती बुरुजावर लढणार्या मराठी सैनिकांस याचा काहीच अंदाज नव्हता आणि अखेर वेढ्याच्या पंचावनाव्या दिवशी मुघलांनी हा सुरुंग पेटवून दिला. चाकणचा बुरुज उडाला, कित्येक तोफा, सैनिक, बंदुका हवेत उडाल्या. सुरुंगामुळे पडलेल्या भगदाडातून किल्ल्यात घुसण्यासाठी मोघली सैन्य सरसावले पण त्यांचा मार्ग फिरंगोजी आणि त्यांच्या वीरांनी अडवला. मराठ्यांनी पराक्रमाची शर्त केली आणि रात्रीपर्यंत शत्रूला किल्ल्याच्या आत येऊ दिले नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा मोघलांनी हल्ला चढविला, मराठे पुन्हा लढू लागले. पण आता फिरंगोजींना कळले होते की, जास्त वेळ मराठे तग धरू शकणार नाहीत आणि त्यांनी किल्ला सोडला आणि उरलेल्या सैन्यासह ते राजांकडे निघून गेले.
वीर फिरंगोजी नरसाळा
फिरंगोजींच्या पराक्रमाची तारीफ खुद्द शाहिस्तेखानाने केली आणि त्यांना मोघलाईत येण्याचे सुद्धा सुचविले पण फिरंगोजींनी त्याला नकार दिला.
सबंध दिवसभर खिंडारावर लढाई चालू होती. ताज्या दमाचे असे मोंगलांचे हल्ल्यावर हल्ले सारखे होत होते. पण मराठे मात्र तेवढेच अन् तेच होते. ते अविश्रांत लढत होते ! अपरंपार शत्रुसागराशी अगस्तीच्या आत्मविश्वासाने लढण्याचे धैर्य त्यांच्यात आले तरी कसे ? कोणी शिकवली ही चिकाटी ? हे सर्व त्यांना शिकविले शिवाजी राजाने !
फार खेद होत आहे लिहिताना की फिरंगोजी नरसाळे(Firangoji Narasala) यांचे बद्दल त्यांचे गाव, घर, वतनवाडी, कुटुंबकबिला आदीची काहीच माहिती उपलब्ध नाही.