महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,25,283

फिरंग्यांचे घाऊक बारसे

By Discover Maharashtra Views: 1650 5 Min Read

फिरंग्यांचे घाऊक बारसे –

मित्रानो,या लेखाचे शीर्षक थोडेसे आपल्याला मजेशीर वाटेल. फिरंगी लोकांचे घाऊक म्हणजे मोठ्या प्रमाणात बारसे कसे होऊ शकते आणि करणारे कोण आहेत असा विचार येणे साहजिकच आहे. आपल्याला ठाऊक आहेच की अठराव्या शतकामध्ये अनेक युरोपिअन हिंदुस्थानात आपले नशीब काढायला येत असत.तयातील बरेच लोक एतद्देशीय राजेरजवाड्यांचेकडे लष्करी नोकरी करीत व सेनापतीपदापर्यंत पोचत.अशा युरोपातील आलेल्या सरदारांची नांवे उच्चारायला अवघड असल्याने साहजिकच त्यांचा स्थानिक भाषेत अपभ्रंश होत असे आणि त्यातून नवीन नवीन नावांची उत्पत्ती होत असे.अठराव्या शतकात हिंदुस्थानचे राजकारण प्रबळ व शक्तिशाली मराठ्यांच्या भोवती फिरत असल्याने साहजिकच मराठ्यांचा संपर्क असा फिरंगी लोकांशी मोठ्या प्रमाणात येत असे.त्यामुळे त्यांच्या नावाचे मराठीकरण होणे स्वाभाविक होते. अशा काही घटनांचा मागोवा आज आपण घेणार आहोत.(फिरंग्यांचे घाऊक बारसे)

मराठ्यांनी फिरंगी लोकांची नांवे बदलण्याचे जे उद्योग केले त्यामध्ये मला आवडलेले पहिले उदाहरण म्हणजे ‘इंद्रसेन’ होय. महादजींचा इंग्रजांशी झालेल्या तहानुसार इंग्रजांनी शिंद्यांच्या दरबारात आपला वकील पाठवायचे मान्य केले होते. त्यानुसार इंग्रजांचा पहिला वकील जेम्स अँडरसन हा महादजीकडे रुजू झाला.अँडरसन हे नांव मराठ्यांना उच्चारायला अवघड असल्याने त्यांनी त्याचे बारसे करून ‘इंद्रसेन’ असे नांव ठेवले होते.उत्तर मराठेशाहीच्या इतिहासात या इंद्रसेनाचा वारंवार उल्लेख येतो. त्यानंतरचे अजून एक ठळक उदाहरण म्हणजे इंग्रज सेनापती ज्याचे नांव स्टुअर्ट स्मिथ होते,त्याचे नामकरण ‘इष्टुर’ फाकडा झालेले होते. मराठ्यांशी तळेगाव वडगावला झालेल्या लढाईत तो ठार झाला होता. त्याच्या लढाईतील हुशारीबद्दल त्याला ‘फाकडा’ ही पदवी मराठ्यांनी दिली होती.मराठ्यांच्या नामकरणाचे अजून एक उत्तम उदाहरण म्हणजे महादजींचा विश्वासू फ्रेंच सेनानायक डी बॉयन (Di Boyan)चे नामकरण ‘डभई’ केले होते. या ‘डभई’चे नांव देखील इतिहासातील कागदपत्रांत नेहमी आढळते.

उत्तर मराठेशाहीत अशी अनेक उदाहरणे आढळतात की ज्यात फिरंगी लोकांची नांवें हिंदुस्थानात बदलेली होती.फ्रेंच लष्करी अधिकारी पीएरे क्यूलीअर(Pierre Cuillier) हा १७८० मध्ये हिंदुस्थानात आला. त्याने आपले नांव पेरॉन करून घेतले. तर हिंदुस्थानात त्याचे नांव ‘पीरू साहेब’ केले गेले. तर मराठ्यांनी त्याचा चक्क ‘पेरू साहेब’करून टाकला. याने महादजीची बरीच वर्षे चांगल्या प्रकारे सेवा केली असे दिसते. डी बॉयन फ्रांस देशात परत जाताना त्याने आपला कार्यभार या पेरॉन वर सोपवला होता.

अठराव्या शतकात फिरंगी लोकांत अशी सोपी नवी नावे ठेवून घेण्याची पद्धतच होती. याच पद्धतीने वाल्टर रेनहार्ड ने ‘सुमेर’ नाव घेतले ज्याचे बोली भाषेत रुपांतर सोम्बरे केले गेले. जॉर्ज हेसिंग चे नाव ‘जोरुस साहेब’ झाले तर लुईस बारगुईन चे नाव ‘लुई साहेब’,  जॉर्ज थॉमस याचे नाव ‘जेहाजी साहेब’ ,  जेम्स शेफर्ड चे ‘जेम्स साहेब’ पडले. जॉर्ज थॉमस याने हरियाणामध्ये ‘जॉर्जगड’ नावाचा स्वतःचा एक गड बांधला ज्याचे नांव स्थानिक जनतेमध्ये ‘जहाजगड’ असे नामकरण झाले. हरियाणामधील फारच कमी स्थानिक लोकांना जहाजगड या नांवाच्या उत्पत्तीबद्दल माहिती आहे. याच जॉर्ज थॉमस याने १८०० च्या दशकात आपल्या नावाने केवळ गड बांधला नाही तर ‘रुपया’ म्हणून स्वतःची वेगळी नाणी देखील पाडली होती. ज्यां फिरंग्यांनी आपले आडनाव शाबूत ठेवायचा प्रयत्न केला त्यांच्या नावाचा भलताच अपभ्रंश स्थानिक लोकांकडून झाला. उदाहरणार्थ, रॉबर्ट सुथरलँड चे रूप ‘सतलज साहेब’, कॅप्टन सिम्स चे नाव ‘संक साहेब’, कॅप्टन ब्राऊनरींग हा या बाबतीत भलताच दुर्दैवी ठरला.त्याचे नाव स्थानिक भाषेत ‘बुरांडी’ ठेवले गेले.

मराठ्यांच्या इतिहासातील अशी फिरंगी आणि त्याच्याशी निगडित हिंदुस्थानी नांवे अशी माहिती जमा केली तर एक सुंदर संदर्भ ग्रंथ तयार होईल असे वाटते.

या लेखाच्या अंती विसाव्या शतकातील एक आठवण सांगावी वाटते. साधारणतः १९७३च्या सुमारास भारताचा क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला होता. त्या काळात दूरदर्शन नसल्याने रेडिओ वरील समालोचन हे क्रिकेट शौकिनांचे धावते वर्णन (commentary) ऐकण्याचे आवडते साधन होते.त्याकाळातील ब्रिटिश रेडिओ वरील इंग्रज समालोचकांना हिंदुस्थानी खेळाडूंची नावे उच्चारणे अवघड जात असल्याने ते सर्रास आपल्या नावाचा अपभ्रंश करत. उदाहरणार्थ चंद्रशेखर चा ‘चंद्रा’, तर वेंकट राघवनचा ‘वेंकी’, तर इरापल्ली प्रसन्नाचा ‘परसान’असा उच्चार करीत असत. सुनील गावस्करला ‘सनी’ म्हंटले जाई. त्या काळातील इंग्रज समालोचकांना कुठे माहिती होते की मराठ्यांनी दोनशे वर्षांपूर्वी त्यांच्या लोकांवर असाच प्रयोग केलेला होता !! मित्रानो इतिहासाची पुनरावृत्ती होत असते (History repeats itself) असे म्हणतात, ते खोटे नाही.

संदर्भ: European Military Adventures of Hindustan from 1784 to 1803 by Herbert Compton संकलन व लेखन:प्रमोद करजगी

Leave a Comment