महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,08,868

श्रीमंत पहिले बाजीराव पेशवा सरकार

Views: 2952
5 Min Read

श्रीमंत पहिले बाजीराव पेशवा सरकार !!

पुस्तक लेखमाला क्रमांक २४ –

छत्रपती शिवराय आणि शंभु महाराज यांच्या नंतर शाहू महाराज यांनी जो स्वराज विस्ताराचा यज्ञ आरंभला.हा मराठा स्वराज्य विस्तार शाहू महाराज्यांच्या काळात पुढे नेण्याचे काम केले ते स्वराज्याचे पेशवा श्रीमंत पहिले बाजीराव पेशवा यांनी!!

मराठा साम्राज्य नर्मदेपार नेऊन अगदी दिल्ली पर्यंत धडक देण्याचे काम पेशवा बाजीराव यांनी केले. त्यांच्या योजना , लढाईतील कसब आणि पराक्रम हे छत्रपती शाहू महाराज यांनी ओळखूनच बाजीरावांना त्यांनी स्वराज्याची सिमविस्तार करण्याची मुभा बहाल केली. पण या योग्यतेला अगदी न्याय देऊन बाजीरावानी स्वतःचे एक वेगळेच अस्तित्व निर्माण केले. यामुळेच आजही मराठा साम्राज्य विस्ताराचा अभ्यास करताना छत्रपती शाहू महाराज यांचे धोरण आणि पेशवा बाजीराव यांचा योजना वा पराक्रम यांचा सखोल अभ्यास केल्याशिवाय आपण पूर्णत्वाला जाऊच शकत नाहीय.

बाजीरावांचा जन्म १८ ऑगस्ट १७०० साली झाला.

वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी ते स्वराज्याचे पेशवे पंतप्रधान झाले. शाहू महाराज्यांच्या आज्ञेवरून त्यांनी थोरले छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वप्न अर्थातच हिंदवी स्वराज्य हे नर्मदेपार नेऊन ठेवले.बाजीराव पेशवे यांच्या कारकिर्दीत प्रचंड गाजलेली लढाई म्हणजे पालखेड ची लढाई. या लढाईत निजामाचा पराभव करून मराठ्यांची एक प्रचंड जरब त्यांनी बसवून दिली.

बाजीरावांचा हिंदुस्थानभर मोठा दरारा होता १७३९ मध्ये इराणचा बादशाह नादिरशाह याने दिल्लीवर आक्रमण केल तेव्हा बाजीराव दिल्लीकडे निघाला ‘बाजीराव निघालाय’ या एवढ्या बातमीनेच नादिरशाह याने दिल्ली सोडली आणि तो परतला.

मराठयांच्या या तलवारीचा धाक अगदी दिल्ली पर्यंत आधीच जाऊन पोहचला होताच.पहिले बाजीरावानी त्यात अजूनच भर घालून हिंदवी स्वराज्य अटकेपार नेण्याचे स्वप्न दाखविले.यथावकाश ते ही स्वप्न पूर्ण झालेच. मराठ्यांनी त्यांचे साम्राज्य आणि भगवा ध्वज पार अटकेपार नेऊन फडकीवला! सोबतीला त्यांना त्यांचे बंधू नरवीर श्री चिमाजी आप्पा यांचीही खूपच मोलाची साथ लाभली.

वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी मरण आलेल्या या शूर योध्याची लढाईतील आणि राजकारणात असलेली पकड मात्र असामान्य होती.म्हणूनच तर त्यांना असामान्य योद्धा असे गौरविले जाते.

पहिले बाजीराव यांना आपण फक्त “मस्तानीबाई साहेब”  यांच्या प्रेमापर्यंतच अडकवून ठेवतो. पण असा कादंबरीमय इतिहास न वाचता आपण जर या अलौकिक योध्याचे संधर्भ ग्रंथातील वाचन केलेत तरच या असामान्य योध्याची महती आपणास कळू शकेल.

थोरल्या बाजीरावांची मुद्रा :

“।। श्री राजा शाहु नरपती हर्ष निधान,

बाजीराव बल्लाळ मुख्य प्रधान……।।”

तसे अनेक संदर्भ ग्रंथात बाजीराव पेशवे यांच्यावर प्रचंड माहिती उपलब्ध आहेच. तरीही पहिले बाजीराव पेशवे यांच्या वर असलेले आद्य चरित्र श्री ना.के. बेहरे यांनी लिहिलेले “श्रीमंत पहिले बाजीराव पेशवे” हे होत. यात त्यांनी बाजीराव पेशवे यांच्या उत्कृष्ट लढाई धोरण आणि त्यामुळे झालेल्या मराठेशाहीच्या उत्कर्ष काळाची अनेक संदर्भ देऊन सखोल माहिती दिलेली आहे.

त्यानंतर म्हणजे १९७९ साली प्रकाशित झालेले श्री.म. श्री. दीक्षित यांचे “प्रतापी बाजीराव” हा अजून एक महत्त्वाचा संदर्भ ग्रंथ. यात त्यांनी अफाट मेहनत घेऊन पहिल्या बाजीराव यांच्या विषयी प्रचंड माहिती जनमानसात पोहचवली आहे. त्यानंतर  तिसरे  चरित्र म्हणजे जयराज साळगावकर यांनी लिहिलेले “अजिंक्य योद्धा बाजीराव” हा ही ग्रंथ खूपच माहितीपुर्ण आहे. तसेच ऑक्टोबर २०२० मध्ये “श्रीमंत बाजीराव पेशवा” या एकाच अजिंक्य योध्यावर तब्बल तीन अभ्यासपूर्ण ग्रंथांची निर्मिती झाली.

त्यातील एक म्हणजे मेजर जनरल शशिकांत पित्रे यांनी लिहिलेला ” या सम हा” हा एक महत्वाचा ग्रंथ! यात त्यांनी  श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी लढलेल्या लढाया तसेच बाजीराव पेशवे यांच्या अलौकिक युधनेतृत्वाचा लष्करीदृष्ट्या उहापोह केलेला आहे. अनेक महत्त्वाचे नकाशे ही दिलेले आहेतच. त्यामुळे हा ग्रंथ बराच परिपूर्ण झालेला आहे. या सर्वांवर कळस चढविलाय तो अजून दोन महत्वपूर्ण ग्रंथानी! ते म्हणजे श्री कौस्तुभ कस्तुरे यांनी सखोल अभ्यास करून आणि अगदी सोप्या लिहिलेले “शहामतपन्हा बाजीराव” आणि दुसरा ग्रंथ म्हणजे  उदय कुलकर्णी सर यांनी लिहिलेला “द इरा ऑफ बाजीराव” हे संदर्भ असलेले पुस्तक.

यात कौस्तुभ कस्तुरे यांनी लिहिलेल्या श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या चरित्रात आपणस अनेक महत्वाचे संदर्भ मिळतात. जे काही प्रमाणात आपणस नवीनच आहेत. त्यांनी घेतलेली अफाट मेहनत या ग्रंथात अगदीच दिसून येते.

तसेच उदय कुलकर्णी सर यांच्या पुस्तकांतून लष्करी दृष्टीने केलेली युद्ध आखणी चा एक नवीन पैलू आपणस अभ्यासायला मिळतो. म्हणजे छत्रपती शिवरायांच्या काळानंतर ने युद्ध शास्त्र थोड्या प्रमाणात बदलेले त्याचे श्रेय हे श्रीमंत बाजीराव पेशवे यांना जाते. या बदलाची माहिती आपणस या दोन्ही ग्रंथातून वाचायला मिळते.

त्यामुळे आजच्या घडीला फक्त “पहिले बाजीराव पेशवे”  यांच्यावर उपलब्ध असलेली ही एकूण महत्वाची ६ अभ्यासपूर्ण चरित्रे आहेत.

पहिले बाजीवर पेशवे यांच्यावर भारत सरकार ने एक स्टॅम्प ही काढलेला आहे.माझ्या संग्रहातील तो स्टॅम्प आणि FDC (First day cover) आपल्या माहितीसाठी इथे देत आहे.

आपणही वाचन करीत राहावे आणि ऐतिहासिक माहिती, तसेच संदर्भ  मिळवीत राहावे .हीच या पोस्ट मागील प्रामाणिक भावना!

बहुत काय लिहिणे?अगत्य असू द्यावे.

किरण शेलार.

Leave a Comment