महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,24,297

स्वराज्याची पहिली लढाई बेलसर | पहिला गनिमीकावा

By Discover Maharashtra Views: 1840 11 Min Read

स्वराज्याची पहिली लढाई बेलसर –

शिवरायांनी स्वराज्याचे तोरण तोरणा किल्ला जिंकून बांधले आणि त्यानंतर अवघ्या पंधरा ते वीस दिवसातच तोरण्यापासून पूर्वेला असणाऱ्या मुरुंबदेवाच्या डोंगरावर त्यांची नजर गेली. त्या ठिकाणी त्यांनी तोही डोंगर जिंकून नवीन किल्ला बांधण्यास सुरुवात केली. तोरणा किल्ल्यावर सापडलेल्या धनाचा वापर करून राजगड किल्ल्यावरील बांधकाम माच्या इमारती तटबंदी या सर्व गोष्टी बांधून घेतल्या. स्वराज्याच्या पहिल्या राजधानीला आकार दिला.(स्वराज्याची पहिली लढाई बेलसर)

किल्ल्याचे नामकरणही किल्ल्याप्रमाणेच केलं. त्या किल्ल्याला राजगड या नावाशिवाय दुसरं नाव कदाचितच शोभल असतं. गडांचा राजा आणि राजांचा गड. बुलंद असा किल्ला राजगड उभा राहिला. त्यानंतर शिवरायांचे लक्ष गेलं ते चाकणच्या किल्ल्यावर . किल्ल्याचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा याला स्वराज्याचे महत्त्व सांगून आपल्या बाजूला करून चाकणचा संग्राम दुर्गही स्वराज्यात सामील करून घेतला. त्यानंतर पुढचा किल्ला कोंढाणा. कोंढाणा किल्ला अतिशय अवघड लढून जिंकता येणार नाही. साम दाम दंड भेद या नीती मधला दाम हा प्रयोग करून तेथील किल्लेदाराला पैसे देऊन किल्ला आपल्या ताब्यात घेतला.

शहाजी राजांची जहागीरी पुणे आणि सुपे इंदापूर. या भागावर लक्ष ठेवण्यासाठी राजांना आवश्यक असणारे किल्ले शिवराय एका मागून एक घेत होते. त्यानंतर शिवरायांचे लक्ष गेलं ते पुरंदर या किल्ल्यावर. पुरंदर किल्ल्याचा किल्लेदार होता निळकंठराव हैबतराव. त्याच्या घरामध्ये भावा भावांच्या भांडणाचा फायदा घेत शिवरायांनी ऐन दिवाळीमध्ये पुरंदर किल्ला युक्तीने आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर शिरवळच्या आमीनाला त्यांनी हुसकावून लावले. या सर्व गोष्टींच्या तक्रारी आदिलशहा पर्यंत पोहोचल्या होत्या. आदिलशहाने मात्र आता शिवरायांचा बंदोबस्त करण्याचं ठरवलं होतं. शहाजीराजांना त्याबाबत ताकीद दिली होती. परंतु शहाजीराजांनी माझा पुत्र माझ्या कह्यात नाही. तुमचं तुम्ही पाहून घ्या. अशा आशयाचे उत्तर देऊन हे प्रकरण धुडकावून लावले होते.

यावेळी आदिलशाही दरबारामध्ये बाजी घोरपडे मुस्तफा खान मंबाजी भोसले अफजल खान यासारखे शहाजीराजांचे द्वेष्टे शहाजीराजांच्या आणि भोसले कुटुंबाच्या वाईटावर टपून बसलेलेच होते . जोपर्यंत शहाजी भोसले आणि त्याच्या कुटुंबाचा बंदोबस्त होत नाही. तोपर्यंत अफजल खान असेल बाजी घोरपडे असेल मुंबाजी भोसले असेल मुस्तफा खान असेल यांच्या कर्तुत्वाला मानाची झालर मिळणार नव्हती. त्यांनी आदिलशाहीचे कान भरले आणि एक खूप मोठा कट आदिलशाही दरबारामध्ये शिजला. तो म्हणजे असा एकाच वेळी शहाजीराजे, शहाजी पुत्र संभाजी आणि शिवराय या तिघांवर कारवाई करण्याचा. मुस्तफा खान अफजल खान बाजी घोरपडे आणि मंबाजी भोसले यांच्यावर जबाबदारी सोपवली गेली शहाजीराजांना कैद करण्याची शहाजीराजे त्यावेळी कर्नाटकातील हिंदू राज्यांना एकत्र करून स्वराज्याची नवी पताका उभी करण्याचा प्रयत्न करत होते.

जिंजीच्या मोहिमेवर असताना शहाजीराजांना रात्रीच्या वेळी या चौघांनी कैद केली आणि त्यांची विजापुरास धिंड कडून त्यांना कैदेत ठेवले. त्याचवेळी शहाजीपुत्र संभाजी वर बंगलोरला फरहाद खानाकडे खूप मोठे सैन्य देऊन संभाजी राजांचा बंदोबस्त करण्यास पाठवले गेले. त्याचवेळी फतेह खान याला पाच हजाराची फौज देऊन शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी स्वराज्याकडे पाठवून दिले. एकाच वेळी भोसले कुटुंबीयांवर तिन्ही बाजूंनी झालेला हा हल्ला . आलेले हे संकट एकमेकांना एकमेकांची मदत करणे शक्य नव्हतं. तिघांवर आलेले हे संकट तिघांना त्यांच्या पद्धतीने हाताळायचं होत. शहाजीराजांना कैद करून त्यांची विजापुरात धिंड काढण्यात आली आणि विजापुरात त्यांना कैदेत टाकण्यात आले. ना संभाजी राजांना शिवाजी राजांना आपल्या पित्याच्या मदतीसाठी जाता आलं. कारण त्यांच्यावर आदिलशहाने पाठवलेले सैन्य. शिवरायांवर चालून आलेला फतेह खान हा महानुभवी सरदार 5000 ची फौज , सोबत मुसेखान, मिनाद शेख, फाजल खान, बाळाजी हैबतराव ,नाईक निंबाळकर, मताजी घाटगे ,आश्रम शाह आणि पाच हजाराची फौज मोठा खजिना एवढा मोठा लवाजमा घेऊन शिवरायांवर चालून आलेला हा फतेह खान. तर दुसऱ्या बाजूला मूठभर सैन्य आणि तुटपंजी शस्त्र आणि वय वर्ष फक्त 18 असणारे शिवराय. परंतु शिवरायांवरील आढळ निष्ठेची तलवार आणि स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल करून गनीम अंगावर घेण्यास सगळे मावळे तयार झाले हीच ती स्वराज्याची पहिली लढाई.

स्वराज्याची पहिली लढाई असल्याने कोणत्याही प्रकारे ही लढाई जिंकणे गरजेचे होते. त्यामुळे आदिलशाही वर शिवरायांचा धाक बसणार होता. यावेळी बेलसर पासून जवळच असणारा सुभान मंगल किल्ला पुरंदर किल्ला आणि शिरवळचे ठाणे शिवरायांच्या ताब्यात होतं. पुरंदर शिरवळ आणि सुभान मंगल या त्रिकोणात फतेह खानावर फत्ते कशी मिळवायची याची रणनीती शिवराय तिन्ही ठिकाणी राजांच्या ताब्यातच होती. सुरुवातीला विजय मिळाला तर सैन्याचे मनोबल वाढते. म्हणून जिंकण्यास सोपा आहे असं समजून फतेह खानाने बाळाजी हैबतराव यास किल्ले सुभान मंगळवर पाठवले. सुभान मंगळ म्हणजे एक गढी वजा असलेला किल्ला. खानाच्या सैन्याला दोन ठिकाणी विभागण्याची आयती संधी शिवरायांना मिळाली होती. गनिमी काव्याचा हा पहिला हेतू गनिमाच्या सैन्याची विभागणी करणे. राजांनी सुभान मंगळ फतेह खानाला लुतूपुटूची लढाई करून जिंकू दिला. त्याचप्रमाणे शिरवळ ठाणेही खानाला जिंकू दिले.

विजयाच्या उन्मादात फतेह खान राहिला. दोन विजय सलामीलाच मिळाले त्यामुळे त्याचे सैन्य आणि तो फाजिल आत्मविश्वासात राहिला. आता खानाचे सैन्य तीन ठिकाणी विभागले गेले होते सुभान मंगल चा किल्ला शिरवळचे ठाणे आणि बेलसर ची छावणी. आता सुरू झाला शिवरायांचा गनिमी कावा . बाळाजी हैबतराव आणि त्याचे सैन्य विजयाचा उत्सव साजरा केला नाचून दमून भागून झोपलेले होते . रात्रीच्या अंधारात मावळ्यांनी किल्ल्याला शिड्या लावल्या आणि किल्ल्यात प्रवेश मिळवून हैबतराबाची फौज कापून काढली. किल्ला जिंकला. दुसरा हल्ला शिरवळच्या ठाण्यावर करून ते ठाणे ही पुन्हा शिवरायांच्या मावळ्यांनी जिंकून घेतले. मिळालेली लूट पुरंदरावर मार्गस्थ झाली . तिसरा हल्ला हा बेलसरच्या छावणीत होणार होता. रात्रीच्या अंधारात पडत्या पावसात बाजी पासलकर यांच्या नेतृत्वात हा हल्ला झाला. हल्ला करून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन जमेल तेवढा गनिमी कापून गर्दीस मिळवला आणि बाजी पासलकरांची तुकडी आल्या पावली माघारी पुरंदराकडे पळून जाऊ लागली. जाता जाता मात्र निशाण धरलेला मावळा जखमी झाला . पण निशाण मात्र त्यांनी पडून दिले नाही जीवाची बाजी लावून निशाण जपले.

खानावर एका मागु मागे असे तीन हल्ले झाले सुभान मंगळ शिरवळ आणि खुद्द खान असलेली बेलसरची छावणी. हल्ले कुठून झाले ? तर ते झाले पुरंदरावरून. हल्ला होण्याचे केंद्र पुरंदर . त्यातून राजांची रणनीती होतीच खानाला पुरंदराकडे खेचून आणणे. लढाईचे केंद्र पुरंदर बनवणे आणि झाले तसेच कुत्र्याच्या शेपटावर पाय दिल्यावर कुत्रा चवताळून चावा घेण्यासाठी पाठलाग करतो. त्याप्रमाणे फते खान आपल्या सैन्यांनीशी पुरंदरावर चाल करून गेला. खानाचे सैन्य पुरंदराच्या पायथ्याला पोहोचले. तरी राजांनी त्याला विरोध केला नाही. आपले सैन्य पाहून शिवाजी घाबरून किल्ल्यात लपून बसला. या समजुतीने फतेह खानाचे सैन्य किल्ल्यावर चढाई करू लागले .

राजांनी या सैन्याला तटापर्यंत भिडू दिले आणि आपल्याला इच्छित असणाऱ्या जागेत माऱ्याच्या टप्प्यात शत्रू आलेला पाहून मावळ्यांना इशारत केली. त्याबरोबर तटावरून दगड धोंडे गोफन गुंडे बाणांचा वर्षाव शत्रूवर सुरू झाला . अचानक झालेल्या हल्ल्याने खानाचे सैन्य पुरते गांगारून गेले. जीव वाचवण्यासाठी आल्या पावली माघारी पळत सुटले. याचा फायदा घेत राजांनी किल्ल्याचा दरवाजा उघडून खानाच्या सैन्यावर हल्ला करण्याचा हुकूम सोडला आणि गोदाजी जगताप भैरोजी चोर भिमाजी वाघ यासारख्या वीरांनी पराक्रमाची शर्त केली मुसे खान ठार झाला मीनाद खान मारला गेला मताजी घाटगे कापला गेला . हे पाहून खानाच्या सैन्याने पाठीला पाय लावून पळ काढला. मावळ्यांनी त्यांचा पाठलाग करण्यास सुरुवात केली सासवड पर्यंत त्यांची लांडगेतोड केली. परंतु या लढाईत स्वराज्याच्या पहिल्या लढाईत बाजी पासलकरांसारखा आधारवड मात्र गेला. गनिमा सोबत लढता लढता बाजी पासलकर धारातीर्थी पडले.

शिवरायांनी मिळवलेला हा पहिला विजय.

तिकडे बंगलोरला ही संभाजी राजांनी फरहाद खानाला आणि त्याच्या सैन्याला सपाटून मार दिला आणि त्याचा पराभव करून विजय मिळवला. अशा प्रकारे एकाच वेळी शहाजीराजांच्या दोन्ही पुत्रांनी एकाच वेळी आदिलशाहीला दोन्ही बाजूंनी मोठा तडाका दिला. आदिलशहाने आखलेला डाव एकाच वेळी शहाजीराजे संभाजी राजे आणि शिवाजी राजे तिघांचा बंदोबस्त करण्यासाठी सैन्य पाठवले होते. यामागे त्याचा हेतू होता, पिता पुत्रांना एकमेकांच्या मदतीला जाऊन न देता तिघांचा एकाच वेळी बंदोबस्त करणे. परंतु दोन्ही शहाजी पुत्रांनी आदिलशहाचा हा मनसुबा धुळीला मिळवला. आता राहिला होता प्रश्न तो म्हणजे शहाजीराजांच्या सुटकेचा. त्यासाठी शिवरायांनी गनिमी काव्याचे दुसरे शस्त्र बाहेर काढले. पावण्याचा काठीने साप मारायचे ठरवले . म्हणाजे शत्रूचा शत्रू हा आपला मित्र असल्याचे नाटक करणे. राजांनी आपला वकील मोगल शहजादा मुरादबक्ष याच्याकडे पाठवून मैत्रीचा हात पुढे केला . मी मोगली चाकरी करण्यास तयार आहे असे भासविले. त्याबरोबर मुरादबक्षलात्याचा पिता शहाजान यांनी शहाजी राजांना अभय दिले असल्याची आठवण करून दिली. आदिलशहाने शहाजीराजांना कैद करून एक प्रकारे शहाजान बादशहाच्या आदेशाची पायमल्ली केली हे दाखवून दिले. त्यामुळे मुरादबक्षने आदिलशहाला खरमरीत पत्र लिहून समज दिली आणि शहाजी राजांची सुटका करण्यास फर्मावले. घाबरलेल्या आदिलशहाने शहाजीराजांची सुटका तर केलीच, त्यासोबत त्यांना फर्जंद हा किताब दिला. परंतु शहाजीराजांच्या सुटकेच्या मोबदल्यात मात्र त्यांनी शिवरायांकडून कोंढाणा किल्ला आणि संभाजी राजांकडून कंदर्पी चा किल्ला आणि बंगलोर शहर मात्र घेतले.

अशाप्रकारे या प्रकरणात शिवरायांचे प्रसंगावधान योग्य नियोजन मुत्सद्देगिरी, योग्य निर्णय , त्याची अंमलबजावणी पाहायला मिळते

मावळ्यांचे अतुलनीय असे शौर्य, पराक्रम पाहायला मिळतो. या प्रकरणात शिवरायांनी सुभान मंगळ आणि शिरवळ ही ठाणी जास्त विरोध न करता खानाला देऊन आपण कमकुवत आहोत असे भासवले. त्यामुळे खान विजयी उन्मादात गाफील राहिला. सैन्याची तीन ठिकाणी विभागणी केली. गाफील शत्रू वर रात्रीच्या अंधारात अचानक छापा टाकून सुभान मंगळ किल्ला, शिरवळचे ठाणे पुन्हा जिंकून घेतली. अचानक छापा घालून बेलसर च्या छावणीत गोंधळ माजवून दिला.

फतेह खानाला आपण निवडलेल्या , आपल्यासाठी अनुकूल आणि त्याच्यासाठी प्रतिकूल अशा पुरंदर किल्ल्यावर खेचून आणला . शत्रू सैन्य पूर्णता माऱ्याच्या टप्प्यात येऊ देऊन संयम दाखवला. दगड धोंडे, गोपण गुंडा यासारख्या शस्त्रांचा वापर करून शत्रूची लांडगे तोड केली. शहाजीराजांची कैदेतून सुटका करण्यासाठी आदिलशहाचा शत्रू मोगल यांच्याशी हात मिळवणे करण्याचे नाटक करून त्यांच्याच हातून म्हणजेच पाहुण्याच्या हातून आदिलशाह रुपीस साप ठेचला आणि शहाजीराजांची सुटका केली.

या ठिकाणी राजांचा संयम, बुद्धी चातुर्य ,निर्णय क्षमता दूरदृष्टी, शौर्य कितीतरी गुण आपल्याला दिसून येतात अशाच प्रकारचा शिवरायांचा गनिमी कावा आपण पुढील प्रकरणात पाहणार आहोत. तोपर्यंत जय शिवराय.

क्रमशः

शब्दांकन – सचिन पवार.

Leave a Comment