महाराजांसोबतची पहिली भेट…
आजही शाळेतील ते दिवस आठवतात. इयत्ता ४ थी मध्ये असताना पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराजांसोबतची पहिली भेट, यांची ओळख झाली. त्याआधी महाराज कोण? का लोक त्यांची जयंती आणि उत्सव करतात? एवढे गुणगान गातात? कोण आहेत तरी कोण छत्रपती शिवाजी महाराज??? इतिहास आणि महाराज यांबद्दल काडीमात्र सुद्धा ज्ञान नव्हते. इयत्ता चौथीला गेल्यावर इतिहासाच्या पुस्तकाचे मुखपृष्ठ पाहूनच आत काहीतरी मजेशीर असावे. युद्ध,लढाया, शत्रू, मारामारी आणि बरेच काही असा अनुमान लावला जाई. इतर पुस्तकांना खाकी कव्हर असायचे पण इतिहासाच्या पुस्तकाला मात्र प्लॅस्टिकचे, कारण पुस्तकाच्या पानावरील चित्रात महाराज घोड्यावर बसलेले, सोबत काही मावळे आणि मागे काहीसे डोंगर. पण ते डोंगर हे फक्त डोंगर नसून आपला सह्याद्री आणि किल्ले आहेत याची जाणीव आता भटकंती करायला लागल्यापासून झाली.
पुस्तकाची पाने चाळायला सुरुवात होते. पहिलाच धडा येतो शिवजन्मापूर्वीच महाराष्ट्र. त्यावेळी महाराष्ट्रातील रयत कशी मुघलांच्या पायी तुडवली जात होती आणि आपलेच स्वराज्यातील वतनदार, देशमुख आपल्याच रयतेचे हाल करत होते. अशावेळी महाराष्ट्राला महाराजांची गरज आणि त्यांनी स्वराज्यस्थापनेला महत्त्व का दिले हे त्या पहिल्याच धड्यात कळले. नंतरच्या धड्यात आपल्या महाराष्ट्रात शांती आणि सुराज्य व्हावे म्हणून संतांनी केलेली कामगिरी दिसून येते. देव, देश आणि धर्म या तिन्ही गोष्टी स्वराज्याच्या वाढीसाठी महत्त्वाच्या होत्या असे दिसून येते.
पुढील धडा महाराष्ट्राच्या वाटचालीस वेगळे वळण देणारा होता, तो म्हणजे शिवरायांचे बालपण. आऊसाहेबांच्या गर्भावस्थेत त्यांची झालेली धावपळ आणि त्यात शिवाजी महाराजांचा जन्म हे सर्व अगदी विलक्षण वाटत असे. शिवनेरी किल्ल्यावरील महाराजांच्या जन्मस्थानाचा फोटो अगदी मनात भरला होता. तो फोटो पाहून मनात विचार येत असे कि हा वाडा किंवा हि इमारत आजही असेल का? आपल्याला भेट देता येईल का? पुस्तकात दाखवल्या प्रमाणे महाराजांचे आपल्या सवंगड्या सोबतचे खेळणे, बागडणे, मुलांसोबत बसून गप्पा मारणे, जेवण करणे हे सर्व चित्र रुपी पाहताना असे वाटत नव्हते कि एका राजाचा पुत्र अशा गोष्टी करत असे.
रायरेश्वराच्या त्या मंदिरात बेलाची पाने वाहून बाल शिवाजीराजांनी घेतलेली स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा पाहताना आपण देखील त्यावेळी उपस्थित राहायला पाहिजे होते असे विचार मनात येत असत. त्यानंतर बांधलेले स्वराज्याचे तोरण आणि पुस्तकात छापलेले झुंजार माचीचे चित्र अगदी मनात बसले होते. तोरणा हा कठीण का ते आता तिथे गेल्यावर समजते. त्यानंतर काही काळातच स्वराज्याची पहिली राजधानी देखील महाराजांनी बांधली ते सुद्धा इतक्या लहान वयात. अशावेळी आपण स्वतःकडे पाहतो. आपण कोण आणि कितपत मोठे आहोत? ज्या वयात आपण आईबाबांकडे आपल्याला पाहिजे असलेल्या वस्तूंसाठी हट्ट धरायचो त्या वयात शिवाजीराजे किल्ला जिंकून स्वराज्यात आणत. त्यावेळी स्वतःलाच स्वतःची लाज वाटे.
अशीच पाने चाळता चाळता एक नवीन धडा येतो तो म्हणजे स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त. त्यावेळी सुद्धा आपलीच माणसे आपल्या जीवावर उठायची असा विचार करून चीड यायची. कुणाचं चांगलं झालेलं हे त्यांना बघवत नसे. अशाच वृत्तीचे होते ते जावळीकर मोरे आणि त्यांना मारल्यावर उरी एक वेगळाच आनंद दाटून येई. रायगड स्वराज्यात आला. रायगडला एकदातरी भेट द्यावी अशी इच्छा त्यावेळी मनात होती. महाराजांच्या जीवावर बेतणारा एक प्रसंग येतो तो म्हणजे – अफजलखानाने हात पसरुन राजांना दिलेली मगरमिठी आणि राजांनी हुशारीने व हिंमतीने काढलेला खानाचा कोथळा हे वाचताना अंगावर शहारे आणि आपसूकच आपले दात चावले जात असत. त्यानंतर बाजीप्रभूंचा तो पराक्रम वाचला , स्वराज्यासाठी स्वतःच्या प्राणाची सुद्धा काळजी न करणारे ते मावळे पाहून डोळे पाणावले जात असत.
आगऱ्याच्या दरबारात महाराष्ट्राच्या वाघाने ती फोडलेली डरकाळी आणि औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन मिठाईच्या पेटाऱ्यातून निसटलेले महाराज हे सर्व वाचताना रक्त सळसळून उठायचं. शायिस्तेखानाची केलेली ती फजिती सर्वांचाच गमतीचा विषय. त्याची बोटे तुटली म्हणून झालेला आनंद आणि तो पळून गेला याचे दुःख एकाच वेळी होत असे. पुरंदरच्या तहाने दुःख व्हायचे आणि मनात विचार यायचा कि, का दिले एवढे किल्ले महाराजांनी? एवढ्या मेहनतीने जिंकलेले असे सहज देऊन टाकले? जिथे शक्ती दाखवणे किंवा युक्ती दाखवणे अशक्य अशा वेळी संयमाने काम करणे याची शिकवण म्हणजेच हा पुरंदरचा तह. गड आला पण सिंह गेला हा धडा वाचत असताना तानाजीसाठी शिवरायांना हळहळताना वाचून डोळ्यात पाणी यायचे. असे कित्येक प्रसंग आहेत त्या पुस्तकात ज्यांनी त्या बाल वयातच मनात घर करुन राहिले .
त्यावेळी खरा इतिहासाचा अभ्यास सुरु झाला… त्या घटना सत्य होत्या… पण आता त्या प्रत्येक घटनेचा योग्य संदर्भ शोधणे हा सुद्धा एक अभ्यासच आहे. सभासद बखर, शिवभारत, ऐतिहासिक पत्रे इत्यादी महत्त्वाची साधने जरी आज असली तरीही याच पुस्तकाने शिवचरित्रावरील अभ्यासाची पहिल्यांदा गोडी लावली.
आज चौथीतले महाराज फक्त इयत्ता चौथीपर्यंतच मर्यादित राहिले आमच्यासाठी. महाराजांचा जन्म हा महाराष्ट्रालाच नाही तर या भारतभूमीसाठी जणू काही वरदानच होते. पण आम्हाला फक्त तिथी आणि तारीख यात वाद घालायला आवडतो. तुमची तत्वे, तुमची कौशल्ये याचा साधा विचार सुद्धा आम्ही करत नाही. महाराजांच्या जन्मदिनी आम्ही त्यांची पालखी नाचवतो ती सुद्धा DJ लावून. गाडीला भगवे बांधून मिरवतो. महाराज तेव्हाच दिसतात मोठ्या मोठ्या राजकीय पक्षांच्या बॅनर वर पण कोणाच्या मनातही शिवविचार येत नाहीत. महाराजांनी स्वराज्य स्थापन करून सुराज्य निर्माण केले आणि आज त्या सुराज्याची काहीशी दुर्दशेकडे वाटचाल होत आहे. म्हणून म्हंटल महाराज, फक्त चौथीपर्यंतच मर्यादित राहिले. ना कोणाच्या मनात ना कोणाच्या विचारांत…महाराजांसोबतची पहिली भेट.
लेखनसीमा, माहिती साभार – मयुर खोपेकर
महाराजांसोबतची पहिली भेट.