महाराष्ट्राचे लोकजीवन…
महाराष्ट्राच्या रहिवाशांना महाराष्ट्रीय अथवा मराठी माणूस असे संबोधतात. २०११च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ११,२३,७२,९७२ आहे. महाराष्ट्र लोकसंख्येनुसार भारतातील दुसर्या क्रमांकाचे राज्य आहे. मराठी बोलणार्यांची संख्या ६२,४८१,६८१ आहे. महाराष्ट्र राज्यापेक्षा जास्त लोकसंख्या असणारे केवळ ११ देश आहेत. लोकसंख्येची घनता ३७० कि.मी.२ इतकी आहे. लोकसंख्येपैकी ५.८३ कोटी पुरुष व ५.४० कोटी स्त्रिया आहेत. महाराष्ट्रातील शहरी लोकसंख्येची टक्केवारी ४२.४% आहे. लिंग-गुणोत्तर (sex-ratio) १,००० पुरुषांमागे ९४६ महिला इतका आहे. ८२.९% लोकसंख्या साक्षर आहे. साक्षरता-वाढीचा दर १९९१-२००१ला २२.५७% होता.
मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मराठी प्रामुख्याने बोलली जाते. इंग्लिश सुद्धा शहरी भागात काही प्रमाणात बोलली जाते. उत्तर-पश्चिम महाराष्ट्रात अहिराणी बोलीभाषा तर दक्षिण कोकणात कोकणी, कोळी, कोंकणी, मालवणी व विदर्भात वऱ्हाडी आणि झाडीबोली या बोलीभाषा अस्तित्वात आहेत. राज्यात ७०.२% हिंदू, १५% बौद्ध, १०.६% मुस्लिम, १.३% जैन व १% ख्रिश्चन धर्मीय जनता आहे. काही प्रमाणार ज्यू व पारशी धर्मीय देखील आहेत.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील विविध गावांत आपापल्या चालीरीती, रूढी, परंपरा यांचं जतन करण्याच्या दृष्टीने सर्वांचे प्रयत्न चाललेले असतात. रात्रीची भाकरी खाऊन झाल्यावर हळूहळू स्त्रीपुरुष गावातील चौकात जमतात आणि गीतांच्या, वाद्यांच्या तालावर आपलं पारंपरिक नृत्य करतात. ह्या करमणुकीबरोबर त्यांची तालीमसुद्धा असते. या साऱ्या प्रकरणात छोटी मुलंमुली कुठे मागे नसतात, ती देखील त्यांच्याबरोबर गात असतात, नाचत असतात. आपली पारंपरिक लोककला मनात साठवत असतात. ही कला एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आपोआपच सुपूर्द केली जाते.
आई जगदंबा, माहूरची रेणुका यांच्या भक्तांनी घातलेला गोंधळ, खंडोबाचे भक्त वाघ्या अन् मुरळी, डोंगरकुशीत राहणारे खेड्यातील स्त्री, सागरकिनाऱ्यावरील कोळी, डफावर थाप देऊन शूर मर्दांचा पोवाडा ‘शूर मर्दानं गावा’ अशा थाटात उच्च पवाडे गाणारी शाहीर मंडळी, सोंगी भजनकार, कोल्हापूर, सांगली, पुणे, औरंगाबाद, उस्मानाबाद, जळगावपर्यंतचा तमाशा – लोकनाट्यं अशा नाना रंगातील, नाना ढंगातील माय मराठी मातीतील अस्सल कला, लोकसंगीत, लोकनृत्यं आपापल्या परीनं अस्तित्वात असल्याची जाणीव करून देत आहेत.
मराठीभाषा ही इंडो-युरोपीय भाषाकुलातील एक भाषा आहे. मराठी भाषा ९ व्या शतकापासून प्रचलित असून, मराठी भाषेची निर्मिती संस्कृतपासून झालेल्या महाराष्ट्री, प्राकृत व अपभ्रंश या भाषांपासून झाली आहे. भारतातील प्रमुख २२ भाषांपैकी मराठी एक आहे. महाराष्ट्र आणि गोवा ह्या राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील दहावी व भारतातील तिसरी भाषा आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, मराठी बोलणाऱ्यांची एकूण लोकसंख्या सुमारे ९ कोटी आहे.
Credit – Wikipedia