महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,12,214

परराष्ट्रीय धोरण | शिवरायांची बलस्थाने भाग ५

Views: 2569
6 Min Read

परराष्ट्रीय धोरण | शिवरायांची बलस्थाने भाग ५ –

शिवरायांचे राज्यकारभार विषयक नेमके धोरण काय होते??? याबाबत काही जाबते आपण आधीच्या भागात पाहिले आहेतच. त्यांनी ‘अरिमित्र विचक्षणा’ कशी केली होती? स्वराज्य सुरवातीपासूनच चहुकडून शत्रुपक्षाने घेरलेले होते आणि राज्याला अंतर्गत शत्रू देखील खूप होते. ह्या दृष्टीने राजांनी परराष्ट्रीय धोरण कसे ठरवले आणि कसे राबवले हे समजून घेणे महत्वाचे आहे.(परराष्ट्रीय धोरण)

अरि म्हणजे शत्रू किंवा जवळ ज्याचे राज्य तो. तर मित्र म्हणजे अर्थात सुहृदय.

कौटिल्य अरिमित्राचे ६ प्रकार सांगतो.

१. सहज शत्रू – राजाचे नातलग आणि सिमेलगतचे राष्ट्र.

२. कृत्रिम शत्रू – आपल्या विरोधात जाउन इतर राज्यांना सुद्धा विरोध करण्यास भाग पाडणारा.

३. सहज मित्र – सिमेलगतचे राष्ट्र सोडून अन्य राज्यांचा राजा.

४. कृत्रिम मित्र – लाभ संपादन करण्याच्या दृष्टीने मैत्री ठेवणारा.

५. मध्यम – संधीविग्रहात अनुकूल असलेला.

६. उदासीन – बलवान असून मैत्री ठेवणारा.

स्वराज्य हे आदिलशाही मुलुख जिंकून वाढीस लागले असल्याने ते साहजिकच सहज शत्रू राष्ट्र होते. शिवाय मुघल सुद्धा स्वराज्याचे सहज शत्रू होतेच. पण आत्ता शत्रू असणारे राज्य नंतरच्या काळात कृत्रिम मित्रराष्ट्र सुद्धा बनू शकते. मुघलांशी १६६५ मध्ये तर आदिलशाही बरोबर १६७७-७८ मध्ये राजांनी ही भूमिका घेतली होती. मुघल, आदिलशाही, क़ुतुबशाही, इंग्रज आणि पोर्तुगीझ या ५ राज्यांबरोबर शिवरायांनी कसे राजकारण केले ते आपण आता बघू.

मुघल :

स्वराज्याच्या सुरवातीच्या काळात मुघलांनी मराठ्यांकडे कृत्रिम मित्र म्हणुन पाहिले होते. आदिलशाही पोखरली जाते आहे ह्याचा त्यांना फायदाच होत होता. पण १६५७ मध्ये मराठ्यांनी जुन्नर आणि नगर येथे हल्ले करून मुघलांचे शत्रुत्व ओढावून घेतले आणि मग ते बनले सहज शत्रू. उत्तरेला स्वराज्याची सीमा आता थेट मुघलांशी भिडली होतीच. कल्याण-भिवंडी या उत्तर कोकणावरील आक्रमण आणि अफझलखान वधानंतर तर मुघल थेट चाल करून आले. १६६०-१६६३ ही ४ वर्षे खुद्द शास्ताखान पुण्यात तळ ठोकून होता. सर्व व्यर्थ आहे हे कळल्यानंतर अधिक मोठी मोहिम मिर्झाराजा घेउन आला आणि पुरंदरचा तह घडला. या तहाने मुघल मराठ्यांचे कृत्रिम मित्र बनले. अर्थात त्यांचा सहज शत्रू असलेल्या आदिलशाहीचा पाडाव करायला. पुढे मात्र १६७० मध्ये जिझिया कर, उत्तर हिंदूस्थानमधील मंदिरांवरील आक्रमणे या व अनेक बाबींमुळे हा तह मोडला आणि मराठे-मुघल पुन्हा एकदा समोरा समोर आले. मुघलांशी मराठ्यांचे असलेले संबंध असे बदलत गेले. पुरंदरच्या तहाचा एक महत्वाचा परिणाम म्हणजे आदिलशाहीला सुद्धा आपण मुघलांविरोधात मराठ्यांशी मैत्री का करू नये ही जाणीव झाली. ह्यातून पुढे १६७७ मध्ये मराठे – आदिलशाही तह घडला.

आदिलशाही :

स्वराज्य हे आदिलशाही मुलुख जिंकून वाढीस लागले असल्याने ते साहजिकच सुरुवातीपासूनच ते ‘सहज शत्रू’ राष्ट्र होते. मात्र राजकारणात कोणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. छत्रपति शिवराय दक्षिण दिग्विजय येथे गेले असताना मुघल-आदिलशाही एकत्र येउन मराठ्यांविरोधात उभी राहिली. मात्र पराभव झाल्यानंतर मुघलांनी थेट विजापुरलाच वेढा घातला. मराठ्यांकडून अनेक लढायांमध्ये पराभव मिळाल्यानंतर देखील मुघलांकडून येणाऱ्या दबावामुळे त्यांनी मराठ्यांशी १६७७ मध्ये मैत्रीचा तह केला. मुघलांना परास्त करत खुद्द शिवरायांनी विजापुरचा वेढा उठवला. अरिमित्र संबंध हे असे बदलत असतात.

कुतुबशाही :

स्वराज्याच्या सुरवातीच्या काळात विशेष महत्त्व नसलेल्या कुतुबशाहीला मात्र राजाभिषेकोत्तर काळात महत्त्व प्राप्त झाले. दक्षिण दिग्विजय मोहिमेमध्ये कुतुबशाही सोबत सख्य करून आदिलशाही आणि मुघल यांना परास्त करायचे हेच मराठ्यांचे धोरण होते. शिवराय खुद्द १६७७ मध्ये कुतुबशहा यास भेटावयास गेले आणि उभय पक्षांमध्ये तह घडला. यात मोहिमेचा खर्च कुतुबशहाने करायचा तर मराठ्यांनी लढाया करायच्या आणि मुलुख जिंकायचा असे ठरले.

तहाचे प्रकार ३. ज्येष्ट, सम आणि हीन. तर तहाचे षाड़गुण्य अशा प्रकारे असतात.

१. संधि – काही अटींवर शत्रुशी तह करणे.

२. विग्रह – शत्रुस युद्धस उद्युक्त करणे.

३. यान – शत्रूची उपेक्षा करणे.

४. आसन – अनाक्रमणाचा करार.

५. संश्रय – आत्म समर्पणाच्या भावनेने झुंज देणे.

६. द्वैधीभाव – संधि आणि विग्रह या दोघांचा वापर करून कार्यभाग साधणे.

या प्रकारेच शिवरायांनी मुघल, कुतुबशहा आणि आदिलशहा यांच्याबरोबर तह केले. याशिवाय इंग्रज आणि पोर्तुगीझ या पश्चिम किनाऱ्यावर बस्तान बसवलेल्या ह्या परकीय सत्तांबरोबर शिवरायांनी अतिशय धूर्तपणे राजकारण केले.

इंग्रज :

इंग्रज मराठ्यांचे कायम सहज शत्रू राहिले. त्यांच्या सोबत मैत्रीचा कधीही प्रयत्न झाला नाही. सूरत आणि राजापुर येथील त्यांच्या वखारी मराठ्यांकडून लुटल्या गेल्या. पन्हाळा मोहिमेदरम्यान सिद्दीला मदत केली म्हणून राजांनी ४ इंग्रज अधिकाऱ्याना कैदेत घातले होते. पुढे ४ वर्षांनी त्यांची सुटका झाली. जलदुर्ग खांदेरी बांधताना मराठ्यांना त्रास देणाऱ्या सिद्दीला मदत करतात म्हणून मराठ्यांनी मुंबईवर हल्ला करण्याचे योजून इंग्रजांच्या तोंडाचे पाणीच पळवले होते.

पोर्तुगीझ :

या सत्तेला मराठ्यांनी नेहमी स्नेह आणि दंड या दोन्ही पात्यात पकडून ठेवत यशस्वी राजकारण केले. दुर्गाडी येथे जहाज बांधणीचा उद्योग सुरू करताना राजांनी पोर्तुगिझांची मदत मागितली होती. पुढे १६६० मध्ये मुघल आणि आदिलशाही स्वराज्यावर हल्ले करत असताना आणि इंग्रज सिद्दीला साथ देत असताना मात्र पोर्तुगीझ तटस्थ राहिले. मराठ्यांची पहिली आरमारी मोहिम बारदेश येथे गेली ती पोर्तुगीझ राज्याच्या सिमेमधून. तेंव्हा सुद्धा ते निष्क्रिय राहिले. मोघलांनी मराठ्यांविरोधात मदत मागितली असताना त्यांने ती साफ़ नाकारली. अगदी संभाजी राजांच्या काळात देखील पोर्तुगीझ मराठ्यांच्या बाजूनेच तटस्थ राहिले. १६९१ मध्ये पोर्तुगीझ गव्हर्नर आपल्या राजाला लिहितो,’रामराजा आणि बाद्शाहाचे अधिकारी या दोघांचा विश्वास आम्ही संपादन केला आहे. मात्र आमच्या राज्याला मुसलमानांपेक्षा हिंदू बरे. मुसलमानांवर कधीही विश्वास ठेवू नये.’

आरमाराचे बळ अधिक असलेल्या या सागरी सत्ता ताब्यात-धाकात ठेवायच्या तर आपले देखील आरमार हवे हे राजांनी खूप आधी ओळखले होते. यातून जलदुर्ग आणि आरमार यांची निकड निर्माण झाली. स्वराज्याचे ते एक वेगळे अंग बनले.

संदर्भ :

सभासद बखर, राजव्यवहारकोश, आज्ञापत्रे (लेखक- रामचंद्रपंत अमात्य), शिवकालीन राजनिती आणि रणनिती (लेखक- श्री. रं. कुलकर्णी), छत्रपती शिवराय – पत्ररूप व्यक्तीदर्शन – डॉ. रामदास, अथातो दुर्गजिज्ञासा (लेखक- प्र. के. घाणेकर)

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a Comment