महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,00,085

किल्ले देवगिरी, दौलताबाद

Views: 1487
2 Min Read

किल्ले देवगिरी, दौलताबाद –

“दौलताबादही पृथ्वीवरील चखोट गड खरा परंतू तो उंचीने थोडका, रायगड दौलताबादचे दशगुणी उंच.” महाराजांनी आपली राजधानी रायगडावर हलवण्याआधी सभासदाने रायगडाची आणी दौलताबादेच्या किल्ल्याची केलेली तुलना!!(किल्ले देवगिरी, दौलताबाद)

असे म्हणतात कि यादवांचा राजा भिल्लम याने ह्या अद्भुत आणि अभेद्य अशा किल्ल्याचा पाया रचला. पुढे याच यादव वंशाच्या निरनिराळ्या राजांनी देवगिरीवर राज्य केलं आणि ते भरभराटीला आणलं. जवळपास १३५ वर्षाच्या कालखंडात भिल्लम, सिंघनदेव, कृष्णदेवराय, रामदेवराय, शंकरदेव, हरपालदेव अशा राजांच्या काळात देवगिरी समृध्द झालं आणि त्याची किर्ती महाराष्ट्राबाहेर पसरली. महाराष्ट्रात जे काही थोडके उत्तम किल्ले आहेत त्यात या देवगिरी किल्ल्याची गणना होते.

दक्षिण हिंदुस्थानावर पहिल्यांदाच इस्लामिक आक्रमकांची स्वारी झाली. सुलतान जलालुद्दीनचा पुतण्या अल्लाउद्दीन खिलजीला दक्षिणेतल्या ह्या ऐश्वर्यसंपन्न राज्यांनी भुरळ घातली आणि सुलतानाला न कळवताच १२९४ मध्ये विंध्याद्री पर्वत ओलांडून दक्षिणेतल्या ह्या अभेद्य अशा दुर्गावर स्वारी करून रामदेवरायचा पराभव केला. १३१८ मध्ये मुबारक खिलजी याने यादवांचा राजा हरपालदेव याला जिवंत पकडून फाशी दिली आणि त्याचबरोबर देवगिरीवरचं १३५ वर्षाचं यादवांच साम्राज्य संपुष्टात आलं.

१३२७ मध्ये महंम्मद बिन तुघलक या विक्षिप्त सुलतानाने आपली राजधानी दिल्लीहून दक्षिणेत देवगिरीला हलवली आणि देवगिरीचे नविन नामकरण केले..दौलताबाद!! दौलतींनी आबाद असलेले शहर म्हणजेच दौलताबाद. सहा मण सोने, सात ते आठ मण मोती, दोन मण हिरेमाणकं आणि कोट्यावधी रुपये देवगिरीवरून लुटून नेल्याचा उल्लेख आढळतो आणि मग महंम्मद तुघलकाने दौलताबाद हे ठेवलेले नाव सार्थ वाटते. आणि मग काही काळापुरता का होईना दक्षिणेतल्या ह्या दुर्गाने संपुर्ण भारताचा राज्यकारभार सांभाळला.

साडे-सातशे वर्षाच्या मोठ्ठ्या कालावधीत राष्ट्रकुट, यादव, खिलजी, तुघलक, बहामनी निजामशाही, मुघल, असफजाही अशा आठ ते नऊ राजवटींनी देवगिरी आपली सत्ता प्रस्थापित केली. भारताच्या स्वातंत्र्यानंतर १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैद्राबादचे संस्थान खालसा होऊन देवगिरी स्वतंत्र भारतात विलीन झाला.

१५०० वर्षांच्या सुखद व दु:खद घटनांनी न्हालेला, शेकडो पिढय़ांच्या हृदयांचे स्पंदन अनुभवलेला देवगिरीचा हा दुर्ग आपल्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरेचा साक्षीदार आहे.

Rohan Gadekar 

Leave a Comment