किल्ले धारुर… विठोजीराजे आणि नेताजी पालकरांच्या वास्तव्याचे ठिकाण…
मूळचे धारेश्वरवरुन 8 व्या शतकात राष्ट्रकुटांनी महादुर्ग नावाने या किल्ल्याची पायाभरणी केली. काही काळ हा गढीवजा किल्ला बहामनी सल्तनतकडे होता. पुढे 1567-68 साली किल्ला विजापूरच्या आदिलशाहीकडे गेल्यानंतर सरदार किश्वरखानाने किल्ले धारुर नावाने आजच्या आधुनिक किल्ल्याची उभारणी झाली. फंदफितुरीने किश्वरखानाचा खून होऊन 1569 ला किल्ला अहमदनगरच्या निजामाकडे गेला. तेव्हा निजामाने किल्ले धारुरचे नामकरण ” फत्तेहबाद” ठेवले. यावेळी छञपतींचे चुलत आजोबा विठोजीराजेंचे वास्तव्य काही काळ याठिकाणी राहिले. पुढे 1630 ला फत्तेहबाद मोगलांच्या ताब्यात आला.
औरंगजेबाच्या कालखंडात फत्तेहबाद हे जिल्ह्याचे ठिकाण होते. याच किल्लात प्रती शिवाजी स्वराज्याचे सरनोबत नेताजी पालकरांना अटक करुन पुढे मुसलमान बनविण्यात आले..1724 नंतर किल्ला हैद्राबादच्या निजामाकडे गेला. तेव्हा दुसरा निजाम निजामअली तसेच निजामाचे बीड व पुढे खर्ड्याचे जहागीरदार सुलतानजी निंबाळकर किल्ल्यात राहून गेलेले आहेत. 1948 च्या हैद्राबाद मुक्तिसंग्रामातही किल्ल्याची महत्वपुर्ण भुमिका राहिले.
स्वातंञ्यनंतर फत्तेहबाद तालुक्याचे ठिकाण म्हणून बीड जिल्ह्यात समाविष्ट झाले. मोठ्या संघर्षानंतर शहराचे नामकरण धारुर झाले. मोगलकाळात हा किल्ला टांकसाळ असल्याने पैशाची उलाढाल येथून व्हायची..सोबतच शुद्ध सोन्याची बाजारपेठ आणि साडी तसेच धोतरजोडीचे उत्पादन सर्वञ गाजलेले होते. अलिकडे शासनाने किल्ल्याची फारच सुंदर डागडुजी केलेली आहे.तसेच शेगाव ते पंढरपूर हा चौपदरी महामार्ग पुर्ण होत आल्याने किल्ले धारुरला गतवैभव येणार आहे….
माहिती साभार – Dr. Satish Kadam