महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,17,033

किल्ले जीवधन | Fort Jivdhan

By Discover Maharashtra Views: 4245 7 Min Read

किल्ले जीवधन उर्फ जीवदानी | Fort Jivdhan

मुंबई व पालघर जिल्ह्यात डहाणूपासून वसईपर्यंत आणि वसईपासून वर्सोवा ते माहीमपर्यंत ठरावीक अंतरावर सागरी दुर्ग व किनारपट्टी लगत ठिकठिकाणी अनेक टेहळणीकरता बांधलेले लहान-मोठे गड, किल्ले आपणास पाहण्यास मिळतात. वसई तालुक्यात विरार गावात असाच एक किल्ला आज आपले अस्तित्व कायमचे हरवून बसलेला पाहण्यास मिळतो. तो म्हणजे किल्ले जीवधन(Fort Jivdhan).

जीवधन किल्ला पुरातन असून शिवशाहीच्या आधीपासून आपले अस्तित्व जपून होता. खासा संभाजी महाराजांनी या किल्ल्यासाठी लढा देऊन हा किल्ला स्वराज्यात सामील करून घेतल्याचा उल्लेख सापडतो. पण काळाच्या ओघात हा कधीकाळी किल्ला होता हे जरी आज आपण विसरलेलो असलो तरी या किल्ल्याचा महिमा एवढा प्रचंड आहे की, आज या गडाला दर वर्षी लाखो भाविकांचे पाय लागत असतात. कारण आज हा किल्ला जीवदानी देवीच्या वास्तव्याने पावन झालेला असून जीवदानी देवीच्या नावाने विश्वविख्यात पावलेला आहे. आपल्या महाराष्ट्रात जीवधन नावाचे दोन किल्ले आढळतात.

पहिला पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ राजमार्ग नाणेघाटाच्या रक्षणासाठी निर्मिलेला किल्ले जीवधन व दुसरा वसई तालुक्यातील विरार या शहराच्या पूर्वेस एक कि.मी. अंतरावर उभा असणारा किल्ले जीवधन. या गडावर जाण्यासाठी आज दोन मार्ग आहेत. एक वाट जीवदानीपाडा येथून आहे. तर दुसरा ऐतिहासिक पुरातन मार्ग आज पाचपायरी या नावाने ओळखला जातो. नवीन तिसरा मार्गही तयार आहे. पण मुहर्ताभावी अजून हा मार्ग वापरात आणलेला नाही. पायथ्यापासून गडाच्या मध्यापर्यंत सिमेंट कॉन्क्रीटच्या पाय-या बांधून काढलेल्या आहेत.

काही ठिकाणी गडावर जाणारी वाट ही कच्च्या मातीची दगड-धोंडय़ांची आहे. गडावरच्या मंदिरात पोहोचण्यास अर्धा ते पाऊण तास खूप होतो. आज जुन्या गडाचा कायापालट होऊन अद्ययावत असे सात मजली उंच जीवदानी मंदिर उभारलेले आहे. मंदिराचा सभामंडप प्रशस्त असून हवेशीर आहे. जीवदानी देवीचा गाभाराही प्रशस्त आहे. देवीचे चांदीचे सुंदर मखर पाहून आपल्याला प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिराची आठवण होते. जीवदानी देवीची मूर्ती संगमरवरी असून मुद्रा प्रसन्न व रेखीव आहे. देवीच्या शेजारीच पुरातन त्रिशूळ ठेवलेला आहे.

आज देवी जेथे उभी आहे त्या जागी पूर्वी लेणी होती. तसेच देवीच्या डाव्या हाताला छोटी लेणी होती व उजव्या हाताला अंदाजे पंधरा फूट लांबीची एक गुंफा आहे. एकावेळी एकच माणूस आत जाईल-येईल एवढी अरुंद ही गुंफा आहे. या गुंफेला कृष्णविवर म्हणतात. या गुंफेच्या शेजारीच मोठी व प्रशस्त लेणी होती. पण कृष्णविवर गुंफा वगळता सर्व ऐतिहासिक वास्तू तोडून नष्ट केलेल्या आहेत. पण त्या ऐतिहासिक वास्तू नष्ट करण्याचे कारण म्हणजे सगळ्यांना देवीचे दर्शन विनाप्रयास मिळावे हाच हेतू असवा.

देवीच्या समोरच देवीचे वाहन चांदीचा वाघ देवीसमोर तोंड करून बसलेला आहे. प्रशस्त सभामंडपात बसल्यावर मंदिराच्या घुमटाच्या गोलाकार पोकळीत अष्टअंबेची सुंदर चित्रे रेखाटलेली आपणास पाहण्यास मिळतात. जीवदानी देवीचे दर्शन घेऊन उजव्या हाताला लागून ऐंशी पाय-या चढून वर आल्यावर आपल्याला उजव्या हाताला जीवदानी देवीची भगिनी बारोंडा देवीचे छोटे पण सुंदर मंदिर पाहण्यास मिळते. पूर्वी येथून पुढे खाली गायगोठा या ऐतिहासिक ठिकाणी जाण्यास वाट होती. आजही ती आहे. येथून त्यावेळचे विरार गावाचे सुंदर दर्शन होत असे. येथून पार दूरवर अर्नाळय़ाचा समुद्र व अर्नाळय़ाचा पाणकोटही दिसत असे. आजही काही प्रमाणात पाहण्यास मिळतो पण वाढते शहरीकरण व प्रदूषण यात सारे हरवू पाहते आहे. या ठिकाणी दोन लेणी व पाण्याचे टाक पण आहेत. पण आज हे आपल्याला पाहता येत नाही. कारण ही वाट व हे ठिकाण लोखंडी जाळी लावून बंद केलेले आहे. याला कारण म्हणजे या एकांत जागी असणा-या गायगोठा या पवित्र जागेत प्रेमीयुगलांचे चालणारे अश्लील चाळे व दुसरे म्हणजे भाविकांसाठी केलेली रोप-वेची सोय.

रोप-वेची ट्रॉली सरळ येथेच उतरते. या बारोंडा देवीच्या मंदिराच्या समोरच म्हणजे जीवदानी देवी मंदिराच्या वर. माथ्यावर काळभैरव व कालिकामातेचे मंदिर आहे. पूर्वी या कालिकामातेच्या मंदिराच्या वरच्या भव्य शिळेवरून कोंबडे, बकरे कापून त्यांचे बळी देऊन त्यांचे अवशेष या शिळेवरून खाली टाकले जात असत. ट्रस्टचे खूप आभार मानले पाहिजेत की त्यांनी या अघोरी प्रकाराला आळा घालून ही अनिष्ट प्रथा कायमची बंद केलेली आहे. आज देवीच्या नावाने कोणताही बळी येथे दिला जात नाही.

या जीवधन गडाच्या सर्वोच्च माथ्यावरून सभोवतालचा सुंदर प्रदेश नजरेत भरतो. पूर्वेस उजव्या हाताला कामणदुर्ग, तुंगारेश्वरचा पर्वत, तर डाव्या हाताला टकमक किल्ला डोळय़ांना सहज दिसतो. तर पश्चिम दिशेस अर्नाळय़ाचा किल्ला, थोडय़ा दुरवर भुईगावचा वज्रगड, त्याही पुढे वसईचा किल्ला पाहण्यास मिळतो. तसेच दक्षिण दिशेस जीवदानी डोंगराच्या पायथ्याखाली पापडखिंडी पाण्याचे धरण व या धरणाच्या पाठी डोंगर कपारीत जीवदानी देवीची भगिनी बारोंडा देवीचे कडय़ाकपारीत वसलेले स्वयंभू स्थान पाहण्यास मिळते.

पावसाळय़ात येथील दृष्य विलोभनीय दिसते. येथून सूर्यास्त तर खूपच रमणीय दिसतो.

किल्ले जीवधन गिरदुर्ग असून समुद्रसपाटीपासूनची त्याची उंची अंदाजे ९०० फूट आहे. पुरातन काळापासून गड वसवायचा म्हटला म्हणजे पहिल्यांदा गडाची स्वामिनी म्हणजे गडाची मातृका निर्माण करायची.
मुख्य जागा पाहून एक तांदळा स्थापन करायचा. म्हणजे एक साजेसा योग्य पाषाण स्थापन करून त्याची पूजा-अर्चा करून त्यात देवत्व निर्माण करायचे आणि अशा तांदळा दैवताने कौल दिला तर त्या जागेवर छोटी घुमटी किंवा छोटे मंदिर उभारून गड-किल्ल्यावर बांधकाम सुरू करून गड वसवायचा. ज्या नावाने गड वसवायचा आहे तेच नाव गडाच्या तांदळाला म्हणजे स्वामिनीला द्यायचे. याचा अर्थ असा की त्या नावाने एकदा का दैवत्व निर्माण झाले की मग त्या वास्तूला कसलीच भीती वा भय उरत नाही. तेथे यश, समृद्धी, संपत्ती, दीर्घकाळ वास करते व ही गडाची स्वामिनी गडाचे कायम रक्षण करून गड अजेय बनवते. हाच एकमेव उद्देश होय.

याची अशी बरीच उदाहरणे आपणास पाहावयास मिळतील. उदाहरणार्थ तोरणगडाची तोरणजाई, रतनगडाची रत्नाई, कोरीगडाची कोराई, कोर्लाईची कोर्लाई, लिंगाण्याची लिंगाई, तुंगगडाची तुंगाई, अशेरीगडाची अशेराई, काळदुर्गाची काळुबाई, शिवनेरीची शिवाई. याच देवीच्या नावावरून शिवाजी राजांना शिवाजी हे नाव मिळाले. जुन्नरजवळील जीवधनची जीवाई व विरार येथील जीवधनची जीवदानी. असे काहीशे गड, किल्ले राज्यात पाहण्यास मिळतात. असे असूनही आज या गडाचा काहीतरी काल्पनिक, वेडावाकडा न पटणारा विचित्र इतिहास सर्वत्र सर्रास सांगितला जातो. तसे पाहता हा जीवधन गड फार पुरातन असावा. आज येथे गड होता हे सांगणारे गडाचे कोणतेच अवशेष बघण्यास सापडत नाहीत. शिवकाळात जीवधन पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. पुढे वसई व लगतच्या भागत पोर्तुगीजांचे हिंदूंवरील वाढते क्रूर अत्याचार पाहून पोर्तुगीजांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पेशव्यांनी वसईची मोहीम हाती घेतली. मराठय़ांनी २१ मार्च १७३८ ला जीवधन पोर्तुगीजांकडून जिंकून घेतला. यानंतर हा गड बराच काळ मराठय़ांच्याच ताब्यात होता. अखेर १८१७ मध्ये इतर गडांसोबत हा गड इंग्रजांनी बळकावला.

Pc – Swapnil Khot

शब्दांकन :
श्री दयानंद म. पिंगळे©
(ध्येय ग्रुप – विरार , पुर्व)

धन्यवाद.
इतिहासाचे साक्षीदार

Leave a Comment