किल्ले माचणूर –
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढे तालुक्यात भीमा नदीच्या तीरावर असलेल्या ब्रह्मगिरी गावात असलेला भुईकोट म्हणजे किल्ले माचणूर. माचणूर गाव हे सोलापूर पासून ४५ किमी अंतरावर आहे. मंगळवेढा या तालुक्याच्या गावापासून १३ कि.मी अंतरावर आहे. ब्रह्मगिरी हे गाव भीमा नदीच्या काठी असलेल्या प्राचिन सिध्देश्वर मंदिरामुळे सुप्रसिध्द आहे. तसा हा छोटेखानी किल्ला आहे. किल्ल्याला भक्कम अशी दगडी तटबंदी आहे.
प्रवेशद्वाराभवती दगडी आवरण मजबूत आहे जेणेकरून शत्रूने आक्रमण केले तरी थोपवता आले पाहिजे. तटबंदीवर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. तटबंदीत एका ठिकाणी शिवलिंग आहे. किल्ल्यात मशिदीसारखी वास्तू आहे ज्याचा उपयोग औरंगजेब प्रार्थनेसाठी करत असे. नदीकाठी असणाऱ्या तटबंदीची पुरात नासधूस झाली. सध्या राजा शिवछत्रपती परिवारातर्फे संवर्धन कार्य सुरु आहे.
दख्खन जिंकण्यासाठी आलेला औरंगजेब इ.स १६९४ ते इ.स.१७०१ सोलापूर भागात तळ ठोकून होता. तेव्हा मराठ्य़ांच्या सततच्या हल्ल्यांनी त्रस्त झाला होता व त्यांच्यापासून संरक्षण मिळविण्यासाठी औरंगजेबाने ब्रम्हगिरी गावात भिमा नदीच्या काठी इ.स. १६९५ च्या आसपास किल्ला बांधला. या किल्ल्यात मुगल सैन्याची मोठी छावणी होती. एवढी छावणी असतानाही शूर सेनापती संताजी घोरपडे आणि सेनापती धनाजी जाधव रात्री हल्ला करून रसद लुटून नेत असत. औरंगजेब या किल्ल्यात बसून न्यायदान करीत असे.
किल्ल्याचे नाव माचणूर कसे पडले याबद्दल एक दंतकथा आहे. औरंगजेबाने हा प्रदेश जिंकल्यावर सैनिकांना सिध्देश्वराचे शिवलिंग फोडण्याचा आदेश दिला. त्या कामासाठी गेलेल्या सैनिकांवर भुंग्यांच्या थव्याने हल्ला चढविला, त्यामुळे त्यांना परत फिरावे लागले. याप्रकारने संतापलेल्या औरंगजेबाने शंकराचा उपमर्द करण्यासाठी त्याला नैवेद्य म्हणून गोमांस पाठवले, पण शंकराच्या पिंडीच्या पुढ्यात नैवेद्याचे ताट ठेवून त्यावरील कापड बाजूला केल्यावर गोमांसाच्या जागी पांढरी फूले दिसली.त्यामुळे या ठिकाणाला मांस–नूर असे म्हटले जाऊ लागले. पुढे याचाच अपभ्रंश होऊन गावाचे नाव माचणूर झाले. या सर्व प्रकारामुळे खजिल झालेल्या औरंगजेबाने सिध्देश्वर मंदिराला ४०० रुपये व ६ रुपये अशी दोन वर्षासने चालू केली. आजही महाराष्ट्र सरकार कडून मंदिराला ४८० रुपये वर्षासन मिळते.
टीम – पुढची मोहीम