महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,98,763

किल्ले मंगळवेढा

Views: 1423
2 Min Read

किल्ले मंगळवेढा –

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा ह्या तालुक्याच्या गावी भुईकोट किल्ला आहे. मंगळवेढा हे गाव सोलापूरपासून ५६ कि.मी आणि पंढरपूरपासून २६ कि.मी अंतरावर आहे. सद्यस्थितीत किल्ले मंगळवेढा किल्ल्याची तटबंदी, बुरूज, प्रवेशद्वार शिल्लक आहे. किल्ल्यामध्ये उपविभागीय दंडाधिकारी यांचे कार्यालय आणि तुरुंग आहे. आतमध्ये मुर्ती, नागशिल्प आहेत. जवळच असलेले काशी विशेश्वर मंदिर एकदम सुंदर आहे.

मंगळवेढा ही काही काळ चालुक्य,कलचुरी या घराण्याची राजधानी होती.आदिलशाहाच्या काळात महत्वाचे ठिकाण होते. संत चोखामेळा, संत दामाजी या संतांच्या वास्तव्याने मंगळवेढा गाव पावन झालेले आहे. प्राचीनकाळी पुलकेशी चालुक्याच्या मंगलेश या दुसर्‍या मुलाचा याठिकाणी तळ होता. त्याच्या नावावरून गावास मंगळवेढे नाव पडले असावे. आदिलशहाची राजधानी विजापूर मंगळवेढ्याच्या जवळ आहे.

इ.स. १६६५ साली शिवाजी महाराज यांनी मिर्झाराजे जयसिंग यांच्या सोबत आदिलशाही विरुध्द मोहिम काढली. त्यावेळी नेताजींनी मंगळवेढा किल्ला जिंकला. हा किल्ला विजापूरच्या जवळ असल्याने तो ताब्यात ठेवणे अवघड असल्यामुळे मिर्झा राजे जयसिंहाने दिलेरखानाला किल्ला उध्वस्त करण्याची आज्ञा केली होती. इ.स. १६८५ मध्ये मंगळवेढे पुन्हा आदिलशहाच्या ताब्यात गेले.

जवळच असलेले काशीविश्वेश्वराचे मंदिर आणि विहीर पाहण्यासारखी आहेत. मंदिर परिसरातील शिलालेखात इ.स १५७२ साली मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख आढळतो. आठव्या शतकात काशी विश्वेश्वराच्या मंदिराची निर्मिती चालुक्यांनी केली असे मानले जाते. त्यानंतर आलेल्या कलचुरींची राजधानी काही काळ या ठिकाणी होती. कलचुरी स्वत:ला ब्रम्हाचे वंशज किंवा पूजक मानत असल्याने त्यांनी याठिकाणी ब्रम्हदेवाचे देऊळ बांधले असावे. सध्या मंदिर नष्ट झाले तरी ब्रम्हदेवाची मुर्ती आजही आपल्याला पाहायला मिळते. मंदिरामागच्या विहीरीची रचना सुंदर आहे.काही पायर्‍या उतरल्यावर ब्रह्मदेवाची दुर्मिळ मुर्ती पहावयास मिळते. विहिरीच्या मध्यभागी गावाच्या बाहेर पडणारे भुयार आहे असे गावकरी सांगतात.

टीम – पुढची मोहीम

Leave a Comment