महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,10,931

अचलपूरचा किल्ला

Views: 3319
3 Min Read

अचलपूरचा किल्ला –

१६९८ मध्ये शिवाजी महाराजांचे वंशज राजाराम यांनी वऱ्हाड प्रांत जिंकला. नंतर शाहू महाराजांनी परसोजी भोसले अमरावतीकर यांना वऱ्हाड प्रांताची जहागिरी दिली. १७४४ ते १७५० पर्यंत हा भाग निजामांच्या ताब्यात गेला पण, नागपूरचे रघुजी राजे भोसले यांनी त्यांचे पुत्र मुधोजी यांना पाठवले होते. काही काळ एलिचपूर हे मुधोजींच्या ताब्यात होते. नंतर १८०३ मध्ये नागपूरकर भोसले आणि इंग्रजांमध्ये युद्ध झाले. या युद्धानंतर वऱ्हाड इंग्रजांच्या ताब्यात गेला, हा इतिहास आहे.(अचलपूरचा किल्ला)

मोहम्मद तुघलकाचा पुतण्या सुल्तान इमाद-उल-मुलूक याने १३४७ मध्ये इदगाह उभारली. या इमारतीच्या पायऱ्यांवरून त्यावेळी गाविलगडचा किल्ला दिसत होता, असा इतिहासात उल्लेख आहे. १०८ खांबांची आणि १५ मीटर उंचीची जुम्मा मशीद ही पारंपरिक पद्धतीने बांधण्यात आली, ही भव्य मशीद उभारण्याचे श्रेय औरंगजेबच्या काळातील नवाब अलीवर्दीखान याच्याकडे जाते.

शहराच्या बाहेरील परकोट हा सुल्तानखानचा मुलगा नवाब इस्माईलखान याने बांधला. नबाबाचा महाल आणि देवडी ही बहिलोलखान व सलाबतखान याने बांधली. बालाजी तसेच, श्रीरामाचे देऊळ, शहा इस्माईलखाँ या फकिराचे थडगे नागपूरचे माधोजी भोसले यांनी बांधले. अचलपूरपासून तीन किलोमीटर अंतरावरील हौज कटोरा ही वैशिष्टय़पूर्ण षट्कोणी इमारत अहमद शहावली बहामनी याने बांधली. सुमारे १०० मीटर व्यासाच्या तलावात ८१ फूट उंचीची तीन मजली इमारत उभारण्यात आली. पूर्वी ही इमारत पाच मजली होती. त्यातील तिसरा आणि चौथा मजला पाडून त्याच्या दगडांपासून नबाबाने त्याचा राजवाडा बांधला, असे सांगितले जाते पण, ही आगळी वेगळी जीर्ण अवस्थेतील वास्तू आडवाटेने येणाऱ्या पर्यटकांचे आजही लक्ष वेधून घेते. गुलाम हुसैन खान याने इमामवाडा बांधला. त्याच्याच काळात बेबहा बाग बांधण्यात आली. या ठिकाणी इस्माईल खान याचे थडगे आहे. या परिसरात अनेक छोटी मोठी थडगी आहेत पण, या वास्तूचे सौंदर्य वेगळेच आहे. जाळीदार खिडक्या, नक्षीकाम केलेले दरवाजे यामुळे ही वास्तू प्रेक्षणीय बनते पण, सध्या ही वास्तू भकास बनली आहे. नावालाच ही बाग उरली आहे. या बागेत केवळ झुडपे, काही इमारतींचे भग्नावशेष आणि आत प्रवेश केल्यानंतर जाणवणारे भकासपण. ही वास्तू खाजगी मालमत्ता असल्याचा एक फलक दरवाजावर लावण्यात आला आहे पण, या जागेचा वापर या ठिकाणी मिळणारा एकांत पाहून नको त्या कामांसाठी केला जात असल्याचे या भागातील रहिवासी सांगतात.

अचलपूर आणि परतवाडा या दोन शहरांना पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी अजूनही योग्य ते नियोजन झालेले नाही पण, शेकडो वर्षांपूर्वी बहामनी सत्ताकाळात खापरी नळ बांधून शहरभर पाणी पुरवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. बिच्छन नदीवर त्यासाठी एक धरणही बांधण्यात आले होते, असा उल्लेख ‘गॅझेटियर’मध्ये आहे. आता हे नळ बंद असले तरी त्याचे अवशेष आणि जागोजागी टाक्या अजूनही कायम आहेत. त्याला ‘सातभुळकी’ म्हणतात. या गतवैभवावर चर्चा करणेच आता अचलपूरकरांच्या नशिबी आले आहे. दोन्ही शहराची तहान पूर्णपणे भागवू शकेल, अशी पाणीपुरवठा योजना अजूनही अस्तित्वात आलेली नाही.

माहीती – सह्याद्री प्रतिष्ठान 

Leave a Comment