महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,36,261

सुतोंडा | नायगावचा किल्ला

By Discover Maharashtra Views: 1517 6 Min Read

सुतोंडा | नायगावचा किल्ला –

औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात सुतोंडा उर्फ नायगावचा किल्ला या नावाचा सुंदर किल्ला आहे. या किल्ल्याची भव्य तटबंदी, बुरुज व यावरील इमारती आजही शाबूत आहेत. या किल्ल्याच वैशिष्ट्य म्हणजे कातळात कोरून काढलेले प्रवेशव्दार आणि किल्ल्यावर असलेली पाण्याची २५ हून अधिक टाकी. सुतोंडा किल्ल्याच्या डोंगरात असलेल जोगवा मागणारीच लेणही पहाण्यासारख आहे.

नायगाव गावात एका झाडाखाली विष्णूची सुंदर मूर्ती ठेवलेली आहे. गावाबाहेर असलेल्या हनुमानाच्या मंदिरात अनेक प्राचीन मूर्त्या ठेवलेल्या आहेत. किल्ल्याकडे जातांना शेतात एक डोक तुटलेल्या नंदीची मूर्ती ठेवलेली आहे. पुढे आईमाईच्या टेकाडाला वळसा घालून आपण किल्ल्याकडे जातो. या टेकाडावर आईमाईची घुमटी आहे. त्याच्या समोर बळी दिले जातात. किल्ल्याच्या पायथ्याशी आल्यावर वरच्या बाजूला चोर दरवाजा दिसतो. पायथ्यापासून किल्ल्यावर जाण्यासाठी २ मार्ग आहेत. पहिल्या मार्गाने आपण चोर दरवाजाने किल्ल्यात प्रवेश करतो. हा मार्ग खड्या चढणीचा आहे. दुसरा मार्ग किल्ल्याला वळसा घालून किल्ल्याच्या मागच्या बाजूस जातो. हा मार्ग सोपा आहे. या मार्गाने आपण किल्ल्याच्या मुख्य प्रवेशव्दारात पोहोचतो. हे प्रवेशव्दार मोठ्या खुबीने बनविलेले आहे. येथे डोंगर उतारावरचा कातळ खोदून अंदाजे ५० फूट लांब , २० फूट रूंद व २० फूट उंच खाच (खिंड) बनवलेली आहे. या ठिकाणचा अंदाजे १७०० टन वजनाचा दगड फोडून किल्ल्याच्या बांधकामात वापरण्यात आला असावा. शत्रूला फसविण्यासाठी ही मानव निर्मित खाच (खिंड) कातळात बनविण्यात आली होती. या खाचेच्या (खिंडीच्या) दोन्हीं बाजूंना उंचावर बुरुज व तटबंदी होती, तर तिसर्‍या बाजूला खोल दरी. अरुंद पायर्‍यांवरुन शत्रु ह्या खिंडीत आल्यावर दोन्ही बुरुजांवरुन त्यांच्यावर मारा करणे सहज शक्य होते. समोरच्या बाजूला खोल दरी व मागिल बाजूस असलेल्या अरुंद पायर्‍यांमुळे शत्रुची या ठिकाणी (खाचेत) कोंडी होत असे, त्याच्या हालचालींवर मर्यादा येत असत.

खिंडीच्या डोंगराकडील भागात कातळ कोरुन १२ फूट उंच पश्चिमाभिमुख प्रवेशव्दार बनविलेले आहे. प्रवेशव्दाराच्या वरच्या बाजूस जेथे कातळ संपतो तेथे तटबंदी बांधलेली आहे. तटबंदीत डाव्या बाजूला शरभ शिल्प कोरलेले आहे, तर उजव्या बाजूच्या कोपर्‍यात तोफेसाठी गोल छिद्र (झरोका) ठेवलेल आहे. प्रवेशव्दाराच्या आतील बाजूस दरवाजाच्या व अडसराच्या खाचा कोरलेल्या पहायला मिळतात. दरवाजातून आत गेल्यावर कातळात कोरलेला भूयारी मार्ग काटकोनात वळतो. येथे पहारेकर्‍यांसाठी कट्टे आहेत. भूयारातून बाहेर पडून फरसबंदी मार्गाने पुढे जाऊन डाव्या बाजूला वळून वर चढून गेल्यावर आपण खिंडीच्या वरच्या बाजूला येतो. येथून या मानव निर्मित खिंडीचा किल्ल्याच्या संरक्षणासाठी कसा उपयोग केलेला आहे याचा अंदाज येतो.

थोडेसे चढून गेल्यावर किल्ल्याचे दुसरे प्रवेशव्दार लागते. हे पश्चिमाभिमुख प्रवेशव्दार उध्वस्त झालेले असून त्याच्या बाजूची तटबंदी अजून टिकून आहे. प्रवेशव्दारातून आत गेल्यावर २ पाण्याची भव्य पण सुकलेली टाकी पहायला मिळतात. त्यांच्या बाजूने वर चढून गेल्यावर स्वच्छ व गार पाण्याने भरलेल प्रचंड मोठ खांब टाक पहायला मिळत. १३ तुटलेले खांब असलेल्या या टाक्याच्या डाव्या बाजूच्या कोपर्‍यात एक दगडात कोरलेली खिडकी बसवलेली आहे. टाक पाहून पुढे जातांना वाटेत उजव्या बाजूला आणखी दोन फुटलेली मोठी टाकं पहायला मिळतात. डाव्या बाजूला एक सुकलेल टाक व त्याच्या मागे काही अंतरावर तटबंदी व बुरुज पहायला मिळतात. येथून पायवाट उजवीकडे वळून वर चढते तेथे २ पीराच्या कबरी पहायला मिळतात. पीराच्या डाव्या बाजूला मशिदीची पडकी इरत आहे. तर उजव्या बाजूला कातळात खोदलेल्या २० – २५ टाक्यांच संकूल आहे. यात विविध प्रकारची, आकाराची टाकं पहायला मिळतात. या टाक्यांना वळसा घालून वर चढल्यावर आपण किल्ल्याच्या सर्वोच्च टोकावर पोहोचतो. येथे तटबंदी व वाड्याचे अवशेष पहायला मिळतात. ते पाहून पुन्हा टाक्यांच्या संकूलातील शेवटच्या टाक्यापाशी येऊन (पूर्वेला) खाली उतरावे. येथे २ प्रशस्त टाकं पहायला मिळतात. यातील एक खांब टाकं असून त्यात ८ खांब आहेत. या टाक्यांच्या पुढे चालत जाऊन डोंगराला वळसा घालून मशिदीच्या खालच्या बाजूस यावे. येथे चोर दरवाजा आहे. चोर नायगाव कडे तोंड करून आहे. या दरवाजातून १५ मिनीटात नायगावचा किल्ला किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचता येते.

जोगवा मागणारीच लेण :- चोर दरवाजातून किल्ला उतरायला सुरुवात करावी साधारणपणे अर्धा किल्ला उतरल्यावर उजव्या बाजूची पायवाट पकडावी व तटबंदीला समांतर चालत रहावे. चोर दरवाजापासून दुसर्‍या बुरुजाखाली कातळात खोदलेली दोन लेणी पहायला मिळतात. स्थानिक लोक याला जोगवा मागणारीच लेण किंवा जोगणा मांगीणीच घर या नावाने ओळखतात. हे जैन लेण आहे. यातील पहील्या लेण्याला दोन दालन असून बाहेरच्या पडवीला दोन खांब आहेत. पहिल्या दालनाच्या व्दारपट्टीवर महावीरांची प्रतिमा कोरलेली आहे, पण ती आता बरीच पुसट झालेली आहे. पहील्या दालना मध्ये उजव्या बाजूला मांडीवर मुल असलेल्या स्त्रीची २.५ फूट उंच मुर्ती आहे. त्याच्या वरच्या बाजूला भिंतीवर महावीरांची प्रतिमा कोरलेली आहे. डाव्या बाजूला गंधर्वाची २ फूट उंचीची मूर्ती भिंतीतच कोरलेली आहे. आतील दुसरे दालन चौकोनी आहे. त्यात कोणतेही कोरीव काम किंवा मुर्ती नाही. पहील्या लेण्यापासून थोड पुढे गेल्यावर कातळात खोदलेल्या प्राचीन पायर्‍या दिसतात. या पायर्‍यांनी वर गेल्यावर दगडात कोरलेल दुसर लेण पहायला मिळत. लेण्याच्या दर्शनी भागात दोन खांब कोरलेले आहे. आत बसण्यासाठी भिंती लगत दगडी बाक कोरलेले आहेत. लेण्याच्या बाहेर पाण्याच टाक कोरलेल आहे. हे लेण पाहून परत मुळ पायवाटेवर येऊन किल्ला उतरावा. या लेण्याकडे जाणारी पायवाट मळलेली नाही, तसेच बर्‍याच स्थानिक लोकांनाही या लेण्याचा नक्की ठाव ठिकाणा माहीत नाही . गावातून माहीतगार वाटाड्या घेतल्यासच हे लेण सापडू शकेल.

सुतोंडा व अंतुर हे किल्ले २ दिवसात करता येतात. त्यासाठी अंतुर किंवा नायगाव येथे एक रात्र मुक्काम करावा लागतो. सुतोंड्याहून ३ किमी बनोटी – ३ किमी तिडका – १३ किमी घाटनांद्रा – टाकळी – वाकी – नागापूर – अंतुर यामार्गाने अंतुर किल्ल्यावर जाता येते. त्यासाठी स्वत:चे वहान असल्यास उत्तम.

Goraksha Ghawate

Leave a Comment