किल्ले रोहिडा, ता.भोर –
“गडकोट हेच राज्य ,गडकोट म्हणजे राज्याचे मूल,
गडकोट म्हणजे खजिना,गडकोट म्हणजे सैन्याचे बल,
गडकोट म्हणजे राज्यलक्ष्मी,गडकोट म्हणजे आपली वसतिस्थळे,
गडकोट म्हणजे सुखनिद्रागार,किंबहुना गडकोट म्हणजे आपले प्राणसंरक्षक”
रामचंद्रपंत अमात्य यांनी आपल्या आज्ञापत्रात दुर्ग प्रकरणात अशी दुर्गांची महती वर्णिली आहे.पुरातन काळापासून किल्ल्यांना अतिशय महत्त्व होते,पण शिवकाळात त्यांना एक वेगळीच ओळख झाली.स्वराज्य स्थापनेत छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्यांचा अतिशय समर्पक उपयोग करून मराठ्यांचे स्वराज्य निर्माण केले.अशा शिवकाळातील अनेक घटनांचा मुक साक्षीदार किल्ले रोहिडा पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात आहे.ऐतिहासिक कागदपत्रातून याला विचित्रगड व बीनीचा किल्ला अशा नावाने देखील संबोधण्यात आलेले आहे.
भोर या तालुक्याच्या गावापासून फक्त सहा किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या डोंगर रांगेत हा गिरीदुर्ग उभा आहे.किल्ल्याच्या पूर्व पायथ्याशी बाजारवाडी नावाचे गाव आहे.याची समुद्र सपाटी पासूनची उंची ११०५ मीटर म्हणजे ३६२५ फुट आहे.बाजारवाडी गावाच्या बाजूने चढण्यासाठी सर्वात चांगली पायवाट असून सुमारे पाऊन ते एक तास लागतो.किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी एकमेव दरवाजा असून त्याची बांधकाम शेली अशी आहे की,आपण दरवाजा जवळ पोहोचे तोपर्यंत दरवाजा दिसून येत नाही.या दरवाजा उत्तराभिमुख असून त्याची बांधणी हिंदू-मुस्लिम पद्धतीने केलेली दिसते.
पहिल्या दरवाजाच्या चौकटीस भक्कम गणेश पट्टी असून तिच्यावर मिहराब देखील आहे.आतील बाजूला दरवाजा बंद केल्यावर आतील बाजूने अडगळ (लाकडी बांबू) लावण्यासाठी असलेली जागा दिसून येतात.पहारेकरी यांच्यासाठी दोन्ही बाजूच्या बांधकामात देवड्या आहेत.पहिला दरवाजा ओलांडून गेल्यावर थोड्या अंतरावर दुसरा दरवाजा आहे.याच्या दोन्ही अंगास सिंह व शरभ यांची शिल्पे कोरलेले आहेत.दुसऱ्या दरवाजाचे आतील उजव्या बाजूस बंदिस्त पाण्याचे टाके असून त्यास वर्षभर पिण्यासाठी पाणी उपलब्ध असते.किल्ला चढून थकून गेल्यामुळे तहान लागलेली असते,अशावेळी या पाण्याच्या टाक्यातील स्वच्छ व थंड पाणी पोटात गेल्यावर उत्साह येतो.क्षणभर विश्रांती घेऊन समोर काही अंतरावर दिसणारा शेवटचा दरवाजाकडे पावले पडतात.या दरवाजाच्या दोन्ही बाजूला अर्धव्यक्त गज शिल्पे असून मराठी व फार्सी भाषेतील शिलालेख कोरलेले आहेत.ऊन,वारा,पाऊस यांचा अनेक वर्षे संघर्ष केल्याने शिलालेख अस्पष्ट झालेले आहेत.
तिसरा दरवाजा ओलांडून आपण किल्ल्यात प्रवेश करतो.समोरच राज सदरेची जागा दिसून येते.येथे एका दुर्ग संवर्धन संस्थेच्या व भोर वन उपविभागच्या माध्यमातून सुशोभिकरणाची,डागडूजी व सुरक्षेची काळजी घेण्याची कामे प्रगती पथावर आहेत.वन विभागाने संपूर्ण किल्ल्यावर लोखंडी रॕलिंग व वृक्ष लागवड केल्याने रोहिड्याच्या सौंदर्यात भर पडली आहे.राज सदरेच्च्या पाठी मागील बाजूने पुढे गेल्यावर रोहिडमल्लाचे पूर्वाभिमुखी सुंदर मंदिर आहे.मंदिरात रोहिडमल्लाची शेंदरी मूर्ती असून हे गडदैवत आहे.या छोटेखानी मंदिराच्या समोर वर्षभर पाणी असणारे गोलाकार तळे आहे.या तळ्याच्या पाण्यात निळ्या आकाशाचे प्रतिबिंब पाहताना देहभान हरपते.किल्ल्यावर एकूण लहान मोठी दहा पाणी असणारी तळी आहेत मात्र किल्ल्यावर सैन्य व अधिकारी यांचा निवास असतानाच्या काळात याच मंदिराच्या समोरील तळ्यातील पाणी प्रामुख्याने पिण्यासाठी नक्कीच वापरत असतील.
किल्ला परिसर फार मोठा नाही तसेच विशेष सपाटीचा देखील नाही.आज मितीस किल्ल्यावर कोणतीही इमारत अस्तित्वात नाही मात्र वाड्यांच्या व घरांच्या बांधकामाचे जोते,चौधरे दिसून येतात.तटबंदी मधे शौचकुप देखील आहेत.किल्ल्यावर बांधकामासाठी चुन्याचे मिश्रण करण्याचा दगडी घाणा पश्चिमेकडील भागात दिसून येतो.या किल्ल्याचे सर्वात वेगळे वैशिष्ट्ये म्हणजे मृत सैनिकांच्या स्मरणार्थ असलेली थडी होय.किल्ल्यास असलेले सात बुरूज मात्र प्रेक्षणीय आहेत.आग्नेयास शिरवले बुरूज,पश्चिमेस पाटणे बुरूज,उत्तरेस दामगुडे बुरूज,पूर्वेस फत्ते व सदरेचा बुरूज तर ज्या बाजूला वाघजाईचे मंदिर आहे त्यास वाघजाई बुरूज हे नाव आहे.पहिल्या तीन बुरूजांस तेथील रक्षणासाठी असलेल्या कुटुंबाची आडनावे नावे दिलेली आहेत.यापैकी शिरवले व वाघजाई बुरूज भक्कम व लढाऊ आहेत.सर्जा बुरूजाचा काही भाग ढासळला आहे.फत्ते बुरूजावर एक भला मोठा वेटोळा दगड असून निशाणकाठी लावण्यासाठी त्याला एक छिद्र आहे.
या किल्ल्याची निर्मिती राजा भोज यांच्या कालखंडात झाली आहे.अनेक सत्तांचा अमल यावर राहिलेला आहे.छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदरच्या तहात जे तेवीस किल्ले मोगलांना दिले होते त्यात रोहिडा देखील होता.२४ जून १६७० मधे पुन्हा तो स्वराज्यात दाखल करण्यात मावळे यशस्वी ठरले.रोहिड्याच्या तिसऱ्या दरवाजा वरील मराठी व फार्सी लेखानुसार इ.स.१६५६ मधे हा दरवाजा विजापूरच्या आदिलशाहने बांधला असा उल्लेख येतो,यावरून हा मराठी सत्तेत व आदिलशाही सत्तेत वारंवार अदलाबदल होत असावी.
छत्रपतींच्या निधनानंतर स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याच्या गादीवर आले.त्यावेळी शिरवळ ठाण्याचा अमलदार होता सय्यद मजलिस.त्याने अनेक वेळा रोहिडा जिंकण्याचा असफल प्रयत्न केला.रोहिडखो-याचे वतन कान्होजी जेधे यांचा मुलगा बाजी सर्जेराव याच्याकडे होते आणि दरम्यानच्या काळात हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला.छ.संभाजी महाराजांनी बाजी सर्जेरावला झालेल्या घटनेबद्दल अभयपत्र दिले व रोहिडा परत घेण्याचा आदेश दिला.अखेर बाजी सर्जेरावांनी रोहिड्यावर भगवे निशाण फडकविले व तो स्वराज्यात आला.छ.संभाजी महाराजांची औरंगजेबाने अटक करून हत्या केली.छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूने वतनदारांची तारांबळ झाली.या धांदलीचा फायदा घेण्यासाठी औरंगजेबाने आपला मुलगा शाहजादा आज्जम यांस रोहिड्याच्या मोहिमेवर पाठविला.स्थानिक वतनदारांनी वतनाच्या लालसेने मोगलांना साह्य केले.
इ.स.१६८९ मध्ये स्वकीयांच्या गद्दारीने नाटंबी,करंजे,सांगवी ही गावे मोगल सैन्याने बेचिराग केली आणि रोहिडा मोगलांच्या ताब्यात गेला.छ.राजाराम महाराज कर्नाटकातील जिंजी किल्ल्यावर गेल्यावर महाराष्ट्रातील सर्व जबाबदारी रामचंद्रपंत अमात्य,धनाजी जाधव,संताजी घोरपडे व शंकराजी नारायण सचिव यांनी खंबीरपणे पेलली.शंकराजी नारायण यांनी मोगलांच्या ताब्यातील अनेक किल्ले स्वराज्यात दाखल केले त्यापैकी १६९३ मधे रोहिडा देखील घेतला.पुढे भोर संस्थानची निर्मिती राजाराम महाराजांच्या कालखंडात झाली.शंकराजी नारायण नंतरच्या कालखंडात त्यांचे वंशज नारो शंकर यांचे वास्तव्य या किल्ल्यावर काही दिवस होते.त्यांच्या कालखंडात सचिव घराण्याचे कुलदैवत प्रभु श्री राम जन्मोत्सव या किल्ल्यावर मोठ्या उत्साहाने साजरा केला जात असे.
भोर संस्थान काळात किल्ल्यावर सहा सरकारी नोकर होते.भोर संस्थानातील रोहिडा नावाचा तालुका होता मात्र शासकीय कार्यालये शिरवळ येथे होती.१९ व्या शतकाच्या सुरवातीला पंतसचिव चिमणाजी यांच्या मातोश्रीला दर वर्षी सतरा हजार रूपये वैयक्तिक खर्चासाठी देऊन किल्ल्यावर ठेवले होते.
पुढील काळात हिंदुस्थानावर इंग्रजांची सत्ता आल्याने किल्ल्यांचा विकास होण्या ऐवजी विध्वंसच झाला.गतकाळात वैभवात राहिलेल्या किल्ल्यावर आज जरी काही अवशेष राहिले नसले तरी गतकाळचा मुक साक्षीदार असलेल्या रोहिड्यास भेट दिल्याने नक्कीच उर्जा मिळेल या शंका नाही.
© सुरेश नारायण शिंदे,भोर