महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,25,025

किल्ले शिराळा | खराडे गढी, तडवळे

By Discover Maharashtra Views: 2990 3 Min Read

किल्ले शिराळा –

पुणे- कोल्हापूर महामार्गावरील पेठनाका पासून मलकापूर रस्त्यावर १४ कि.मी अंतरावर बत्तीस शिराळा हे गाव वसलेले आहे. बत्तीस शिराळा हे गाव सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथे एक भुईकोट किल्ला आहे तोच किल्ले शिराळा. ह्याच शिराळा तालुक्यात दुसरा महत्त्वाचा किल्ला आहे तो म्हणजे चांदोली अभयारण्यात असलेला प्रचीतगड.या गावात शिवाजीमहाराजांच्या काळात  ३२ गावांच्या महसुल या गावात गोळा होत असे म्हणून गावाला बत्तीस शिराळा हे नाव पडले.

शिराळ्याचा उल्लेख इ.स. ९००च्या पूर्वीपासून आढळतो. इथे समर्थ रामदासांनी स्थापन केलेले मारुतीचे मंदिर, इथे गोराक्षनाथांनी  केलेले वास्तव्य, पुरातन मंदिरे यावरून हे गाव पुरातन असल्याचे लक्षात येते. छत्रपती संभाजी महाराजांना गणोजी शिर्के आणि मुकर्रबखान यांनी पकडले तेव्हा शिराळ्यात त्यांचा एक मुक्काम  झाला होता. तेव्हा शिराळा गावचे इनामदार आणि किल्ल्याचे किल्लेदार तुळाजी देशमुख आणि गावचे दीक्षित यांनी त्यांना सोडवण्याचा एकमेव प्रयत्न केला होता पण त्यात ते अयशस्वी झाले. या गावात समर्थ रामदास स्वामी यांनी इ.स १६४५ साली स्थापन केलेले मारुतीचे मंदिरही आहे.

सद्यस्थितीत  किल्ल्याची थोडीफार तटबंदी, बुजलेला खंदक पहायला मिळतो. किल्ल्यामध्ये एक पुरातन विहीर आहे नुकतेच काही दिवसांपूर्वी संवर्धन कार्य करताना विहीरीतून असणाऱ्या भुयारी मार्गाबद्दल उलगडा झाला. किल्ल्यात मंदिर आहे.  बत्तीस शिराळा हे गाव नागपंचमीच्या  उत्सवाबद्दल  जगभर प्रसिद्ध आहे.येथील गावकऱ्यांचा जिवंत नाग पकडून त्याची पूजा करण्याचा रिवाज आहे त्यामुळे ही यात्रा पहायला खूप लांबून लोक येतात.

खराडे गढी, तडवळे –

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील तडवळे गावात सरदार खराडेंची गढी आहे. तडवळे हे फलटण तालुक्याला लागून असलेले गाव लोणंदपासून १५ कि.मी अंतरावर आहे. काळज गावापासून जवळच आहे. सद्यस्थितीत गढीचे भव्य प्रवेशद्वार आणि तीन बुरूजासह तटबंदी शिल्लक आहे. प्रवेशद्वारावर शिल्पे कोरलेली आहेत. गढीतील विहीर एकदम सुबक आहे. विहिरीत एक भुयारी मार्ग गावातील भैरवनाथ मंदिरातून येतो असे स्थानिक गावकरी सांगतात. वर बुरूजावर नाथपंथीय साधूंची समाधी आहे.गढीच्या आत एक भलेमोठे दगडी कमानी असलेले तळघर आहे.
छत्रपती शिवरायांच्या काळापासून तडवळे गाव अस्तित्वात आहे. खराडे हे मराठा घराण्यातील भोसले कुळाचे एक उपकुळ असुन खराडे हे नाव सांगली जिल्ह्यातील खराडी गावामुळे पडले आहे. खराडे सरदारांनी आयुष्यभर मराठी साम्राज्याची सेवा केली. मराठा आरमाराचे सरदार सुभानजी खराडे छत्रपती शिवाजी यांचे विश्वासू सरदार होते. सरदार शिताजी खराडे आणि त्याचा मुलगा सरदार फकीरजी शिताजी खराडे यांचा अब्दालीचा वझीर शहापसंद खान याच्याशी लढताना मृत्यू झाला. सरदार तानाजी खराडे यांनी बारादी घाटच्या लढाईत आणि इ.स १७६१ च्या पानीपतच्या रणसंग्रामात भाग घेतला होता.
टीम – पुढची मोहीम
1 Comment