किल्ले सोलापूर –
सोलापूर शहरात मध्यवर्ती भागात सिद्धेश्वर मंदिराजवळ भक्कम असा भुईकोट उभा आहे तो म्हणजेच किल्ले सोलापूर. सोलापूर किल्ल्याचे बांधकाम बहामनी राजवटीत करण्यात आले. बहामनी प्रधान महमूद गवान याने इ.स. १४६३ मध्ये किल्ल्याची उभारणी केली. किल्ल्याची तटबंदी, प्रवेशद्वार आजही मजबूत स्थितीत आहे.
किल्ल्याचे प्रवेशद्वार गोमुखी आहे आणि लाकडी खिळे असलेला दरवाजा आपले लक्ष वेधून घेतो. आतमध्ये गेल्यावर दुसरा दरवाजा लागतो त्यावर शरभ शिल्प, शिलालेख आहे. शिलालेखावर आदिलशहा, राजा सुलतान मोहम्मद यांचे अधिकारी यांचा उल्लेख आढळतो. आतमध्ये भव्य परिसर आहे तटबंदी मजबूत आहे त्यावरून गडाला फेरी मारता येते. एक ठिकाणी बुरूजावर वेगवेगळी शिल्पे असलेले पाषाण बसवले आहेत. किल्ल्यातून सिद्धेश्वर मंदिर एकदम व्यवस्थित दिसते. किल्ल्यात दर्गेपाटील बुरुज आणि त्यापुढे बाळंतीणीची विहीर आहे तिला असे नाव का पडले तर इथे बाळंतीणीचे आत्मसमर्पण झाले.
किल्ल्यात तोफ आहे, ३२ खांबी एक मस्जिद आहे. किल्ल्यातील एका शिलालेखावर असे लिहिलेले आढळते की इ.स. १६८० मध्ये कच्ची तटबंदी पक्की बांधण्यात आली. रेखीव असे बुरूज पहायला मिळते. इ.स. १९१९ मध्ये इंग्रजांनी केलेल्या उत्खननात कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिर सापडले. त्यासोबत दोन कन्नड शिलालेख, द्वारपाल आणि देवीची मूर्ती मिळाली. शिलालेख आणि द्वारपाल मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवले आहे आणि देवीची मूर्ती चंदीगढ येथील संग्रहालयात ठेवली आहे.
कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिराची निर्मिती सिद्धेश्वर महाराज यांनी केली व सोलापूरास आधुनिक श्रीशैलचा दर्जा मिळवून दिला. १४ कोरीव खांब आहेत. मंदिराला कदंबराजे, देवगिरीचे यादव यांच्याकडून इनाम मिळाले. गाईच्या खुराने सिद्ध केलेले काळ्या पाषाणातील शिवलिंग आहे.
टीम – पुढची मोहीम