महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,10,915

किल्ले वेसावा ऊर्फ वर्सोवा ऊर्फ मढ

Views: 2519
3 Min Read

किल्ले वेसावा ऊर्फ वर्सोवा ऊर्फ मढ –

अंधेरीपासून जवळ वर्सोवा गाव आहे. अंधेरी रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडून ३२१ क्रमांकाची बस पकडून या ठिकाणी जाता येते. या गावाच्या जेट्टीवरून मढ बेटावर जाण्यासाठी सारख्या मोटारबोटी आहेत. मढ बेटाच्या दक्षिण टोकाला जो किल्ला आहे तोच “वेसाव्याचा किल्ला” होय. सध्या हा किल्ला मढचा किल्ला म्हणूनही ओळखला जातो.उत्तरेस समुद्रकिनाऱ्याजवळील खडकाळ टेकडीवर किल्ले वेसावा ऊर्फ वर्सोवा हा किल्ला आहे.

सतराव्या शतकाच्या पूर्वार्धातच पोर्तुगीजांनी साष्टी बेट मिळवले व वेसाव्यास एक किल्ला बांधला. किल्ल्याच्या एका बाजूस वेसावे गाव व समुद्राकडील बाजूस मढचे बेट होते हा किल्ला पोर्तुगीजांनी दर्यावर्दी घडामोडींवर नियंत्रण ठेवण्यासाठीच बांधला हे उघड आहे.

सतराव्या शतकाच्या मध्यात डचांचे वाढते सामर्थ्य आणि शहाजहानच्या मृत्यूमुळे भारतात निर्माण झालेली दोलायमान राजकीय परिस्थिती यामुळे ब्रिटिशांना भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर आपला स्वत:चा असा तळ असण्याची निकड तीव्रतेने भासू लागली. ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालक मंडळाच्या आदेशानुसार सुरतेच्या (ब्रिटिश) कौन्सिलने सर्वेक्षण करून १६५९ साली अशी शिफारस केली की पोर्तुगालच्या राजावर दबाव आणून मुंबई , दंडा राजापुरी व वर्सोवा (वेसावे) या तीन ठिकाणांपैकी एक ठिकाण बिटिशांना देण्यास भाग पाडावे. या सर्वेक्षणात वेसाव्याचे महत्त्व लक्षात घेण्यात आले होते हा त्यातील लक्षवेधी मुद्दा आहे.तेथील समुद्र खोल असल्यामुळे मोठी जहाजे सहजपणे येवू शकतात.

इ.स.१६९४ च्या सुमारास मस्कतच्या अरबांच्या टोळ्या वेसाव्यात घुसल्या आणि त्यांनी वेसाव्यातील बायकामुलांसह सर्वांची निघृण कत्तल केली.१६९५ साली जेमेली करेरी याने वेसाव्याचा उल्लेख केला असून हा किल्ला आकाराने थोडा मोठा आहे ही बाब वगळली तर त्याचे माहीम, शीव व वरळी येथील किल्ल्यांशी साधर्म्य असल्याचे त्याने म्हटले आहे. १७२० सालच्या नोंदीमधे वेसाव्याचे वर्णन “उत्तरेस छोटा किल्ला असलेले आणि सुक्या मासळीचा व्यापार असलेले गाव’ असे करण्यात आले.

२७ मार्च १७३७ रोजी चिमाजीअप्पानी ठाणे जिंकल्यानंतर त्यांनी  वांद्रे व वेसावे जिंकण्यासाठी फौजा पाठविल्या.वेसावे जिंकण्याची कामगिरी होनाजी बलकवडे या सरदाराकडे सोपवण्यात आली होती.२९ मार्च १७३७ रोजी त्याने वेसाव्यावर हल्ला केला. पण पोर्तुगीजांनी तो मोठ्या हिरीरीने मारून काढला.

१८ जानेवारी १७३९ च्या सुमारास होनाजी बलकवडे, खंडोजी माणकर, नारोजी कडू व खंडोपंत यांनी चार फौजा नेऊन वेसाव्यावर हल्ला करण्याची योजना आखली. अशा प्रकारे चौथ्या प्रयत्नात १८ ते २० दिवस वेढा घालून मराठ्यांनी वेसावा किल्ला जिंकला. १८८२ साली प्रसिध्द झालेल्या ठाणे जिल्ह्याच्या गॅझेटियरमधे हा किल्ला पोर्तुगीजांनी बांधला आणि नंतर मराठ्यांनी तो दुरुस्त केला असे म्हटले आहे. यावरून मराठ्यांनी हा किल्ला जिंकल्यानंतर त्यात काही फेरफार केले असावेत असा अंदाज बांधता येतो.

इ.स. १७७४ च्या सुमारास बिटिश लेफ्टनंट कर्नल कीटिंग वर्सोव्यावर चालून गेला.मराठ्यांनी हा किल्ला चार दिवस लढवला. या चार दिवसात झालेले पहिले दोन्ही हल्ले मराठ्यांनी प्राणपणाने परतवून लावले. पण चौथ्या दिवशी मात्र हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. १७८७ साली डॉ. होवे यांनी “खाडीवर उत्तम नियंत्रण असलेला, जुना पण मोक्याच्या जागी असलेला किल्ला.” असे या किल्ल्याचे वर्णन केले आहे.

पेशवाईच्या अंतापर्यंत म्हणजे इ.स. १८१८ पर्यंत वेसावे येथे लष्करी तळ होता.स्वातंत्र्योत्तर काळात व आजही हा किल्ला भारताच्या हवाई दलाच्या ताब्यात आहे.

Team- पुढची मोहीम

Leave a Comment