महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,09,316

छत्रपती शिवरायांचे दुर्गबांधणीचे शास्त्र आणि वैशिष्ट्य

Views: 2654
5 Min Read

छत्रपती शिवरायांचे दुर्गबांधणीचे शास्त्र आणि वैशिष्ट्य –

शिवकाळात प्रत्येक दुर्ग मध्यवर्ती सत्तेच्या ताब्यात असे. कुठल्याही देशमुख, देशपांडे, सरदार यांना गढ्या, कोट, बुरुजी वाडा बांधण्यास सक्त मनाई केली होती. प्रत्येक गडावर महाराजांनी सरकारी सैन्याची नेमणूक केली होती. त्यावर ३ प्रमुख अधिकारी असत. सबनीस ब्राम्हण असे त्याच्याकडे आयव्याय आणि उपस्थितीची नोंद असे. कारखानीस हा कायस्थप्रभु असे व त्याच्याकडे रसदीचा विभाग असे. तर किल्लेदार मराठा असे आणि त्याच्याकडे सैन्य विषयक अधिकार असत.(छत्रपती शिवरायांचे दुर्गबांधणीचे शास्त्र आणि वैशिष्ट्य)

गडाच्या पायथ्याशी महार, मांग, भिल्ल, रामोशी, कोळी यांच्या मेटा आणि घरे असत. अशी ही अठरा पगड जाती आणि बारा बलुती समाज एकमेकांना पूरक असे. आणि गरजा आणि त्यांची पूर्तता स्थानिक पातळीवर होत असल्याकारणाने प्रत्येक जण स्वावलंबी होता. सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांची दर ३ – ५ वर्षांनी बदली होत असे. बदली आणि नियुक्ती मध्ये वंशपरंपरा आणि वशिलेबाजी चालत नसे.

★ छत्रपती शिवरायांनी निर्मिलेल्या गडकिल्ल्यांची वैशिष्ट्ये :

छत्रपती शिवरायांनी निर्मिलेल्या किल्ल्यांची काही वैशिष्ट्ये प्रकर्षाने जाणवतात. त्यातील एक म्हणजे रायगड, प्रतापगड, राजगड यांचे महादरवाजे किल्ल्याच्या २/३ उंचीवर आहे. दरवाजा पडला तरी पुढच्या चढाईवर किल्ला लढवायला पुरेशी जागा उपलब्ध होई.

डोंगर उजवीकडे ठेवून डाव्या बाजूस असणारे प्रवेशद्वार, किल्ले प्रतापगड –

पन्हाळा, सिंहगड या आधीच्या किल्ल्यांवर तशी रचना आढळून येत नाही. दुर्गस्थापत्याचा एक उत्तम नमुना म्हणून आपण या किल्ल्यांकडे बघू शकतो. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराशी येणारी वाट. ती नेहमी डोंगर उजवीकड़े ठेवून वर चढ़ते. कारण द्वाराशी होणारी हातघाईची लढाई ढाल-तलवार व फारतर धनुष्य-बाण याने होत असे; त्यात जास्त प्रमाणात उजवे असलेल्या लोकांच्या डाव्या हातात ढाल असे व उजव्या हातात फ़क्त तलवार घेउन उजव्या बाजूने होणारा मारा टाळण्यासाठी अधिक प्रयास करावा लागे. म्हणजेच वाट नियोजनपूर्व आखली तर शत्रूला अधिक त्रासदायक ठरू शकते.

किल्ले विजयदुर्गाचा गोमुखी दरवाजा –

किल्ल्याचा मुख्य दरवाजा हा कधीही दर्शनी नसे. त्यात गोमुखी बांधणीची दुर्गरचना असे. उदा. रायगड, सुधागड़, लोहगड हे किल्ले. दोन बुरुजांच्या कवेने चिंचोळ्या वाटेने आत गेले की दरवाजा समोर येत असे. ह्या ठिकाणी लढाईला फार जागा नसे व शत्रुवर वरुन चारही बाजूने तूटून पड़ता येत असे. जरी कोणी यातूनही आत शिरलाच, तरी पुढचा मार्ग सुकर नसे कारण महादरवाज्यातून आत शिरले की वाट ९० ते १८० अंशात डावीकड़े वळत असते. तिथून वाचून पुढे जाणे अगदीच अशक्य. शिवाय किल्ल्याचे १/३ चढण चढणे बाकी असते ते वेगळेच.

खडक फोडून तट बनविलेला सुवर्णदुर्ग –

सागरी दुर्गबांधणीतही काही किल्ल्यांचे उल्लेख महत्त्वाचे आहेत. जंजिरेकर सिद्दीच्या उरावर शिवरायांनी पद्मदुर्ग उर्फ़ कांसा किल्ला बांधला. ह्याच्या तटबंदीच्या दगडाचे चिरे लाटा आदळून आदळून झिजले आहेत. पण त्यातला चुना मात्र अजून तसाच शाबूत आहे. सिंधूदुर्गाची कहाणी काय वर्णावी. सुरतेची १ कोट लुट वापरून सिंधूदुर्गाचा पाया मजबूत केला गेला. ५०० पाथरवट, २०० लोहार, १०० गोवेकर, ३००० मजूर अहोरात्र काम करायचे. ५ खंडी उकळते शिसे ओतून त्याचा पाया घडवला गेला. तर खांदेरीचा किल्ला सिद्दी आणि इंग्रज ह्यांच्या बरोबर मध्ये उभारला गेला. ह्या किल्ल्याच्या तटबंदीच्या बाहेर ओबड-धोबड़ दगडांच्या राशी आढळतात. भरतीच्या लाटा सोडाच पण साध होडक सुद्धा तटबंदीशी लगट करू शकत नाही. शिवाय त्या धारधार दगडांवर कोणी पाय ठेवायची हिम्मत सुद्धा करणार नाही.

फक्त दगडावर दगड रचून विनाचुना बांधकाम, किल्ले कुलाबा –

अलिबागच्या किल्ल्यात तर तटबंदीच्या दोन दगडांमधला दर्जा चुन्याशिवाय आहे. लाट आली की तिच पाणी दर्जा मध्ये घुसत आणि जोर उणावतो. किल्ले विजयदुर्ग तसा ८०० वर्षापुर्वीचा. पण काही वर्षापुर्वी नौदलाच्या पाणबुड्यांना एक आश्चर्य सापडले. एक पाण्याखाली बनवलेली भिंत. चांगली २ मी. रुंद आणि २५ मी. लांब. ती शिवकालीन असल्याच तज्ञांचे मत आहे. खोल समुद्रातून येणाऱ्या परदेशी जहाजांना अडथळा म्हणून बांधली गेली असावी.

सर्वोच्च दुर्गरचनाकार अस शिवरायांना म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. अर्थात मोरोपंत पिंगळे, हीरोजी इंदुलकर, अर्जोजी यादव, यांच श्रेयही तितकच. साऱ्यानीच त्यांच कौशल्य पणाला लावले. त्यांनी स्थापत्यशास्त्राचे, दुर्गरचनेचे शिक्षण कोठून मिळवले, आराखडे कसे बनवले व इतक्या दुर्गम भागात बांधकाम केले तरी कसे? कोणास ठाउक.. पण एवढ मात्र नक्की की दुर्गबांधणीमध्ये त्यांनी निरनिराळे प्रयोग यशस्वी केले व त्यासाठी बारीक़-सारीक गोष्टींवर तपशीलवार विचार ही केले होते. एक दुर्गविज्ञान त्यांनी आपल्या समोर मांडून ठेवले आहे.

मन मातीत मिसळली की गवतांनाही भाले फुटतात, हे या मातीने आपल्याला शिकवले आहे. या बुलंद, बेलाग आणि बळकट किल्ल्यांवरती अशाच काही घटना घडल्यात. तेथे जायचे ते अश्याच सुवर्णक्षणांच्या आठवणीसाठी. पण सर्वात महत्वाचे म्हणजे त्यातून काहीतरी शिकावे आणि आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा अवलंब करता आला तर पहावा…

(संदर्भ – अथातो दुर्गजिज्ञासा – प्र. के. घाणेकर.)

इतिहास वेड
रोहित पेरे पाटील

Leave a Comment