गड आला पण सिंह गेला –
राजमाता जिजाऊ साहेब ग्रंथमाला भाग २८ –
शिवाजीराजे आग्र्याहून सुटून राजगडी आले. विश्रांती घेऊन राजे कामाला लागले. पुरंदरच्या तहानुसार २३ किल्ले महाराजांनी मोगलांना दिले होते ते आता राजकारणा ने अथवा हल्ले करून घेण्याचे महाराजांनी ठरवले होते. या सर्व किल्ल्यात कोंढाणा हा अतिशय अवघड आणि म्हणूनच महत्त्वाचा किल्ला होता. ज्याच्या हातात कोंढाणा त्याच्या हातात घाटावरचा पुण्याचा मुलुख अशी स्थिती होती. हा किल्ला आपण परत घ्यावा असे जिजाऊंना मनापासून वाटत होते. महाराजांनाही तो किल्ला गेल्याचे शल्य होतेच ; परंतु कोंढाणा जिंकणे म्हणजे सहज साध्या गोष्ट नाही हे ते जाणत होते. आपल्या अनेक शूर मावळ्यांचे बलिदान केल्याशिवाय कोंढाणा कोणाला प्राप्त होणार नाही असे त्यांना वाटत होते. परंतु आऊसाहेबांचा खूपच आग्रह झाला म्हणून महाराजांनी तो किल्ला घेण्याचे ठरवले होते.(गड आला पण सिंह गेला)
महाराजांचा सर्वात आवडता गड होता कोंढाणा. त्यांच्या पराक्रमाची ती आरंभीची निशाणी होती .या गडाला इतिहास होता तेव्हा या गडापासून मोहिमेला सुरुवात केली. सतत महत्वकांक्षी असलेल्या जिजाऊसाहेबांना गप्प बसवत नव्हते. राजगडाच्या अवघ्या बारा कोसावर असलेला सिंहगड किल्ला
आऊसाहेबांच्या डोळ्यासमोर सारखा दिसत होता. त्या किल्ल्यावरचे हिरवे निशाण आऊसाहेबांना सारखे सतावीत होते.तो उंच किल्ला त्यांना विचारीत होता , शिवाजीराजांना आव्हान करत होता. परंतु राजकारण नडले आणि तो किल्ला शहाजी राजे यांची सुटका करण्यासाठी त्यावेळी आदिलशाहीस द्यावा लागला होता. एक दिवस जिजामातेने सांगितले’ ‘ ‘शिवबा,किल्ले कोंढाणाशिवाय आपल्या स्वराज्यास शोभा नाही .तेव्हा कसेही करा आणि तो कोंढाणा किल्ला स्वराज्यात घ्यावा’ रोज सकाळी तो कोंढाणा आमच्या डोळ्यात सलतो. आमच्या नजीकचा एवढा महत्त्वाचा गड शत्रू हाती असलेला पाहून आम्हास वाईट वाटते.
मोगलांनी अत्यंत जागरूकतेने राखलेले दोनच गड – एक पुरंदर आणि दुसरा कोंढाणा.
कोंढाण्यावर उदयभान होता. जातीचा रजपूत व कढवा किल्लेदार. २००० राजपुतांच्या कडव्या पहाऱ्यात कोंढाणा जपला जात होता.गढही तसा सोपा नव्हता. ही कामगिरी कोणाला द्यावी, याचाच शिवाजीराजे विचार करीत होते. माता – पुत्र या विषयावर खलबत करत बसले होते. इतक्यात स्वतःच्या मुलाच्या रायबाच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी तानाजी मालुसरे शिवाजीराजे व आऊसाहेबांकडे आले होते. शिवाजीराजांना चिंतातूर पाहून तानाजीने कारण विचारले. ते सांगताच तानाजी मालुसरे शिवाजीराजांना म्हणाले, मी असताना आपण काळजी का करता ? म्हणाल तेव्हा मी किल्ला फत्ते करून देतो. शिवाजीराजे म्हणाले की,” तानाजी आपण रायबाचे लगीन करणार आहात ना ?” त्यावर मोठ्या त्वेषाने तानाजी मालुसरे म्हणाले की,” आधी लगीन कोंढाण्याचे आणि मग लगीन रायबाचे.” तानाजींने मुलाचे लग्न रद्द केले व कोंढाणा जिंकण्यासाठी निघाले.
कोंढाणा म्हणजे औरंगजेबाच्या पागुट्यावरला मोत्याचा तुरा उपटून आणायचा होता .हाये छाती कोणाची? कोंढाण्याच्याच कड्यासारखा निधड्या छातीच्या या मर्दाने महाराजांचा शब्द छातीवर झेलला. महाराजांच्या लाडक्या दोस्ताने तानाजीने गडाचा विडा उचलला. महाराजांना आता तर काहीच काळजीचे कारण उरले नाही.
महाराजांनी लहानपणापासून फार मोलाची माणसे जमवली होती. कितीही रक्कम दिली तरी अशी माणसे कुठे मिळायचे नाहीत. महाराजांनी हृदय देऊन एक एक शेलका दागिना उचलला होता. तानाजी मालुसरे त्यातलेच एक होते. देहाचा विचार नाही. संसाराचे भान नाही. आहे सेवाचाकरीची अट नाही आणि निष्ठेत कधी फट नाही. कोणतेही काम सांगा ; बिनबोभाट करायचे एवढेच फक्त ठाऊक. या सगळ्यांचा मोठा देव म्हणजे शिवाजी राजा.
तानाजी आरंभापासून स्वराज्याच्या डावात महाराजांचे खेळगडी होते. अफजलखानाच्या स्वारीच्यावेळी तानाजीने पराक्रमाची शर्थ केली होती.तानाजीच्या हाताखाली एक हजार मावळ्यांचे पायदळ होते.
तानाजीने कोंढाण्याची जोखीम उचलली. महाराजांच्या पायावर त्यांनी शब्द व्हायला , की गड कोंढाणा मी घेतो. या त्यांच्या शब्दातच त्यांचे धाडस समजून येते. केवढा आत्मविश्वास ! कोंढाण्याच्या अवघड खोडी ,किल्लेदाराचा दरारा,शौर्य, सैन्यबळ, शिस्त ,बंदोबस्त तानाजीला काय ठाऊक नव्हता ? तरीही तो म्हणतो की ,मी घेतो गड ! ‘ महाराजांनी तानाजीचे काय कौतुक करायचे ? काळजातल्या माणसाचे कौतुक कोणत्या शब्दाने करायचे ? शब्दच सुचत नाहीत. महाराजांनी तानाजीला विडा दिला.वस्त्रे दिली.आणि निरोप दिला. महाराजांचा आणि आईसाहेबांचा आशीर्वाद पाठीशी घेऊन तानाजी निघाला. समोर कोंढाणा ढगात डोके घुसळत होता .
तानाजीच्या मदतीला प्रत्त्यक्ष त्यांचा सूर्याजी नावाचा पाठचा भाऊ होता. तानाजी सारखा शूर व धाडसी. थोरल्या भावाची ढाली सारखी पाठराखण करणारा. तानाजीने सगळी अगदी जय्यत तयारी केली. गडाची सर्व माहिती तानाजीला होती.पूर्वी गड सुमारे १२ वर्षे स्वराज्यात होता.गडाची बाजू बळकट होती .कामासाठी रात्रच ठरवली.माघ वद्य नवमीची रात काळभोर शेला पांघरून आली होती. गडावरचे चौकी पहारे हुशारीने गस्त घालीत होते.गडाचे दरवाजे बंद होते. मध्यरात्र झाली. गडाच्या पश्चिमेकडील दरीतील काळाकभिन्न अंधार सर्वत्र काजळी धरून बसला. एवढ्या भयंकर पहाडांतून ‘ काट्याकुट्यातून विषारी सापांच्या सांदी – सपाटीतून आणि एवढ्या काळ्या रात्री इथे पाऊल घालायला कोणत्या वाघाची माय व्याली ?
मराठी वाघांची माय व्याली! काजळी अंधारातून मावळे वर गेले. भवानीने पहिले यश दिले. तिथे वर चौक्या-पहारे नव्हते. तानाजीने पाऊल टाकले. एकामागून एक असे तीनशे मावळे वर जाऊन पोहोचले. गडावरच्या शिपायांना चाहूल लागली. कुणीतरी गडावर शिरले याची चाहूल लागतात भयंकर आरडाओरडा उसळला ! तानाजीने, सुर्याजीने हर हर महादेव करून शत्रुची कापाकाप करण्यास सुरुवात केली. शत्रूच्या लोकांना कळेना की मराठे आले तरी कोठोन ?केंव्हा ?आणि आहेत तरी किती? पेंगुळल्या बेसावधपणातून दचकुन उठुन शत्रू धावून आले.
मशाली नाचू ‘ पळू लागल्या .मेहताबा शिलगू लागल्या. आक्रोश, किंकाळ्या ,हाका आरोळ्यांनी गड हादरू लागला. उदयभान बेफान होऊन लढत होता. आजवर इतकी सावधगिरी ठेवून कडक बंदोबस्त राखूनही हे मराठे गनीम गडात घुसलेच कसे? ही माणसे नव्हेच ही ! सैतान आहेत! तानाजी- सूर्याजीने तर कमालीची तोडणी लावली होती. आपल्या पेक्षा शत्रु तिप्पट आहे .घाई करून कापणी केलीच पाहिजे. नाही तर ! मरण आणि कत्तल उडेल सर्वांची.
मराठ्यांच्या समशेरी निर्धाराने वेड्यापिश्या होऊन विजेगत फिरत होत्या .शत्रूचे सैन्य अफाट असूनही मावळ्यांच्या धारेखाली मुंडकी सपासप उडत होती.त्या घोर मध्यरात्रीच्या अंधारात त्या उंचच उंच कोंढाण्यावर मशालींच्या तांबड्या पिवळ्या ज्वाळांच्या धावत्या उजेडात ऊभय बाजूंचे वीर महाभयंकर उग्र रंगपंचमी खेळत होते.
तानाजी आणि उदयभान हे दोघेही भडकलेल्या, वाऱ्याने सैरावैरा भळाळणाऱ्या अग्नीप्रमाणे कमालीच्या शौर्याने लढत होते.आणि त्या युध्दात झुंजणार्या या पिसाळलेल्या दोन सिंहांची अचानक समोरसमोर गाठ पडली.
धरणी हादरू लागली.गड गदगदा हलू लागला.जणू दोन प्रचंड गिरिशिखरे एकमेकांवर कडाडून कोसळली. तलवारीचे भयंकर घाव एकमेकांवर थडकू लागले. दोघेही जबरदस्त योद्धे .कोण कोणाला भारी होता किंवा ऊणा होता हे सांगणे कठीण. एकाच्या अंगी यमराजाच्या रेड्याचे बळ , तर दुसऱ्याच्या अंगी इंद्राच्या ऐरावतीचे बळ. अटीतटीचा कडाका सुरू झाला. दोघेही महारागास पेटले. दात खाऊन व बळ पणाला लावून ते दोघेही एकमेकांच्या इतक्या विलक्षण आवेगाने तलवारीचे घाव घालीत होते की,जर त्यांच्या हाती ढाली नसत्या तर – ? कुणा तरी एकाच्या पहिल्याच घावात दुसर्याच्या चिरफाकळ्या उडाल्या असत्या.
एकाला गड घ्यावयाचा होता.आणि दुसर्याला तो घेऊ द्यायचा नव्हता. दोघांनाही एकमेकांचे प्राण हवे होते.मुघलशाहीची आणि शिवशाहीची सिंहगडासाठी अटीतटीची झुंज लागली होती.
एवढ्यात तानाजीच्या ढालीवर उदयभानचा एक घाव असा कडकडून कोसळला की खाडकन तानाजीची ढाल तुटली ! घात ! आता ? कवच निखळले ! उदयभानला अवसान चढले. बिनढालीच्या शत्रूवर घाव घालून घालून खांडोळी पाडायला उदयभान आसुसला.ढाल तुटली ! ढाल तुटली ! केवढी जिवाची उलघाल उडाली तान्हाजीची.’ दुसरी ढाल समयास आली नाही .’ कोठून येणार? अशा अपघाती संधीचा फायदा मुघलशाहीचा तो मोहरा कसा सोडेल ? तापल्या लोखंडावर लोहार जसा जिवाची घाई करून सपासप घाव घालतो, तसा तो सपासप घाव घालू लागला. तानाजीने आपले मरण ओळखले ! आता कठीण ! त्यांनी हे ओळखूनच आपल्या डाव्या हातावर उदयभानाचे घाव झेलायला सुरुवात केली , आणि स्वतःही उदयभानावर घाव घालायला सुरुवात केली.
दोघांकडूनही अतिशय जोरात खणाखणी – भयानक , भीषण , अति उग्र – झोंब उडाली .डोळ्याची पाती लवायला वेळ लागावा. तलवारीची पाती चवताळून चपळ झाली .रक्त थळथळू लागले.आणि डोळ्याचे पाते लवते न लवते तोच आक्रोश उठला. तानाजीचा वज्राघाती तडाखा उदयभानाला बसला. उदयभानचा शीलाघाती प्रहार तानाजीवर कोसळला ! महाप्रचंड शिखरे एकदमच एकाच क्षणी धरणीवर कोसळली.ढाल असूनही उदयभानला तानाजीने पाडले. स्वतःच्या मरत्या क्षणी राखून ठेवलेला शेवटचा घाव तानाजीने वैर्यावर घातला. एकाच क्षणी दोघेही तुकडे होऊन धरणीवर पडले .तानाजी पडला. मावळ्यांची चढाई जोरात चालू होती. सूर्याची दचकला. घनघोर युद्ध झाले. सूर्याजीने दुःख सावरले. महाराज राजगडावर डोळे लावून बसले असतील .त्यांना त्यांच्या तानाजीचा पराक्रम कळवला पाहिजे .यशाचा सांगावा धाडला पाहिजे.
गडावरच्या ज्वाळा भडकल्या. हात भरून ऊंचीची होळी पेटलेली महाराजांना दिसली. आणि आनंदाने महाराज उद्गारले ,
” गड घेतला ! फत्ते झाली!!”
महाराज सविस्तर खबरीची वाट पाहत होते. बातमीचा जासूद आला. बातमी आली. सुभेदार पडले ? तानाजी मालुसरे गेले ? राजगडला हादरा बसला. एक गड घेतला परंतु एक गड गेला. महाराजांच्या शिरावर सिंहगडाचा कडाच कोसळला. तानाजी गेल्यामुळे महाराजांना झालेले दुःख कशानेच भरून येणे शक्य नव्हते.(गड आला पण सिंह गेला)
लेखन – डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे