गद्धेगळ आणि शिव्या –
वीरगळ, सतीशिळा यांच्या बरोबरीने ‘गद्धेगळ’ हा प्रकार महाराष्ट्रात मोठा आकर्षणाचा विषय आहे. गद्धेगळवर आपल्याला अनेक प्रकारच्या शिव्या कोरलेल्या दिसून येतात.(गद्धेगळ आणि शिव्या) त्यांचे वाचन करणे, हासुद्धा एक गमतीशीर विषय आहे. जसे की, वसई येथे असणाऱ्या गद्धेगळवर
“यस्तु परिपंथी भवेत् तस्य माता गर्दभेन” अशी शुद्ध संस्कृतमध्ये शिवी कोरलेली आहे. या लेखामध्ये नमूद केलेले वर्ष शक 1083 म्हणजे इसवी सन 1161. त्याचबरोबर, पारोडा येथील शिलालेखात
“धर्मु पालि ना तो गाढवु” म्हणजेच, जो धर्माचे पालन करणार नाही तो गाढव, असे सोप्या शब्दात म्हणले आहे.
शक 1075 (इसवी सन 1153) मधल्या एका लेखात
“तेहाचिये माया गाढउ वलघे” अशा शब्दप्रयोग दिसून येतो. सावरगावच्या लेखामध्ये
“जो फेडी तो स्वान गाढवू चांडालू” म्हणजे एकाच वाक्यात कुत्रा, गाढव आणि चांडाळ या तीन शिव्या दिलेल्या आढळतात.
लोणाडच्या लेखात (इसवी सन 1184)
“इथे शासने लिखित भाषा जो लोपी अथवा लोपावि, तो गर्दभनाथु तेहाचिए माए सूर्यपर्वे गर्दभु झवे” या शुद्ध शब्दात शिवी दिल्याचे दिसून येते.. तेही दोन वेळा (आधी गर्दभनाथ म्हणलं आहे, तिकडे दुर्लक्ष करू नका.)
याच्या पुढच्या टप्प्यात जर आपण पाहील, तर अतिशय क्रिएटिव्हपणे शिव्या दिल्याचे आपल्याला आढळते. जसे की, यादव राजा कृष्णाच्या शके 1173 (इसवी सन 1251) एका लेखामध्ये
“तन्माता नवरासभेन रभसा सोपस्करं रम्यते” अशा अलंकारिक भाषेत शिवी दिलेली दिसते. ढेरेंच्या भाषेत म्हणायचं झालं तर हा शिवी देण्याचा अगदी इरसाल नमुना आहे.
दाभोळच्या लेखात “त्यावरि व त्याचे मएवरि गडदो असे” असे म्हणत दोघांचाही उद्धार केलेला आहे.
वेळूसच्या लेखात तर “तेयाचिए माएसि गाडौ घोडू” म्हणजे गाढवासोबत घोड्याचाही उल्लेख केला आहे. माणिकपूरच्या शिलालेखामध्ये
“लुप्यति लोपायन्ति वा तस्य मातरं गर्दभेन झविजे” या शब्दात शिवी दिल्याचे पाहायला मिळते.
एवढंच नाही, तर मिरजेच्या ‘बारा इमाम’ दर्ग्यात “त्याचे बाईलेवरी गाढोऊ” हे वाक्य दिसून येते. विजापूरच्या ‘ताजबावडी’मध्ये
“खर बर झन व मादर-इ-उ सवार बाशद” (आई व पत्नी) असे वाक्य आढळून येते.
शिलाहार तसेच यादव काळात गद्धेगळ कोरण्याचे प्रमाण जास्त असल्याचे त्या लेखांवरून समजते. देवगिरीच्या यादव राज्यकर्त्यांनी कोरलेल्या गद्धेगळवर बऱ्याच ठिकाणी “जो लोपि तेहाचि माये गाढऊ” हे एकच वाक्य वापरल्याचे आढळून येते. इसवी सनाच्या नवव्या-दहाव्या शतकात गद्धेगळ कोरून त्यावर लेख लिहिण्यास सुरुवात झालेली असावी. (अर्थात हे फक्त महाराष्ट्रापुरते सांगता येईल.) अहमदनगरच्या मशिदीत (निजामाच्या काळात, 1565-68) “जो कुणी मन्हा करिल त्याचे मापर गाढव” असे म्हणत ही परंपरा बरीच पुढे (16 व्या शतकापर्यंत) चालू ठेवली.
ढोबळमानाने सांगायचे झाल्यास ‘शिवी’ मानवी स्वभावगुणाचे अंग आहे. राग आल्यानंतरची पहिली प्रतिक्रिया म्हणजे ‘शिवी’. एकप्रकारे हजार बाराशे वर्षांआधी साधे ‘गाढव म्हणणे’ हेसुद्धा हीनपणाचे लक्षण मानले जात असे. आज्ञेचे उल्लंघन करणारा गाढव, कुत्रा या शब्दात दिलेल्या धमक्यांची जरब लोकांवर असावी. एकूणच गद्धेगळ हा अतिशय सुंदर आणि उत्सुकता निर्माण करणारा विषय आहे.
आजच्या शिव्यांची तुलना त्याकाळातल्या शिव्यांसोबत करू नका. वर म्हणल्याप्रमाणे, माणूस अतिशय क्रिएटिव्ह पदार्थ आहे. लेख वाचा, आनंद घ्या. (मीसुद्धा माणूस आहे, हे लक्षात असू द्या 😂😂)
साभार – केतन पुरी.
फोटो साभार – आकाश नलावडे.
टीप – गद्धेगळ आणि त्याच्या एकूणच पसाऱ्यावर ही माहिती केवळ 5-10% असेल. गद्धेगळ उभारणीमागची भावना, हेतू आणि त्याची व्याप्ती फार मोठी आहे, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.