गणपत कृष्णाजी | मराठीतील पहिल्या छापील पंचांगाचे प्रकाशक –
१५ मार्च १८३१ रोजी गणपत कृष्णाजी यांनी शिळाप्रेसवर मराठीतील पहिले पंचाग छापले.
मराठीतील पहिले छापील पंचांग प्रकाशित करणारे गणपत कृष्णाजी हे या पंचांगाच्या शतकोत्तर अमृतमहोत्सवी वर्षांतही दुर्लक्षित राहिले आहेत. गेल्या आठवडय़ात त्या पंचांगाचे शतकोत्तर अमृतमहोत्सवी वर्ष संपले. मात्र याबाबत कोणालाही फारशी माहिती नसल्याने मराठी पंचांगाच्या इतिहासातील ही महत्त्वाची घटना आणि गणपत कृष्णाजी यांचे कर्तृत्व शतकोत्तर अमृतमहोत्सवी वर्षांच्या सांगतेलाही फारसे प्रकाशात आले नाही.
१६ मार्च १८४१ या दिवशी गणपत कृष्णाजी यांनी स्वत: हाताने पंचांग लिहून काढून ते शिळाप्रेसवर छापून प्रकाशित केले होते. छापील स्वरूपातील हे पंचांग सुरुवातीला समाजाकडून स्वीकारले गेले नाही. कर्मठांचा त्याला विरोध होता, मात्र त्यानंतर हळूहळू हा विरोध मावळत गेला आणि छापील पंचांगाचा वापर करायला सुरुवात झाली. त्याचा पाया गणपतकृष्णाजी यांनी घातला हे विसरून चालणार नाही, असे पंचांगकर्ते विद्याधर करंदीकर यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
कालगणनेसाठी सध्या घरोघरी दिनदर्शिकेचा वापर होत असला तरी भारतीय संस्कृतीत पंचांगाला महत्त्व असल्याने आजही तुलनेत कमी प्रमाणात का होईना पण पंचांगाचा वापर सुरू आहे. अर्थात हा वापर ज्योतिषी, ज्योतिष अभ्यासक आणि पंचांगकर्ते यांच्याकडूनच मोठय़ा प्रमाणात केला जातो.
इसवी सन १८३९मध्ये अमेरिकन ख्रिश्चन मिशनऱ्यांनी ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्यासाठी मराठी भाषेत शिळाछापावर पुस्तके छापण्यासाठी छापखाना सुरू झाला होता. ती पुस्तके पाहिल्यानंतर १८४० च्या सुमारास गणपत कृष्णाजी यांच्या मनातही असा छापखाना सुरू करून हिंदूू धर्मविषयक पुस्तके प्रकाशित करावी, असा विचार आला. स्वत:च्या हिमतीवर त्यांनी हाताने लिहून काढलेले मराठीतील पहिले पंचांग प्रकाशित केले. या पंचांगाच्या एका प्रतीची किंमत अवघी आठ आणे इतकी होती.
पूर्वीच्या काळी पंचांगकर्ते किंवा ते जाणणारे लोक त्या त्या गावात किंवा पंचक्रोशीत लोकांच्या घरोघरी जाऊन पंचांगाचे वाचन करत असत. तसेच गुढीपाडव्यापासून पुढे वर्षभरात येणाऱ्या सणांची माहिती वाचून दाखवत असत. त्यामुळे मराठीतील पहिले पंचांग छापून ते प्रकाशित करणे ही पंचांगाच्या इतिहासातील मोठी व महत्त्वाची घटना आहे. मात्र धर्मशास्त्र, खगोल अभ्यासक, पंचांगकर्ते, समाजाकडूनही गणपत कृष्णाजी यांना योग्य तो न्याय दिला गेला नाही. त्यांचे कार्य प्रकाशात आले नाही, याची खंत वाटते. त्यांच्याबाबत फारशी माहिती कोणाला नसल्याने असे झाले असण्याची शक्यता आहे.
– विद्याधर करंदीकर, पंचांगकर्ते
संदर्भ : लोकसत्ता (२७ मार्च २०१६)
संकलन : प्रसन्न ज. खरे.