महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,51,372

लेण्याद्रीचा गणपती गिरिजात्मज व प्राचिन कपिचित बुध्द लेणी

By Discover Maharashtra Views: 4737 10 Min Read

लेण्याद्रीचा गणपती गिरिजात्मज व प्राचिन कपिचित बुध्द लेणी…

अष्टविनायकांपैकी एकमेव गणपती असा आहे की, जो गिरी म्हणजे पर्वताच्या सानिध्यात वास्तव्याला आहे. ते स्थान म्हणजे लेण्याद्री. पुण्यामध्ये जुन्नरपासून सात किलोमीटर अंतरावर लेण्याद्रीचा डोंगर आहे. अष्टविनायकांमधील सातवा गणपती म्हणजे लेण्याद्रीचा गणपती गिरिजात्मज.

लेण्याद्रीचा गणपती गिरिजात्मज :

एकाच मोठ्या आकाराच्या शिळेत या मंदिराची लेणी कोरली आहे.  मंदिराच्या पूर्व व पश्चिम बाजूस २८ लेणी आहेत.  गिरिजात्मज लेण्याद्री मंदिर सात क्रमांकाच्या गुहेत असून, तेथे पाषाणात कोरलेली गणपतीची मूर्ती आहे. समोरील सभामंडप ५१ फूट रुंद आणि ५७ फूट लांब आहे. त्याला कोठेही खांबाचा आधार नाही. ही गुहा अशा प्रकारे बनवली आहे की जोपर्यंत आकाशात सूर्य आहे, तोपर्यंतच प्रकाश आत येत राहणार. गुहेत विजेचा एकही बल्ब नाही.  एकाच मोठया आकाराच्या शिळेत ही २८ लेणी कोरली आहेत.  येथे बौद्ध भिक्खू साठी पाण्याच्या चार टाक्या असून त्यांना वर्षभर पाणी असते. या देवळात येण्यासाठी ३०७ पायरया चढाव्या लागतात.  या गणेश मंदिराला गणेश लेणी असेही म्हणतात.  गणेश लेणीमध्ये कोणत्याही खांबांच्या आधाराशिवाय सभामंडप कोरण्यात आला आहे. सभामंडपाच्या तिन्ही बाजूला ओवऱ्या कोरलेल्या आहेत. यातील उत्तरेकडील ओवरीत श्री गिरिजात्मजाची मूर्ती कोरलेली आहे.  डोंगरात कोरलेले हे मंदिर दक्षिणाभिमुख आहे.  मंदिरात दगडात खोदलेली गिरिजात्मजाची उत्तराभिमुख व ओबडधोबड मूर्ती असून गणेशाची मान डाव्या बाजूला वळलेली असल्याने गणपतीचा एकच डोळा दिसतो.  मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला हनुमान आणि शिवशंकर आहेत. मूर्तीची नाभी आणि कपाळ हिरेजडित आहेत.

गोळेगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत लेण्याद्रीचा गणपती गिरिजात्मज हे गिरीस्थान आहे.  हा भाग गोळेगाव या गावाच्या हद्दीमध्ये आहे. जवळूनच कुकडी नदी वाहते.  कुकडी नदीच्या तीरावर हे लेण्याद्री गाव वसले आहे.

कपिचित बुध्द लेणी : कपिचित बुद्ध लेणी (लेण्याद्री) जुन्नर तालुका जवळपास सर्व बाजूंनी सह्याद्रीच्या डोंगर रांगानी वेढलेले आहे. व याच रांगांच्या अतिशय परीपक्व व मजबुत बेसाल्ट खडकात अनेक बौध्द कोरीव शैलगृह कोरलेली आढळतात.

महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या प्राचीन बुद्ध लेणींना त्याकाळी अतिशय समर्पक अशी नावे देण्यात आली होती. ही नावे डोंगरांची किंवा शहराची, या लेणींच्या वैशिष्ट्याची किंवा या लेणींत राहत असलेल्या बौद्ध भिक्खुंच्या संघाची होती. जसे कि कण्हगिरी बुद्ध लेणी म्हणजे आत्ताची कान्हेरी बुद्ध लेणी (कान्हेरी डोंगर), तिरणहू म्हणजे त्रिरश्मी बुद्ध लेणी (त्रिरश्मी डोंगर)किंवा जाखीणवाडी बुद्ध लेणी (जाखीणवाडी हे कऱ्हाड येथील गावाचे नाव आहे). नंतरच्या काळात म्हणजे १७व्या शतकानंतर महाराष्ट्रातील अनेक बुद्ध लेणींवर अतिक्रमण झाले व काही लेणींचे रूपांतर मंदिरात झाले तर काही अतिक्रमणाच्या प्रचंड विळख्यात अडकले आहेत आणि त्यांना तशी “नवीन नावे” देण्यात आली आहेत.

जुन्नरमधे भारतातील हा सर्वात मोठा बुद्ध लेणीं समूह असून तिथे झालेले कोरीव कामाची संख्या ३२५ आहे! यात चैत्यगृह, विहार, पोढी व लेणीं आहेत. यातील प्रमुख बुद्ध लेणीं समूह म्हणजे “लेण्याद्री बुद्ध लेणीं”. येथीलविहारात मध्यभागी प्रशस्त मंडप असुन तीन बाजुला वेगवेगळ्या आकाराचे २० निवासकक्ष आहेत. या विहारात प्रवेशासाठी दगडात कोरलेल्या पायर्यांचा जीना आहे. जिन्याच्या शेवटी स्तंभ असलेल्या व्हरांड्यातील मधल्या दारातून विहार प्रवेश करता येतो. मध्ययुगातील १७व्या शतकातमागील भिंतीतील दोन निवासकक्ष एकत्र करून भिंतीत कोरलेल्या गणपतीचा आकार देण्यात आला व तिथे “गिरीजात्मज” गणपतीची स्थापना करण्यात आली आहे.  हे पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी व अभ्यासकांनी लिहून ठेवले आहे व भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण देखील हे मान्य करते.  या लेणींचे नामांतर आता “लेण्याद्री” करण्यात आले आहे.

तिथेगुंफा क्र.१४ ही एक चैत्यगृह आहे. पण त्याचा मंडप आयताकार असुन छत सपाट आहे. चैतगृहाला व्हरांडा असून व्हरांड्यात एक शिलालेख कोरलेला आहे. हा शिलालेख ‘कपिलाचा नातू व तपसाचा पुत्र असलेल्या आनंद’ या भक्ताने चैत्यगृसाठी दिलेल्या दानाविषयीचा आहे. या गुंफांचा काळ साधारण इ.स दुसरे शतक आहे.

या लेणींचे मूळ नाव “कपिचित बुद्ध लेणीं” असे होते. त्याचे मूळ कारण म्हणजे या लेणींवर असलेल्या वानरांचा वावर होय! पालि भाषेत कपि म्हणजे वानर किंवा माकड. चित किंवा चिता म्हणजे एकत्रित राहणारे किंवा आवडणारे असा देखील होतो. म्हणजेच “जेथे वानर एकत्रित राहतात” किंवा “वानरांना आवडणारी जागा” म्हणजे कपिचित! आजही या डोंगरावर माकडांचा जथा राहत असतो. प्राचीन काळापासून येथे वानरांचा वावर असावा म्हणूनच त्याकाळी इथे लेणीं कोरणाऱ्यांनी किंवा येथे राहत असलेल्या भिक्खू संघाने या लेणीं समूहाला “कपिचित बुद्ध लेणीं” असे संबोधले होते. येथील शिलालेखात असा स्पष्ट उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. शिलालेखात ‘कपिचित’ म्हणजेच माकडांचे आवडते ठिकाण

या ठिकाणी ४० शैलगृह असून मुख्य ३० शैलगृह पुर्व-पश्चिम रांगेत दक्षिणेकडील जुन्नर शहराकडे तोंड करून आहेत. या ३० शैलगृहांपैकी गुंफा क्र. ६ व १४ हे चैत्यगृह म्हणजेच प्रार्थनास्थळ असून बाकीचे विहार म्हणजे भिक्षुकांची निवासस्थाने आहेत. गुंफा क्र.७ हा खरेतर सर्वात मोठा( प्रशस्त )विहार आहे. बाकिच्या इतर गुंफा(लेणी) विहार लहान असुन काही दोन ते तीन भागात विभागलेल्या दिसतात. या सर्वांचा कालखंड पहिले शतक ते तीसरे शतक असाच गणला गेला आहे. गुफा क्र. ६ हे या गटातील प्रमुख चैत्यगृह आहे. दर्शनी भागात स्तंभ असलेला व्हरंडा असून चापाकृती विधानातील प्रार्थनामंडप स्तंभाच्या दोन ओळींनी तीन भागात विभागलेला आहे. छत गजपृष्ठाकार आहे. गौतम बुद्धाचे प्रतीक असलेला स्तुप मंडपाच्या शेवटच्या भागात आहे. इ.सन दुसऱ्या शतकातील एक शिलालेख व्हरांड्यातील आतल्या भिंतीवर द्वारकमानिवर कोरलेला आहे. या शिलालेखात ‘सुलसदत्त, ह्या कल्याण येथील सोनाराच्या मुलाने दिलेल्या दानाचा उल्लेख केला आहे. गुंफा क्र. ७ ही जुन्नर तालुक्यातील सर्वात मोठी गुंफा(विहार) आहे.

पायऱ्या चढून गेल्यावर प्रथम चैत्यगृहाचे लेणे लागते व त्यानंतरच्या प्रशस्त गुहेमध्ये सभामंडप. बहुतेक सर्व लेण्यांसमोर ओसरी आहे. सहाव्या लेण्यातील चैत्य विहार अजिंठा-वेरूळची लेणी येथील नवव्या लेण्याशी मिळतीजुळती आहे. चैत्यगृहात वैशिष्ट्यपूर्ण अशा पाच खांबांच्या दुतर्फा रांगा आहेत. हे खांब इ.स. पूर्व ९० ते इ.स. ३०० या सातकर्णी कालखंडातील असल्याची नोंद आहे. अष्टकोनी खांबाच्या तळाशी तळखड्यावर व वरच्या टोकाशी जलकुंभाची प्रकृति आहे. जलकुंभाच्या वरच्या भागात चक्रावर वाघ, सिंह, हत्ती यांच्या शिल्पाकृती कोरलेल्या आहेत. छताला अर्ध गोलाकार फिरणाऱ्या लाकूडसदृश कमानी कोरल्या आहेत. चैत्यगृहाच्या मध्यवर्ती घुमटाकार सहा फूट सभामंडप हे साडेचार फूट उंच जोत्यावर एकसंध कोरलेले आहे.

सातवे लेणे थोडे उंचावर असून, जुन्नर लेण्यातील सर्वांत प्रशस्त लेणे आहे.  या लेण्यामध्ये गिरिजात्मज गणपती मंदिर आहे.

या कपिचित बुद्ध लेणी समूहात २ चैत्यगृहे, २८ विहार, पाण्याची १५ कुंडे आणि ६ शिलालेख आहेत.

लेणी परीसर पुरातत्त्व विभागाच्या अधिकारात पुरा आहे. मंदिरात प्रवेशासाठी पुरातत्त्वविभाग पाच रुपये शुल्क आकारते.

गिरिजात्मजाची अख्यायिका :

गिरिजात्मज नावाने पूजनीय असलेल्या लेण्याद्री गणेशाच्या जन्माच्या विविध आख्यायिका सांगितल्या जातात. गिरीजा म्हणजे पार्वती, आत्मज म्हणजे मुलगा.  गजाननाची पुत्र म्हणून प्राप्ती व्हावी म्हणून या गुहेत पार्वतीने बारा वर्षे तपश्चर्या केली व गणेशाच्या पार्थिव मूर्तीची पूजा केली. त्यानुसार भाद्रपद चतुर्थीस सचेतन होऊन बटुरुपात तो प्रकट झाला तेव्हा त्याला सहा दात व तीन नेत्र होते. गौतम ऋषींचा गणेशास येथे लाभ झाला. सतत १५ वर्षे गणेशाने येहते वास्तव्य केले म्हणून या क्षेत्राचे महात्म्य थोर आहे.

मंदिरात साजरे केले जाणारे सण व उत्सव :

दर्शनाची वेळ सकाळी ६ ते संध्याकाळी ६ आहे. या मंदिरात दररोज सकाळी पंचामृत पूजा केली जाते. ही पूजा अतिशय महत्वाची आहे.

इथे भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थी साजरी केली जाते. बैलगाड्यांची शर्यत हा या उत्सवाचा एक लोकप्रिय भाग आहे. गणेश जयंतीचा उत्सव माघ प्रतिपदा ते माघ षष्टी पर्यंत साजरा केला जातो. या आठवड्यात मंदिरात अखंड हरीनाम साप्ताह आयोजित केला जातो.

गणेशोत्सवात या ठिकाणी साजरा होणारा विशेष उत्सव म्हणजे देवजन्मकीर्तन सोहळा. गणेश प्रतिष्ठापनेदिवशी सकाळी १० वाजता देवजन्माचे कीर्तन होते. भाविक या कीर्तनासाठी आवर्जून उपस्थित असतात. कीर्तन झाल्यानंतर अन्नप्रसादाचे वाटप केले जाते. गणेशोत्सवामध्ये मंदिराच्या गर्भगृहात फुलांची आकर्षक सजावट केली जाते. या काळात परिसरातील हजारो भाविक दर्शनासाठी मंदिरात हजेरी लावतात.

रहाण्याची व जेवणाची सोय :

लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट मार्फत यात्री निवास चालविले जाते.  येथे भक्तांना रहाण्यासाठी सशुल्क रुम भेटतात.  यात्री निवासात धरते जवळ जवळ ३०० लोकांची सोय होऊ शकते.  दहा लोकांची क्षमता असलेल्या खोलीला २०० रू भाडे आकारले जाते.  ट्रस्टतर्फे बेड दिल्या जातात.  हाॅटेल गिरीजामध्ये जेवणाची उत्तम सोय आहे.  जुन्नर मध्ये अजून इतरही जेवणाची हॉटेल्स आहेत.

पुणे व मुंबई पासून लेण्याद्री अंतर :

मुंबई-कल्याण-माळशेजघाट-मढ-लेण्याद्री १८० कि.मी.

पुणे-नारायणगाव-जुन्नर-लेण्याद्री १४० कि.मी.

स्थान : पोस्ट गोळेगाव, तालुका जुन्नर, जिल्हा – पुणे, पिन.को. ४१० ५०२.

पुणे येथील शिवाजीनगर एस.टी.बसस्थानकातून कपिचित बुद्ध लेणी येथे जाण्यासाठी एस.टी.बस सेवा उपलब्ध आहे.

लेण्याद्रीपासून इतर अष्टविनायकांचे अंतर :

ओझर १७ कि.मी, रांजणगाव १२० कि.मी, मोरगाव १५५ कि.मी, थेऊर १३२ कि.मी, सिद्धटेक १८० कि.मी, महड १३५ कि.मी, पाली १७५ कि.मी

लेण्याद्री जवळची इतर पहाण्यासारखी ठिकाणे :

१) ओतूर- पुरातन कोपर्दीकेश्वर मंदिर व संत तुकाराम महाराजांचे गुरु बाबाजी चैतन्य स्वामी यांची संजीवन समाधी.

२) माळशेज घाट : थंड हवेचे ठिकाण व अभयारण्य.

३) शिवनेरी किल्ला : शिवाजी महाराजांचे जन्मस्थान.

४) कुकडेश्वर : कुकडी नदीच्या उगमाजवळील कुकडेश्वर मंदिर.

५) नाणेघाट : प्राचीन राजमार्गावरील ऐतिहासिक घाट.

माहिती साभार -Yogesh Bhorkar

Leave a Comment