सरदार अंताजी माणकेश्वर गंधे गढी, कामरगाव –
अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील कामरगाव या गावी पानिपतवीर सरदार अंताजी माणकेश्वर गंधे यांची गढी म्हणजे भव्य वाडा आहे. पुणे-नगर महामार्गावरून गावाची वेस आणि हे वाडे नजरेस पडतात. पुण्यापासून ९० कि.मी अंतरावर आहे. सद्यस्थितीत गावाची वेस असलेले बुरूज, तटबंदी पहायला मिळते. आत गावात असंख्य पेशवेकालीन वाडे आहेत. त्यामध्ये गंधेंचा वाडा आहे आणि गावचे पाटील आंधळे-पाटील यांचा सुस्थितीतील वाडा आहे. आंधळे हे पूर्वीपासून गावचे पाटील होते हे अंताजींनी सदाशिवभाऊना इ.स. ७/११/१७५० ला लिहिलेल्या पत्रात उल्लेख आढळतो. गावात एक बुरूज आहे त्यावर शिलालेख दिसून येतो. जवळच एका मंदिरात सुंदर अशी बाळकृष्णाची पाषाणातील मुर्ती आहे. पुरातन बारव आहे.सरदार अंताजी माणकेश्वर गंधे गढी.
अंताजी गंधे हे कर्तृत्ववान होते. सुरवातीला छत्रपती शाहूमहाराजांकडे होते नंतर चिमाजी आप्पांची मर्जी हुशारीने संपादन केली.चिमाजी अप्पांनी त्यांना माळव्यावरील स्वारीत पराक्रम दाखविण्याची संधी दिली. त्या संधीचे त्यांनी सोने केले. बाजीराव पेशव्यांनी बुंदेलखंडाच्या स्वारीत त्यांना सामील करून घेतले. त्यांनी गोविंद बल्लाळ यांची बाजीरावांकडे कमावीसदार पदासाठी शिफारस केली. इ.स.१७३३ मध्ये त्यांच्या शिफारसीनुसार गोविंद बल्लाळ हे बुंदेलखंडाचे सर्वेसर्वा झाले. ‘सागर’ नावाचे शहर त्यांनी वसविले.
मराठ्यांच्या बंदोबस्तासाठी दिल्लीच्या बादशहाने इ.स. १७३० च्या सुमारास महंमदशहा बंगश याची नेमणूक केली. बुंदेलखंडाप्रमाणेच मराठ्यांचा निःपात करण्याच्या कामास तो लागला. इ.स. १९/५/१७३१ रोजी बंगश उज्जैनीस आला. त्याला अंताजी माणकेश्वर सामोरे गेले. पण त्याचा पराभव झाला. अंताजींस उत्तरेकडील राजकारणात शिंदे-होळकरांप्रमाणे सेनापती म्हणून महत्त्व प्राप्त झाले. दिल्लीला ७००० स्वारांचे ते मनसबदार होते. दिल्लीच्या राजकारणात त्यांनी फार मोठी कामगिरी केली. बादशहाकडून त्यांना इटावा व पुफुंब हे परगणे मिळाले. इ.स. १७५५ मध्ये ते दत्ताजी शिंदे यांचेकडे गेले. अंताजी गंधे व हिंगणे बंधू हे लष्करी अधिकारी मराठ्यांचे दिल्ली दरबारी राजकारण सांभाळणारे अत्यंत मातब्बर असे वकील होते. हिंगणे यांचा तेथे अधिक वकूब होता. अंताजी हे लष्करी बाण्यात अत्यंत धाडसी वृत्तीचे तसेच बोलण्यात व लिहिण्यात चतुर होते.
इ.स. १७५७ मध्ये अब्दालीला त्यांनी चांगलाच हात दाखविला.उत्तरेत ग्वाल्हेरच्या बाजून लढणारे अंताजी हे एकमेव मराठा सरदार होते. सुरजमल जाट व अंताजी या दोघांनी अब्दालीला तोंड दिले. पानिपतवर लढताना मल्हारराव, विठ्ठल शिवदेव, तानाजी गायकवाड, सटवोजी जाधव, साबाजी शिंदे, अंताजी माणकेश्वर, गंगोबा तात्या चंद्रचूड हे साठीच्या वरील वीर जखमी होऊन रणांगणातून बाहेर पडले. नंतर बाजी हरि, नाना पुरंदरे रात्री चालले असता दांडग्यांच्या हुल्लडीत फारुकाबादच्या जमीनदाराकडून बाजी हरी व अंताजी माणकेश्वर ठार झाले. जदुनाथ सरकार हे बंग इतिहासकार त्यांचा गौरव करताना म्हणतात: “अंताजी माणकेश्वर हा तलवार व लेखणी दोनही कुशलतेने चालवणारा पुरुष पानिपतावर गारद झाल्यामुळे इतिहासाची हानी झाली आहे.”
दिल्ली दरबारी एक मुत्सद्दी वकील म्हणून चमकलेल्या या वीराने आपली गावची आठवण मात्र कायम ठेवली. त्यांनी गावी कोट बांधला. त्यांच्या पत्रावर खालील मुद्रा पाहण्यास मिळते
“मुद्रषाशंभुचरणद्वद्वनिष्ठस्य सर्वदा
माणिकेश्वर संभूत अनन्तस्य विराजते”
आपल्या मूळ मातीची कामरगावची व आपल्या मूळ कुलकर्णीपदाची मात्र त्यांनी आठवण जपली. राशिन येथील श्री अंबिका मंदिरात त्यांनी दीपमाळ उभारली. या दीपमाळेवरील शिलालेखात ते म्हणतात
‘अंताजी माणकेश्वर गाव कामगार कामरगावकर’
साभार – डाॕ सदाशिव शिवदे सर
टीम – पुढची मोहीम