श्री गणेश मंदिर, शास्त्री रोड –
पुण्यामध्ये अनेक प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिर आहेत. त्या पैकीच एक शास्त्री रोडवर आहे. गांजवे चौकातून अलका_टॉकीज कडे जाताना, पूना हॉस्पिटलच्या सिग्नलच्या अलीकडे हे मंदिर आहे. मंदिर एका बैठ्या घरासारखे असल्यामुळे चटकन लक्षात येत नाही. पण नीट पाहिल्यावर श्री गणेश मंदिर श्री दत्त मंदिर अशी पाटी दिसते. सदर मंदिराचा अलीकडच्या काळात जीर्णोद्धार झालेला दिसतो. पण मूळ मूर्ती अंदाजे २०० ते २५० वर्ष जुनी आहे.
सभामंडपात अष्ट विनायक आणि विविध देवतांचे फोटो लावलेले आहे. समोर छोटेखानी गाभारा आहे. गाभाऱ्यात अंगाच्याच सुंदर महिरपीमध्ये असलेली गणपतीची शेंदूरचर्चित दगडी मूर्ती आहे. मागचे संगमरवराचे काम नंतरच्या काळातील आहे. सदर मूर्ती चतुर्भुज असून गणपतीच्या एका हाती पाश, एका हाती अंकुश, एका हातात मोदक, तर एक हात आशीर्वाद मुद्रेत आहे. हे मंदिर दिवसभर भाविकांसाठी खुले असते. या मंदिराच्या शेजारीच एक छोटेसे श्री दत्त मंदिर ही आहे. या दोन्ही मंदिरांची व्यवस्था श्री गणपती मंदिर पब्लिक ट्रस्टतर्फे पाहिली जाते. दैनंदिन पूजेसह गणेशोत्सव, गणेशजन्म या वेळी इथे विशेष पूजाअर्चा केली जाते. तसेच चतुर्थीलाही पूजा-आरती होते.
पत्ता : https://maps.app.goo.gl/ywL5SKQYTPrjm4jp8
आठवणी इतिहासाच्या