महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,33,476

मराठेशाहीची गणेशभक्ती

By Discover Maharashtra Views: 1307 3 Min Read

मराठेशाहीची गणेशभक्ती –

गणपति, प्राचीन काळापासून ज्याची आराधना होत आहे, असे दैवत. त्याच्या विविध गुणधर्मांमुळे त्याला विविध नावे आहेत. त्याचे उदर मोठे आहे म्हणून लंबोदर, सोंड वाकडी आहे म्हणून वक्रतुंड, एक दात तुटलेला आहे म्हणून एकदंत अश्या अनेक नावांसह यजुर्वेदात त्याला गणपति अर्थात प्रजापति तसेच प्रियपति अश्या विशेषणांनी संबोधिले आहे. ह्याच गणपतीच्या भक्तीचे उल्लेख शिवकाळापासून ते पेशवेकाळापर्यंत विस्तारलेल्या मराठेशाहीतही येतात.(मराठेशाहीची गणेशभक्ती)

जिजाबाईंसोबत शिवाजी महाराज प्रथमतः पुण्यात आल्यावर उजाड झालेल्या पुण्याचे रूपडे त्यांनी पालटले. त्यावेळी एका गणपतीची मूर्ती  त्यांना आढळली. पुण्याप्रमाणेच मूर्तिही उजाड झालेली होती. जिजाबाईंनी त्या मूर्तिची विधिवत प्राणप्रतिष्ठा केली. हा गणपति होता, विनायकभट ठकार यांचा! ह्या गनपतिच्या व्यवस्थेसाठी शिवाजी महाराजांनी रोज अर्धाशेर तेलाची व्यवस्था केली होती. यासंबंधी त्यांचे १९ मार्च १६४६ (फाल्गुन व. ९, शके १५६८) चे पत्र उपलब्ध आहे. पुढे शके १६४२, इ.स.१७२० साली शाहू महाराजांनी  ह्या गणपतिच्या नैवेद्य व नंदादीपाची  व्यवस्था लाऊन दिली होती. कृष्णाजी अनंत सभासद शिवाजी महाराजांच्या गडांची नावे देतांना त्यात गणेशगडाचाही उल्लेख करतो, त्यावरून महाराजांची गणेशभक्ती अधोरेखित होते. याचसह पर्णालपर्वताख्यानात गणपति, सरस्वती व गुरु यांना नमस्कार करून शिवाजीने पन्हाळगड घेतला, असा उल्लेख ग्रंथारंभीच येतो.

छत्रपति संभाजी महाराजांनी लिहिलेल्या बुधभुषण ह्या ग्रंथात ते अगदी आरंभीच गणपतीची महती वर्णितात. छत्रपति राजाराम महाराजांनी ‘स्वामी व स्वामीच्या राज्यकल्याणार्थ’ तसेच पूजा, नैवेद्य नियमित चालावे म्हणून श्यामजी नाइक पुंडे याच्या विनंतीवरुन अष्टविनायकातील मोरगाव इनाम दिले. राजाराम महाराज म्हणतात, “…..श्री–स्थळ मौजे मोरगांव ता|| कऱ्हे पठार प्रा|| मा|| हे देवस्थान बहु जागृत स्थळ आहे………श्री–अष्टविनायकांमध्ये आध्यस्थळ थोर सिद्धीस्छाने यैसे जाणोन स्वामीस व स्वामीच्या राज्यास कल्याणार्थ श्री–परमेश्वर प्रीत्यर्थ नूतन इनाम मौजे मोरगांव ता|| कऱ्हे पठार……”

पुढे पेशव्यांची गणेशभक्ती तर सर्वश्रुत आहेच. पेशव्यांनी शनिवारवाड्याच्या  मुख्य दरबाराच्या स्थळाला ‘गणेश महाल’ किंवा ‘गणेश रंगमहाल म्हटले. शनिवारवाड्याच्या एका द्वाराला ‘गणेश दरवाजा’ असे नाव होते.

इ.स. १७४६ साली गोपिकाबाईंना डोळ्याचा त्रास झाला. म्हणून  रांजणगावच्या गणपतीला नवस केला आणि काही काळाने तो नवस पूर्णही केला. इ.स. १७५४ साली थेऊरच्या गणपतिच्या दर्शनास  सदाशिवराव भाऊ ‘घोडियाचे रथात’ बसून दर्शनास जाण्याची नोंद आहे. त्यांच्याच काही दिवसानंतर शके १७७६ इ.स. १७५४ मध्ये नानासाहेबही  थेऊरच्या दर्शनास गेले. अर्थात अश्या नोंदी अनेक आहेत. इ.स. १७९७-९८ मध्ये दूसरे बाजीराव गणपति विसर्जनासाठी पायी गेल्याची नोंद आहे. नेहमी ते हत्तीवर जात.

अश्याप्रकारे प्राचीन काळापासून आराध्य मानलेल्या गणपतीची सेवा मराठेशाहीतही अव्याहतपणे सुरु होती.

©अनिकेत वाणी

Leave a Comment