महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,26,038

गंगा गोरजेश्वर शिव मंदिर, मढ

By Discover Maharashtra Views: 1840 14 Min Read

गंगा गोरजेश्वर शिव मंदिर, मढ –

पाण्यातील एक अदभूत वैभव –
“काळू नदी तीरी असे त्रिवेणी संगम
त्यावरी गंगा गोरजेश्वर शिव मंदिर
असे सदा जलात अदृश्य शिवलिंग
नमन तुजला माझे हे शिव शंकर”

“शिव” एक हिंदू धर्मातील महत्त्व पूर्ण अशी देवता आहे. शिवाला आपण महादेव, शंकर, भोलेनाथ, महेश, उमापती अशा विविध १०८ नावाने ओळखतो. शिरेवरी जटा त्यावरी गंगा, भाळी चंद्र, नेत्र तिसरे, गळ्यात नाग, अंगास भस्म, करी असे त्रिशूल व डमरू, बैसावयास व्याघ्राचे चर्म आसन , समोर नंदी वाहन असे हे अलौकिक रूप धारण केलेला शिव म्हणजे जगाचे कल्याण करणारा देवता. माझ्या सारख्या अज्ञानीने ह्या देवता बद्दल काय बोलावे तेवढे ज्ञान माझ्याकडे नाही. चारही वेदा पासून रामायण व महाभारत ते आज पर्यंत शिवाला पुजले जाते अगदी ही सृष्टी असे पर्यंत पुजले जाईल. शिवाची पूजा ही त्याच्या लिंग स्वरूपात केली जाते. अशा ह्या शिवाची बारा जोतिर्लिंग आहेत त्यातील पाच ही आपल्या महाराष्ट्र मध्ये आहेत व इतर ही स्वयंभू लिंग पहायला मिळतात. आपले पूर्वज, हिंदू धर्मीय राजे हे शिवाचे उपासक होते त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात शिवाची मंदिरे बांधली. आज अनेक किल्यावर आपल्याला शिवलिंग पहायला मिळते. अशाच एका पुरातन स्वयंभू शिवमंदिराची सफर आपण आज करणार आहोत.गंगा गोरजेश्वर शिव मंदिर.

ठाणे जिल्यातील शहापूर तालुक्याच्या अगदी सीमेवर असलेल्या  मढ ह्या गावी हे पुरातन शिवमंदिर आहे. काळू नदीच्या त्रिवेणी संगमावर हे स्वयंभू शिवमंदिर वसले आहे. माळशेज घाटाच्या वरती असलेल्या अंबा जोगाई धरणाच्या बाजूला असलेल्या खिरेश्वर येथून उगम पावलेली ही नदी आंबिवली येथे भातसा नदी ला घेऊन उल्हास नदीला जाऊन मिळते. पूर्वी ह्या मंदिराला गोराई असे म्हणत व पुढे जाऊन गंगा गोरजेश्वर शिव मंदिर म्हणून हे अवघ्या पंचक्रोशीत प्रसिद्ध पावले आहे. महाशिवरात्री दिवशी येथे मोठी यात्रा भरते तेव्हा फार मोठ्या प्रमाणात येथे शहापूर, कल्याण मुरबाड, भिवंडी तालुक्यातील भाविक येत असतात. तसेच येथे अखंड हरिनाम सप्ताह ही होतो. टिटवाळा येथील प्रसिध्द असलेल्या सिद्धिविनायक महागणपती पासून अवघ्या ९.५ किमी अंतरावर हे मंदिर आहे.

एकाच दिवशी ही दोन्ही मंदिरे पाहता येतात. येथे कसे यायचं ते पाहू आता, मध्य रेल्वेच्या टिटवाळा किंवा खडवली ह्या दोन्ही रेल्वे स्थानका वर उतरून दरडोई तीस रुपये देऊन फळेगाव साठी रिक्षा पकडावी. कारण मढ ह्या गावापर्यंत थेट रिक्षा जात नाही. आपण थेट मंदिर पर्यंत आधीच भाडं ठरवून गेला तर चांगलेच. दुसरं साधन म्हणजे टिटवाळा ते वासिंद व मुरबाड ते असोसे ह्या मार्गावर धावणारी आपली सर्वांची लाडकी लालपरी म्हणजेच बस ने ही आपण मढ ह्या गावांपर्यंत येऊ शकतो. जर का आपण खाजगी वाहनाने आलाच तर अधिक उत्तम टिटवाळा/खडवली रेल्वे स्थानक ते मंदिर हे अंतर १२ किमी इतके आहे. आपण आपल्या ठिकाणापासून गुगल मॅप वरून आपला मार्ग शोधून घ्यावा.

गावात आल्यावर येथे अतिशय देखणं असे एक विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे हे आपण जरूर पहावे. मढ गावापासून हे मंदिर १ किमी अंतरावर आहे. येथे एक महत्वाची माहिती देतो की सातवाहन कालीन जो कल्याण ते जुन्नर असा एक व्यापारी मार्ग होता त्या मार्गावर हे गाव वसले आहे. येथे एक चौकीचा खडक आहे तो आजही आपल्याला दिसतो. त्यामुळे ह्या गावाचा इतिहास हा थेट २००० वर्ष मागे जातो. याच मार्गाने पुढे आल्यावर गोशाळा दिसेल त्यापुढे एक छोटासा मठ आहे. ह्या मठा समोरच असलेल्या झाडाखाली सात ते आठ वीरगळ शिळा ठेवल्या आहेत. त्यातील एक शेंदूर लावलेली शिळा सुस्थितीत तर बाकीच्या तुटलेल्या अवस्थेत आहेत. ही बहुदा विरगळ असावी. ह्या शीळांमध्ये एक स्त्रीचा हात असलेली शिळा आहे त्या शिळेला सतीशीळा म्हणतात. बाकी भग्न झालेल्या आहेत. अशाच प्रकारच्या शिळा मढ गावापासून ६ किमी अंतरावर असलेल्या चिखले ह्या गावाच्या शेजारी काळू नदीच्या कडेला अशा प्रकारच्या वीरगळ पहायला मिळतात. मग ह्या वीरगळ पाहता ह्या ठिकाणी पूर्वी कोणती लढाई झाली होती का याचा विचार समोर येतो. कारण  हया शिळा त्या लढाईच्या पुरावा ही असू शकतात. ह्या परिसरात अशा अजून काही वीरगळ आहेत का यासाठी माझा शोध सुरू आहे. ह्यावरून हा परिसर फार पुरातन आहे याचं हे पहिलं वैशिष्ट्य  आहे.

थोडं पुढे गेल्यावर काळू नदीचे पात्र लागेल व समोरच असलेल्या ह्या मंदिराचे दर्शन होते. नदी पात्रात उतरण्यासाठी ५० पायऱ्या उतरून जावे लागते. येथे आपण कोणत्याही महिन्यात दर्शनासाठी नाही येऊ शकत त्याची माहिती देतो आधी. हे मंदिर नदी पात्रात असल्याने पावसाळ्यातील जून ते ऑगस्ट महिन्यात जास्त पाऊस असतो तेव्हा हे पात्र पूर्णपणे भरले जाते व मंदिर हे सभामंडप पर्यंत बुडालेले असते. आहे ना काहीतरी वेगळेपण ह्या मंदिराचे. श्रावण महिन्यानंतर पावसाचे पाणी कमी कमी होत जाते. परंतु त्यावेळी ही फार कष्ट घेऊन प्रसंगी पोहून मंदिरापर्यंत जावे लागते. म्हणून हे मंदिर व्यवस्थित पहायचे असेल तर फेब्रुवारी ते जून महिन्यात पाऊस पडण्याआधी यावे. मंदिराच्या वेगळेपणाचे ही दुसरं वैशिष्ट्य. विशेष म्हणजे पावसाळ्यात ह्या ठिकाणी होडी ने देखील जाता येते. दोनशे तीनशे रुपयात पूर्ण नदी परिसर व मंदिर फिरवतात हा अनुभव आपण जरूर अनुभवावा.

नदी पात्राचे पन्नास फूट इतके अंतर पार केल्यावर आपल्याला समोर पूर्व -पश्चिम दिशेला स्थित हे मंदिर दिसते. समोर सभामंडप व गोलाकृती कळस असलेले हे मंदिराचे बांधकाम हे पुरातन नसून अलीकडचे 30 वर्ष आधीचे आहे. ज्या ठिकाणी गाभारा आहे त्या ठिकाणी फक्त मोठं मोठ्या दगडी शिलांचा हौद स्वरूपात बांधकाम होत. त्या पैकी काही शिळा ह्या या आजही ह्या नदीपात्रात पहायला मिळतात. साधारण १५ x ४०फूट असलेलं मंदिराला १५ x २० आकाराचे सभामंडप आहे . त्यात मधोमध शिवाच वाहन असलेला एक चौथऱ्यावर  दगडातील आकर्षक असा नंदी आहे आहे व त्याखाली कासवाची शिल्प असलेली शिळा आहे. दोन्ही बाजूस दोन कोनाडे असून त्यात गणपती व पार्वती अश्या मूर्ती ठेवल्या आहेत. गाभाऱ्यात जाण्यासाठी पुन्हा दहा पायऱ्या उतरून जावे लागते. गाभारा हा १२x१२ आकाराचा व साधारण २० फूट उंचीचा घुमूटकार आहे. येथे मात्र ह्या मंदिराच्या तिसरं वैशिष्ट्य दिसते ते म्हणजे हा गाभारा वर्षभर पाण्याखाली असतो. येथील शिवलिंगावर कायम पाण्याचा एक जिवंत झऱ्याने गंगा सारखा अभिषेक होतो म्हणून ह्या मंदिराला गंगा गोरजेश्वर असे नाव पडले. महाशिवरात्री दिवशी गावकरी ह्या गाभाऱ्यातील पाणी बाहेर काढतात.

नदीच्या पात्राच्या पाण्याची पातळी घेऊन गाभाऱ्यातलं पाणी नदीपात्रात सोडण्याची सोय ह्या ठिकाणी केली आहे याच मला फारच कौतुक वाटलं. महाशिवरात्री आधी आलात तर गाभाऱ्यात तीन चार फूट पाणी असते. पाण्यात सदा बुडालेली शिवपिंडी पाहताना मात्र आपण फार आवक होतो. गाभाऱ्यात उतरल्यावर शिवपिंडीला नमन करावे व त्यानंतर शिवपिंडीत एक फूट आत हात घालावे. हे सांगायला तेथे कोणी नसणार आहे म्हणून ह्या ठिकाणी मी सांगत आहे. ज्या कारणासाठी आपण येथे आला आहात ते सार्थक होते आपल्याला त्रिकोणी आकारातले काळ्या पाषाणातील शिवलिंगाचा स्पर्श होतो व आपल्याला धन्य झाल्यासारखे वाटते. शिवलिंगाचे दर्शन घेतल्यावर समोरच मधोमध एका छोट्या चौथऱ्यावर लोहधातूची बनवलेली नागाची प्रतिकृती ठेवली आहे.

शिवपिंडी वर अभिषेक व्हावा ह्या साठी वर कलश ठेवला आहे. नागाच्या वरच्या बाजूस एक कोनाड्यात पार्वतीची मूर्ती आहे. अजून एक सांगेन की ह्या गाभाऱ्यात नीट पाहिले असता आपल्याला नंदी ची पाऊले उमटलेली दिसतात. हे आपण निरखून पाहावे. तसेच गणपतीची सोंड असलेली कातळात कोरलेली मुर्ती दिसते. तसेच त्रिशूल व धनुष्य ही दिसतात परंतु जेव्हा हा गाभारा पूर्ण पणे कोरडा आणि स्वच्छ असेल तेव्हाच. हे सर्व सांगितलेले आपण नीट निरखून पहावे. असे हे शिवाचे विलक्षण ठिकाण आपल्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण करतं. दर्शन घेतल्या नंतर लगेच माघारी फिरून परतून जाऊ नका .थांबा थांबा अजून खूप काही वेगळं पाहण्यासारखं आहे येथे .

दर्शन घेतल्यावर सर्व प्रथम मंदिराच्या दक्षिण बाजूस असलेल्या काळू नदीच्या पात्राच्या दिशेला जावे. इथे वनराईने नटलेला विलोभनीय परिसर न्हाहाळावा. थोडा वेळ निसर्ग सौंदर्याने नटलेल्या ह्या परिसरात रममाण व्हावे. समोरच नदी पात्रात उंबर ह्या झाडा सारखी दिसणारी पण चवीने गोड अशी वैशिष्ट्य पूर्ण जांभळाची झाडे आहेत. ह्या जांभळाची चव चाखायची असेल तर मे महिन्याच्या अखेरीस यावे. पोहण्याचे ज्ञान असेल तरच पात्रात पोहण्याचा आनंद घ्यावा. कारण हे पात्र खोल आहे. मंदिरापासून ते नदीपात्रा पर्यंत आता संपुर्ण लादी बसवली आहे. हे ह्या मंदिराची शोभा अजून वाढवते. येथून छान फोटोग्राफी करावी अर्थातच हे तुम्हाला सांगायला नको. हे पाहिल्यावर मंदिराच्या उत्तरेकडे असलेल्या एका कुंडाकडे जावे. ह्या कुंडाला गोमुख असे म्हणतात. साधारण १०x१० च्या आकारातले विटांनी बांधलेलं हे कुंड आहे. ह्या कुंडात दरवर्षी नदीच्या प्रवाहाने गाळ साचतो. ह्या कुंडात त्याच्या पाठीमागे असलेल्या छोट्याश्या टेकडीमधून असंख्य जिवंत झरे आहेत ह्या सर्व झऱ्यातील पाणी एकत्र खाली आणण्यासाठी ह्या ठिकाणी आता एक छोटासा पाईप लावण्यात आला आहे. वर्षभर अशा प्रकारे ह्या गोमुखातून पाणी येत असते हे ह्या मंदिराचं पाचवं वैशिष्ट्य. महाशिवरात्री दिवशी ह्या गोमुखातील पाणी भाविक गंगा म्हणून आपल्या घरी नेतात.

हे पाहिल्यावर एक छोटीशी टेकडी आहे ती चढून गेल्यावर जंगल लागेल. पूर्वी असलेल्या एका मठाच्या जोत्याचे अवशेष दिसतात व मधोमध हवनकुंड दिसते. पण ते आता  झाडीने वेढले आहे. तीस वर्ष आधी आलेल्या मोठया पुरामध्ये हा मठ वाहून गेला. इथे काही साधू राहत होते ते ह्या मठात होम हवन करत असे. हे पाहिल्यावर अजून थोडे पुढे चालत गेल्यावर नदीच्या पात्राला लागून एकमेकांना लागूनच असलेली पाच कुंडे दिसतात. दगडी चिऱ्यात बांधलेली ही पाचही कुंड पाहण्यासाठी दगडी पायऱ्या देखील बांधल्या आहेत. ५ x ५ फूट आकाराची व तीन ते चार फूट खोल असलेली ही कुंडे सध्या मातीने भरलेली आहेत. येथील कुंडे पावसाळ्यात पुरेपूर भरून जातात. एक विशेष सांगतो की हे पाण्याची कुंडे साध्या नाहीतर गरम पाण्याचे कुंड आहेत. आहे ना हे पण विशेष. हे गरम पाण्याचे कुंड म्हणजे ह्या मंदिराचे सहावं वैशिष्ट्य.

थांबा अजून इथलं वैभव पहायचं आहे जायची घाई करू नका. हे पाहिल्यावर त्याच जंगलातून पुढे निसर्गाची किमया व कोरीवकाम पाहण्यासाठी जावं. पण एक अट आहे सोबत येथील वाटाड्या घेऊन जावा. कारण आपण जे पाहायला जाणार आहोत ते फार धोकादायकही आहे. आधी मी सांगितल्या प्रमाणे हे मंदिर त्रिवेणी संगमावर वसलेलं आहे. त्यातील जो मधलं पात्र आहे ते फार अरुंद आहे व ह्या ठिकाणी खूप रांजणखळगे आहेत म्हणजे नदीच्या पाण्याच्या प्रवाहाने तयार झालेले निसर्गनिर्मित खोळगट असे खळगे. इथले स्थानिक यांना सात कुंड असे म्हणतात. इथे सात पेक्षा जास्त कमी अधिक खोलीचे हे खळगे पहायला मिळतात. काही खळगे एका सरळ रेषेत तयार झालेले आहे. दोन फूट व्यासाचे हे खळगे असून काही सहा फुटापर्यंत खोल आहेत. ह्या पात्रात सर्वात खाली असलेले हे खळगे  एका ठिकाणी मात्र एवढे खोल आहे याचा अंदाचाच न लावलेला बरा.

पूर्वी चे लोक सांगतात की, एका बाजेला(खाट) जेवढा काथ्या लागतो ना तो एखाद्या दगडाला बांधून खाली सोडला तरी पुरत नाही एवढं खोल हे कुंड आहे. म्हणून येथे येताना सावधपणे यावे. हे सर्व पाहिल्यावर पूर्व दिशेला एक निर्सगनिर्मित लांब आकाराची दहा फूट  उंचीची एक कातळ भिंत तयार झालेली आहे. जणू एखाद्या सराईत कारागिरांनी छिनी हातोड्याचे घाव घालून कोरल्याप्रमाणे ह्या भिंतीची निर्मिती झाली आहे. वर्षांनूवर्ष पाण्याचे सतत होणाऱ्या आघाताने तयार झालेले हे शिल्प खरंच पाहण्यासारखे आहे. ही किमया पाहून मी खरोखर स्तब्ध झालो हे ह्या ठिकाणचं सातव वैशिष्ट्य आहे. आणि हे सर्व वैभव मला ज्यांनी दाखवले ते मढ ह्या गावचे श्री भगवान गायकर यांचे खूप खूप आभार. पावसाळ्यात येथे पाण्याचा एक विलक्षण असा खेळ पहायला मिळतो असंख्य भोवरे फिरताना दिसतात. पण हे सर्व लांबूनच पहायचे. हे पाहिल्यावर आपण मात्र माघारी परतावे.

महाराष्ट्र पर्यटन विभागातर्फे ह्या मंदिराला “क” श्रेणीचा दर्जा मिळाला आहे. त्यानुसार येथे अनेक कामे सुरू आहेत. नुकतेच मंदिराच्या दक्षिण बाजू पासून ते नदी पात्र पर्यंत लादी बसविण्यात आली आहे. गरम पाण्याच्या कुंडाची व्यवस्था, ज्या शिळा सुरुवातीला पहिल्या त्याची नीट संवर्धन करण्यात येणार आहे. हा ब्लॉग लिहिताना मला गंगा गोरजेश्वर शिव मंदिर समितीचे सचिव श्री गोविंद गायकर यांची फार मोलाची मदत लाभली त्यांचे खूप आभार मानतो. त्यांनी सांगितलेल्या ह्या सर्व माहितीमुळे मला हे ठिकाण अधिक प्रभावीपणे मांडता आले. मी आता कोणत्याही ठिकाणी गेलो ना तर त्या ठिकाणाला खूप बारकाईने चिकित्सक वृत्तीने पाहतो त्यामुळे ते ठिकाण मला अधिक चांगल्यारीत्या कळते. आपणही ह्या पद्धतीने ही सर्व ठिकाणे पहावी अशी आशा करतो. ह्या मंदिराचे पावसाळ्यात रूप कसे असते ते मी आपल्याला नक्की दाखवेल. तर मग शिवाच पवित्र स्थान व सात वैशिष्ट्य असलेलं हे मंदिर पहायला कधी येताय ? हा ब्लॉग आपल्याला कसा वाटला मला कमेंट मध्ये जरूर कळवा. ह्या ठिकाणचं व्लॉग माझ्या यु ट्युब चॅनेल vikas zanje vlogs वर नक्की येईल आपण ह्या चॅनेल ला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. भेटूया एका नव्या ठिकाणासह लवकरच.

Vikas Zanje

Leave a Comment