सरदार गंगाजी नाईक वाडा | श्री सिद्धीविनायक देवस्थान, अंजुर –
अणजूरच्या नाईक घराण्याचे मूळ आडनाव राणे असे होते. बिंब राजाने इ.स. ११६३ साली अंकुशदेव राणेला हा गाव दिला होता. राणे घराण्यातील एका पुरुषाने बिंब राजाच्या घराण्यातील एका राजपुत्राला व त्याच्या आईला प्राणघातक हल्ल्यातून वाचवले. त्यानंतर त्यांना ‘नाईक’ ही मानाची पदवी बहाल करण्यात आली. याच घराण्यातील निंबाजी नाईक हे पक्के धर्मप्रेमी होते. फिरंग्यांनी हिंदुंवर अत्याचार व बाटवण्याचा सपाटा लावला होता. त्याविरुद्ध निंबाजींनी मोठा लढा दिला. संभाजी महाराजांकडे मदतीसाठी त्यांनी व्यक्ती पाठवली. त्यादरम्यान संभाजी महाराजांवर आपत्ती येऊन महाराष्ट्रात धामधुमीचा काळ सुरु झाला. यामध्ये निंबाजी नाईक यांचे काम अपूर्ण राहिले व त्यांचे पुढे १७१८ ला निधन झाले. त्यांची घराण्याची क्षात्रतेजाची परंपरा गंगाजी, बुबाजी, मुरारजी,शिवजी,नारायणजी व एक कन्या यांनी चालवली.(सरदार गंगाजी नाईक वाडा | श्री सिद्धीविनायक देवस्थान, अंजुर)
“सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे परंतु आधी भगवंताचे अधिष्ठान पाहिजे” समर्थांच्या या आदर्शाप्रमाणे गंगाजींनी गणरायाच्या आशिर्वादाने याची सुरवात केली. अणजूर ते मोरगाव चालत अनेक संकटांना सामोरे जात मोठे अंतर पार करुन मोरगावी अधिष्ठान केले. एकवीस दिवसांनी त्यांना गणरायांनी दृष्टांत देऊन चिंचवडला जाण्याचा आदेश दिला. तेथे पूज्य संत श्री मोरया गोसावी यांचे पणतू श्री. चिंतामणी (दुसरे) यांनी गंगाजींना अनुग्रह दिला. तसेच पूजेतील उजव्या सोंडेचा गणपती व तलवार दिली. फिरंग्यांच्या अमदानीत बांधलेल्या नाईकांच्या माडीत या सिद्धिविनायक गणरायाची स्थापना करण्यात आली. गंगाजींनी आपल्या भावंडांसोबत व इतरांसह मिळून कान्होजी आंग्रेंची भेट घेतली. त्यादरम्यान गंगाजींना फिरंग्यांनी गिरफ्तारही केले. सुटकेनंतर त्यांनी महापराक्रमी बाजीराव पेशव्यांची भेट घेतली.
वसईच्या मोहिमेचे महत्त्व समजावून सांगितले. चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली अनेक संकटे पार करत अखेर दोन वर्षांनी दि. १२ मे १७३९ ला महाभयंकर एल्गारानंतर फत्ते झाली. वसई प्रांत जिंकला. मोहिमेत स्थानिक कोळी, आग्री, पाठारे क्षत्रिय व प्रभू, कायस्थ, ब्राम्हण, बाटलेले ख्रिश्चन, मुसलमान व इतर अनेक जमातीतील लोकांनी भाग घेतला. अनेक नरवीर कामी आले. मराठ्यांनी ऐतिहासिक विजय मिळवला. साष्टी प्रांत फिरंग्यांच्या जुलूमातून कायमचा मुक्त झाला. यात गंगाजी नाईक यांचे फार मोठे योगदान होते. ते सतत २२ वर्ष तुटपुंज्या साहित्यानिशी झुंजत होते. वसईची मोहीम होईस्तोवर जवळजवळ साठ ते सत्तर हजार हिंदू लोक बाटवले गेले होते. जर हा संग्राम घडला नसता तर संपूर्ण उत्तर कोकण प्रांत ख्रिस्तमय झाला असता.
जसे शिवरायांच्या जन्माने हिंदूंची शेंडी राहिली असे म्हणता येते तसेच गंगाजी नाईकांच्या जन्माने बाप्तिस्माचा प्रसार थांबला म्हणता येईल या कामगिरीचे इनाम म्हणून श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी नाईकांना ‘अणजूर’ गाव इनाम दिला व नाईक चे ते इनामदार झाले.
फोटो – सरदार गंगाजी नाईक इनामदार वाडा व मंदीर देवस्थान (ट्रस्ट).
माहिती साभार – (पुजारी, स्थानिक/भाविक) श्री सिद्धीविनायक देवस्थान अंजूर ता. भिवंडी.
© Vikas Chaudhari