महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,10,222

गनिमीकावा | Ganimikawa

Views: 1625
15 Min Read

गनिमीकावा | Ganimikawa –

छञपती शिवाजी महाराज आणि गनिमीकावा हे दोन शब्द कोणी वेगळे करू पाहिले तरी ते कदापि शक्य नाही एव्हढे ते एकरूप आहेत. तसे पाहिले तर गनीम म्हणजे शत्रू आणि कावा म्हणजे डाव किंवा कपट असा या शब्दांचा घेतला जाणारा शब्दशः अर्थ. पण गनिमीकावा ही एक युद्धकला किंवा एक शास्त्र आहे असे म्हणले तरी वावगे ठरणार नाही.(गनिमीकावा | Ganimikawa)

कोणते ही युद्ध म्हणले की त्याची पूर्व तयारी आलीच. मग ती शस्त्र, सैन्य, घोडे, पैसा, रसद आणि अजून खूप काही .युद्धात आपण कसे लढायचे यासाठी आधी नियोजन करावे लागते. त्याला प्री प्लॅनिंग करावे लागते. यालाच युद्धनीती असे ही म्हणतात. परंतु आपल्या केलेल्या नियोजनाप्रमाणे सगळ्याच गोष्टी होतील असे नाही अशा वेळी त्या साठी आपल्याकडे प्लॅन बी असणे आवश्यक असते याच प्लॅन बी ला रणनीती असे ही म्हणले जाते .थोडक्यात काय तर युद्धाच्या आधी केली जाती ती युद्धनीती आणि प्रत्यक्ष युद्धात परिस्तिथी पाहून नियोजनात ऐन वेळी काही निर्णय घेऊन बदल करावे लागतात त्याला रणनीती म्हणतात. त्या मुळेच युद्धात आपल्या अपेक्षेप्रमाणे काही गोष्टी घडल्या नाहीत म्हणून होणारी तारांबळ किंवा होऊ घातलेला पराभव टाळता येतो त्याला विजयात रुपांतरीत करण्यासाठी काही डावपेच अखावे लागतात .त्याबाबत आधीच मनात काही आडाखे बांधावे लागतात यालाच रणनीती असे म्हणले जाते.

या दोन्ही गोष्टींचा अंतर्भाव गनिमीकावा या युद्धशास्त्रात होत असतो. या दोन्ही गोष्टी ज्याला उमजल्या त्याला गनिमीकावा समजला असे म्हणण्यास हरकत नाहीं.

मुठभर सैन्य , चिमुटभर पैसा , पसाभर जमीन आणि ऐनवेळी उपलब्ध झालेली शस्त्रे ( मग त्यात दगड धोंडे, लाकूड फाटा हे ही आले) याचा वापर करून मोठ्या सैन्याचा कमीत कमी वेळात पराभव करणे किंवा त्यांचे मोठे नुकसान करून आपल्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करण्याचे शास्त्र म्हणजे गनिमीकावा. पण गनिमीकावा हे तंत्र फक्त युद्धात च वापरले जाते असेही नाही युद्धाच्या पूर्वी किंवा त्या नंतरही त्याचा वापर केला जातो . काहींच्या मते गनिमीकावा म्हणजे अंधारात लपून छपून येणे हल्ला करणे आणि पळून जाणे म्हणजे गनिमीकावा. परंतु त्यांना या ठिकाणी आवर्जून सांगावे लागेल की गनिमी कावा हे फक्त युद्ध तंत्र नाही तर ते एक खूप मोठे गूढ आहे. या बाबत अधिक ची सविस्तर माहिती उदाहरणासहीत पुढे येणारच आहे.

गनिमीकावा हे तंत्र फक्त युद्ध जिंकण्यासाठीच , सैन्याचा पराभव करण्यासाठीच वापरले जाते असे नाही तर त्यातून शत्रूला चारी मुंड्या चित करता येते, शत्रूच्या मनात आपली दहशत बसवता येते, शत्रूला संपूर्ण शरणागती पत्करण्यास भाग पाडता येते, आपले इप्सित साध्य करण्यासाठी शत्रूला चुका करण्यास भाग पाडता येते, अनेक अफवा पसरवून शत्रूला गाफील ठेवता येते , शत्रूवर मात करण्यासाठी त्याच्या दुसऱ्या शत्रूचा मित्र होण्याचे नाटक असो वा शत्रूला आपण घाबरलो हे दाखवण्याचे नाटक असो या नि अशा खूप साऱ्या गोष्टींचा समावेश गनिमीकावा मध्ये होतो. हे सगळे आपण वेगवेगळ्या घटनांमधून पाहणारआहोतच .

शहाजी राजांनी गनिमी काव्याला जन्म दिला. त्याची चुणूक त्यांनी 1623-24 मधील भातवडी लढाईत दाखवली . पित्याकडून हा वारसा शिवाजी राजांनी घेऊन या तंत्राचा विकास केला आणि दिल्ली दरबार हादरून सोडला. तर पुढे याच तंत्राच्या जोरावर छत्रपती संभाजी महाराजांनी मोगलांना सह्याद्रीत यायला भाग पाडले, या सगळ्यांवर कळस म्हणजे सरसेनापती संताजी घोरपडे, धनाजीराव जाधव आणि महाराणी ताराबाई साहेब यांनी या मोगलांच्या कबरी याच मातीत खोदल्या. हे सारं साध्य झाले हे गनिमीकावा तंत्राच्या जोरावर, मावळ्यांच्या मनगटातील बळावर त्यांच्या इच्छाशक्तीच्या जोरावर आणि स्वराज्याप्रती असणाऱ्या निष्ठेच्या जोरावर.

म्हणूनच त्याकाळी तुर्क,पठाण, मोंगल,सिद्धी,इंग्रज, डच, पोर्तुगीज यासारख्या परकीय (परदेशीय रणधुरंदर सेनानी) वर महाराजांनी निर्विवाद विजय मिळवले.

आता गनिमीकावा या नावाविषयी थोडी चर्चा करुया . गनीम म्हणजे काय ते शत्रू आणि कावा म्हणजे काय तर या शत्रू ने केलेले डाव किंवा त्यांची युद्धकला. मग या गनिमीकावा मधील गनीम कोण ? यावर विचार केला तर उत्तर येते मराठे , कारण ही युद्धकला त्यांची . आणि हे नाव कोणी दिले तर स्वराज्याच्या शत्रूंनी . कसे ते पहा . स्वराज्याचे मुख्य शत्रू म्हणजे कोण तर मोगल , आदिलशहा, यांच्या वर मावळ्यांनी याच युद्धकलेच्या जोरावर अनेक मोठे विजय मिळवले, त्यांनी त्यांचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी आपल्या वरिष्ठांना सांगताना  मराठ्यांनी कपटाने, अंधारात हल्ला करून पराभव केला अशी ओरड उठवून या यंत्राला गनिमीकावा असे संबोधले , असे असले तरी मावळ्यांनी मात्र गनिमीकावा या शब्दाला आपला सन्मान समजून त्याचा विकास केला. थोडक्यात काय तर गनिमीकावा मधील गनीम म्हंजे मराठे / मावळे/ स्वराज्यासाठी झुंजनारे आणि त्यांची ही युद्धकला म्हणजेच गनिमीकावा.

तसे पाहायला गेले तर गनिमीकावा हे युद्धतंत्र गुरीला वॉर या युद्धतंत्राशी जोडले जाते. असे असले तरी गनिमी काव्याची व्याप्ती छत्रपती शिवाजी महाराजांनी वाढवली. अचूक नियोजन आणि त्याचे यशस्वी अंमलबजावणी या दोन गोष्टींमध्ये महाराजांच्या यशाचे गमक लपलेले आहे.

युद्धाचा अपेक्षित निकाल हवा असेल तर युद्धप्रसंग हा जास्तीत जास्त वेळा शत्रु प्रदेशातच असणे अधिक फायद्याचे असते . त्यामुळे आपल्या प्रदेशातील रयतेला त्यांच्या मालमत्तेला धोका पोहोचत नाही. परिणामी आपले सर्व लक्ष हे शत्रूवर केंद्रित करता येते मोहीम यशस्वी करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यास वेळ मिळतो .  याउलट शत्रूला मात्र त्यांचे बळ वेगवेगळ्या आघाड्यांवर खर्च करावे लागते. ते म्हणजे त्यांच्या प्रदेशाचे रक्षण , रयतेचे रक्षण,  सैन्याचे मनोबल वाढवणे अचानक हल्ला झालेला असल्याने पुरेशी तयारी करण्यास मिळणारा तुटपुंजा अवधी अशा अनेक गोष्टींमुळे शत्रूची धांदल उडवता येते. हा गनिमी काव्यातील पहिला प्रकार झाला शत्रूवर चालून जाणे.

गनिमी काव्यातील दुसरा प्रकार आहे शत्रूला आपल्यावर चालून येण्यास भाग पाडणे. या प्रकारात शत्रूवर अनेक वेळा छोटे छोटे छुपी हल्ले करून त्याला त्रासून सोडले जाते त्यामुळे वारंवार होणाऱ्या या छोट्या चकमकीना शत्रू वैतागतो. वारंवार होणाऱ्या अशा छोट्या हल्ल्यांची भीती त्यांच्या मानगुटीवर बसते. या सर्व गोष्टीला कंटाळून शेवटी काय तो एकदाचा सोक्षमोक्ष करून टाकण्यासाठी शत्रू चालून येण्यास मजबूर होतो. अशावेळी आपल्यासाठी अनुकूल आणि शत्रूसाठी प्रतिकूल असणारे रणक्षेत्र आपल्याला निवडण्यास पुरेसा अवधी मिळतो. शत्रूला लांबचा प्रवास करावा लागतो. सोबत शस्त्रसाठा अन्नधान्याचा साठा त्याचप्रमाणे अवजड वस्तू यांची वाहतूक करण्यासाठी त्यांचे मनुष्यबळ आणि आर्थिक बळ मोठ्या प्रमाणात खर्च होते. शिवाय त्याला त्याच्या प्रदेशातून किंवा राजधानीच्या प्रदेशातून बाहेर येण्यास मजबूर केल्याने त्याच्या सैन्याचे ही मनोबल खचते. फक्त या प्रकारात संयम ठेवणे खूप गरजेचे असते. आपल्याला आवश्यक असणाऱ्या रणक्षेत्रात शत्रू आल्याशिवाय त्यावर हल्ला करणे टाळावे लागते. अशावेळी शत्रू वर एकाच वेळी संपूर्ण ताकतीने हल्ला करणे ही टाळावे लागते, केलेला हल्ला हा एका बाजूने कधीही न करणे लढाईच्या निकालाच्या दृष्टीने आपल्यासाठी फायद्याचे असते. असे केल्याने आपली ताकद आपले सैन्यबळ शत्रूच्या लक्षात येत नाही. त्यामुळे त्याला त्याची रणनीती आखण्यास अडचणी निर्माण होतात. शिवाय शत्रू सैन्यावर चहूबाजूनी केलेल्या हल्ल्यामुळे त्याचा कोंडमारा होतो. त्याच्या सैन्याचे मनोबल खचते. दुर्गम ठिकाणी अशा शत्रूला नेऊन कोंडून त्याला चहुबाजूने मार देता येतो.

अशा या गनिमी काव्याच्या वापर करून छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक लढाया जिंकले असल्या तरीही महाराजांनी एकदा वापरलेला डाव , एकदा वापरलेली युक्ती पुन्हा दुसऱ्या युद्धात वापरलेले आपल्याला पाहायला मिळत नाही. यातूनही छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी, आपली रणनीती, आपले डावपेच शत्रूला कधीही कळू न देणे हेच पहावयास मिळते.

पुरंदरच्या लढाईतील डावपेच जावळीच्या युद्धात दिसले नाहीत. अफजलखानाच्या मोहिमेत वापरलेली रणनीती पन्हाळ्याच्या वेढ्यात पाहायला मिळाली नाही. आग्र्यावरून सुटका आणि शाहिस्तेखाना वरील छापा दोन्ही ठिकाणी महाराजांनी वेगवेगळे व्यूहरचना वापरलेली दिसली. सुरत लुटीत ज्याप्रकारे नियोजन केले त्याच प्रकारचे नियोजन बहादूरगड किंवा भडोच, जुन्नर या ठिकाणच्या लुटीत वापरले नाही, दक्षिण दिग्विजयाच्या समयी वापरलेली रणनीती वेगळीच होती, यावरून शत्रूला एक रणनीती समजली तर त्याचा उतारा त्याच्याकडे तयार होईल , तो तयार राहील त्यामुळे प्रत्येक वेळी नवा डाव महाराजांनी केलेला पाहायला. मिळतो शिवाय जोखमीच्या मोहिमांमध्ये स्वतः समोर असलेले दिसतात. अफजल खान मोहीम असेल, उंबरखिंड असेल किंवा लाल महालातील शाहिस्तेखानावर टाकलेला छापा असेल महाराज स्वतः आघाडीवर असलेले दिसतात. हे सगळे सविस्तर पुढे येणारच आहे पण त्यापूर्वी आपणास गनिमी कावा या तंत्राचे काही हेतू जाणून घेणे क्रमप्राप्त आहे.

1) शत्रूवर दहशत बसवणे किंवा त्याला घाबरून सोडणे

2) शत्रूचे मानसिक खच्चीकरण करणे .
3)शत्रूचा खजिना लुटून त्याचे आर्थिक खच्चीकरण करणे .
4)शत्रूला खिंडीत पकडणे किंवा कोंडीत पकडणे.
5) शत्रूला हैराण करून शरण येण्यास भाग पाडणे.
6) शत्रूला पळवून लावणे.
7) त्यांच्या छावणी अफवा पसरून चुकीची माहिती पसरवणे .
8) शत्रूची दिशाभूल करणे आपण घाबरलो आहे असे दाखवून शत्रूची प्रशंसा करणे.
9) शत्रूला बेसावध ठेवणे, गाफील ठेवणे.
10) शत्रू सैन्यावर चहुबाजूनी हल्ला चढवून सैन्य पांगवणे.

11) शत्रूला बिन कामाचा प्रवास घडवणे .
12) शत्रूसमोर आपण खूप कमजोर आहोत असे भासवणे.
13) शरण आलोय असे दाखवून पलटवार करणे.
14) वेळ काढू पणा करणे.
15) भिऊन पळून जातोय असे भासवणे आणि  उलट हल्ला करणे .
16) शत्रूला आपला पाटलाग करण्यास भाग पाडणे.
17) शत्रूला आमिष दाखवणे .
18) आपण ठरवलेल्या रणक्षेत्रावर शत्रूला येण्यास भाग पाडणे.
१९) शत्रूचा शत्रू हा आपला मित्र असतो हे दाखवणे

गनिमी काव्याचे हे जरी वेगवेगळे हेतू असले तरी अंतिम ध्येय हे शत्रूवर निर्विवाद वर्चस्व मिळवणे हेच असते

महाराजांनी गनिमी कावा तंत्र वापरून बहुतांश वेळा रात्रीचा विजय मिळवलेला दिसून येतो. मग पन्हाळ्यावरून सुटका असेल, शाहिस्तेखानावर टाकलेला छापा असेल,तानाजी मालुसरे यांनी घेतलेला कोंढाणा किल्ला किंवा कोंडाजी फर्जंद यांनी जिंकलेला पन्हाळा किल्ला, रात्रीच्या वेळी जंजिऱ्याला लावलेल्या शिड्या असे खूप सारे प्रसंग हे रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन विजय मिळवलेले आपल्याला पाहायला मिळतात.

गनिमी काव्याचे तंत्र मोहिमेच्या व्याप्तीवरून बदललेले पाहायला मिळते अफजलखान मोहिमेत  खूप दिवस गनिमी कावा वापरून अपेक्षित यश मिळवलेले दिसते. तर याउलट उंबरखिंड , उमराणी ची लढाई , सिंहगड किंवा पन्हाळा किल्ला जिंकणे हे एका दिवसात लढाईचा निकाल स्पष्ट करणारे डावपेच पाहायला मिळतात अशा वेगवेगळ्या घटना सविस्तर पाहू आणि त्यातून कशाप्रकारे गनिमी कावा तंत्राचा वापर केला गेला याचाही परामर्श घेऊया.

छत्रपती शिवरायांनी त्यांच्या यशामध्ये गनिमी कावा या तंत्राला जेवढे महत्त्वाचे स्थान दिले, त्याच बरोबर महाराजांचे हेरखाते आणि प्रत्येक वेळी मृत्यूलाही हसतमुखाने सामोरे जाण्यास तयार असणारे मावळे यांनाही तितकेच महत्त्वाचे स्थान आहे. महाराज मोहिमांचे नियोजन करत असेल त्यात त्यांना बहिर्जी नाईकांच्या हेर पथकाची अनमोल अशी साथ मिळत असे. तर हे नियोजन प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी मावळे आणि सैन्य यांचीही विशेष कामगिरी असे, ठरलेले नियोजन यशस्वी अंमलबजावणी शिवाय कारीगर साबित होत नाही. त्यामुळे महाराजांच्या सैन्य रचनेचा ही थोडक्यात मागोवा घेणे गरजेचे आहे, असे या ठिकाणी वाटते.

इतर राज्यांप्रमाणे महाराजांची भिंस्त ही चतुरंग सैन्यावर अजिबात नव्हती. राजांनी चतुरंग सैन्य रचनेला फाटा दिला आणि सैन्य रचना ही घोडदळ आणि पायदळ अशी केली नंतर आरमार हे तिसरे दल त्यांनी निर्माण केले.

घोडदळाच्या रचनेमध्ये बारगीर आणि शिलेदार असे दोन प्रकार होते . म्हणजे काय तर असे घोडेस्वार की ज्यांना घोडा, शस्त्र इत्यादी साहित्य आणि प्रशिक्षण हे सरकार मधून म्हणजेच शिवाजी महाराजांकडून मिळत असे. असे  घोडेस्वार म्हणजे बारगीर हे विशिष्ट पगारावर सैन्यात भरती केलेली असायचे.

तर घोडदळातील दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे शिलेदार या प्रकारामध्ये घोडा शस्त्र साहित्य आणि प्रशिक्षण हे स्वतःचे स्वतः पूर्ण केलेले आहेत हे फक्त मोहिमेपूर ते सैन्यात भरती होत.  घोडदळातही कायम फौज आणि राखीव फौज अशी रचना केलेली असे. घोडदळाचा रचनेमध्ये 25 घोडेस्वार एक भिस्ती जो घोडेस्वारांना आणि घोड्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था पाहतो तो दिसती एक नालबंद ही झाली एक तुकडी या तुकडीवर एक हवालदार अशा पाच हवलदारांवर मिळून एक जमादार असे दहा जमादार ज्यावेळी एकत्र येईल त्यावेळेस त्यांच्यावर आदेश चालवणाऱ्या सरदाराला एक हजारी सरदार म्हणत आणि असे पाच एक हजारी सरदार एकत्र आले की त्यांच्यावर असणारा सरदार म्हणजे पंच हजारी सरदार अशा पाच पंच आजारी सरदारांवर असे सरनोबत. सरनोबत वर अधिकार चाले तो सरसेनापतींचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा ही झाली घोडदळाची रचना.

तर पायदळामध्ये नऊ शिपाई एक भिस्ती  आणि एक नालबंद या तुकडीवर असायचा तो एक नाईक असे दहा नाही एकत्र आले की त्यांच्यावर असायचा एक हवालदार आणि अशा तीन हवलदारांवरचा जो अधिकारी असे त्याला म्हटले जायचे जुमलेदार असे दहा जूमलेदार एकत्र आले की त्यांच्यावर अधिकार गाजवणारा सरदार ज्याला एक हजारी सरदार म्हटलं जायचं असे सात एक हजारी सरदार एकत्र येऊन त्यांच्यावर हुकूमत गाजवणारा सरदार म्हणजे सप्त हजारी सरदार असे पाच सप्ताह हजारी सरदार एकत्र आले की त्यांच्यावर अधिकार चालायचा तो सरनोबतचा आणि सरनोबतवर अधिकार हा सरसेनापती किंवा राजांचा चालत असे.

सैन्यरचनाही थोडक्यात घोडदळ, हुजराती ची फौज, गुप्तहेर खाते आणि पायदळ अशा प्रकारांमध्ये विभागलेली असे.

सैन्य रचने बरोबरच शिवरायांनी वेगवेगळ्या युद्धांमध्ये वेगवेगळ्या प्रकाराच्या साहित्यांचा वापर हत्यार म्हणून केला अगदी दगड धोंडे ,गोपण गुंडा वेळेला विटी दांडूचाही वापर हत्यार म्हणून केलेल्या पाहायला मिळतो त्याचबरोबर अफजलखानासाठी तर खास तयार करून घेतलेले वाघ नख हे तर सर्वश्रुत आहे परंतु अफजल वधानंतर मात्र या वाघनखाचा वापर कोणत्याही मोहिमेत कोणाही विरुद्ध केलेला आपल्याला पाहायला मिळत नाही. परंतु कदाचित या वाघनखांचा उपयोग मावळ्यांनी रात्रीच्या अंधारात उभे कडे, कातळ ,झाडे चढून जाण्यासाठी केलेला असावा असाही अंदाज बांधायला हरकत नाही . कारण कोंडाजी फर्जंद आणि तानाजी मालुसरे रात्रीच्या अंधारात कडे चढून किल्ल्यावर गेलेली आपल्याला माहिती आहेत. याचबरोबर छत्रपती शिवरायांकडे यशवंत नावाचा पट्टा, भवानी नावाची तलवार, फिरंग , विटा,  धनुष्यबाण , भाले अशा प्रकारची वेगवेगळी हत्यारे वेळ प्रसंग पाहून वापरलेली पाहायला मिळतात निसर्गाचा आणि निसर्गातील होणाऱ्या बदलांचा वापरही बेमालूम पणे करून घेतलेला अनेक युद्धांमध्ये पाहायला मिळतो. पावसाळ्यात पावसाचा , तर अंधाऱ्या रात्री अंधाराचा, झाडाझुडपांचा, डोंगर कापाऱ्यांचा ,दऱ्या खोऱ्यांचा, जंगलांचा वापर अतिशय कल्पकतेने करून घेऊन गनिमी काव्याच्या आधारावर शत्रूंवर मोठमोठे विजय मिळवलेले पाहायला मिळतात आणि यावरून छत्रपती शिवरायांची गुणवत्ता आणि बुद्धी चातुर्य याला तोड नव्हती हेच सिद्ध होते.

गनिमी कावा हे तंत्र राज्यांनी फक्त लढाईतच वापरले असे नाही तर त्यांनी ज्या ज्या घटनांमध्ये ज्या ज्या प्रसंगात आणि लढाईत या तंत्राचा वापर केला असे एक एक प्रसंग आपण पाहूया.

लेखन – सचिन पवार.

Leave a Comment