महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,00,044

गणपती

Views: 2979
9 Min Read

गणपती –

गणपती ही एका अर्थाने प्राचीन भारतीय व्यवस्थेमधील पद होते आणि त्या रक्षक देवतेची देवाघरापर्यत तसेच दारावरची द्वारपट्टी आणि कुठल्याही मंगल प्रसंगाची सुरवात हा प्रवास खरंच रोमांचकारी आहे. खानदेशातील जी आठव्या ते अकराव्या शतकातील मंदिरे आहेत. शिवमंदिर, विष्णू मंदिर, भद्रहरी मंदिर, देवी मंदिर या सर्वांच्या बाहेरील बाजूस अतिशय सुरेख अशी नृत्य गणेशाची मूर्ती कोरलेल्या आहेत. वाघळी, मेथी, बलसाणे , चांगदेव, नागेश्वर वडगाव, संगमेश्वर, अजून ही काही ठिकाणी आहेत. काय आहे या नृत्य गणेशाचे इंगित? हे बघायचे झाले तर आधी गणेश या देवतेची नीट ओळख करून घ्यायला हवी.(खानदेशातील गणपती)

गणपती हा हिंदू धर्मातील बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नांचा नियंत्रक मानला जाणारा देव आहे भारतात गणेशाची पूजा प्रचलित आहे. विशेषतः महाराष्ट्र राज्यात गणेशाची मोठ्या प्रमाणावर पूजा व उत्सव होतात. वाहन उंदीर शस्त्र पाश, अंकुश, परशु, दंत वडील शंकर आई पार्वती, पत्नी ऋद्धी, सिद्धी अन्य नावे ब्रह्मणस्पती, मयुरेश्वर, लंबोदर, वक्रतुंड, विनायक, विघ्नेश्वर, विघ्नहर, शूर्पकर्ण. गणपतीची बारा नावे १.वक्रतुंड २. एकदंत ३.कृष्णपिंगाक्ष ४. गजवक्त्र ५.लंबोदर ६.विकट ७.विघ्नराजेंद्र ८.धूम्रवर्ण ९.भालचंद १०.विनायक ११.गणपती १२.गजानन

नामोल्लेख गणेश पुराण, मुद्गल पुराण तीर्थक्षेत्रे अष्टविनायक –

गाणपत्य संप्रदाय –

गणेशाचा उपासक संप्रदाय गाणपत्य नावाने ओळखला जातो. या संप्रदायाचा उगम पंधराव्या शतकात झाला असे मानले जाते. हा संप्रदाय गणेशाची मयूरेश्वर नावाने पूजा करतो. त्यांचा मुख्य मंत्र, गणेश गायत्री मंत्र असा आहे – एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात। आदी शंकराचार्यांनी गणपतीस पाच मुख्य देवतेत स्थान दिल्यावर गणपतीची दैवत म्हणून लोकप्रियता वाढू लागली. गणपतीच्या उपासकांचा गाणपत्य संप्रदाय निर्माण झाला.पुण्याजवळच्या चिंचवडचे मोरया गोसावी हे गाणपत्य संप्रदायातील एक पुरूष मानले जातात. या संप्रदायात गणपतीवर दोन उपपुराणे रचिली गेली – गणेश पुराण आणि मुद्गल पुराण.

नावे –

पुराणांमध्ये गणपती हा शिवहर, पार्वतीपुत्र या नावांनी व शंकरपार्वतींचा मुलगा असल्याचे सांगितले जाते. पुराण साहित्यात गणपतीचे अनेक ठिकाणी उल्लेख आहेत. पुराण साहित्यात गणपतीच्या विविध नावांचा उल्लेख आहे. महाभारत या ग्रंथाचा लेखनिक होता.

गणेश शब्दाचा अर्थ गणांचा ईश वा प्रभू असा आहे. गण म्हणजे शिव व पार्वतीचे सेवक होय. गणांचा अधिपति म्हणून गणपती असेही नाव या देवतेस आहे. विनायक हे नाव दक्षिणेत वापरतात. हे नाव ‘गणपती’ नावाशी संबंधित आहे. विनायक या शब्दाचा अर्थ वि म्हणजे विशिष्टरूपाने जो नायक (नेता) आहे तो. याच अर्थाने गणाधिपती नावही प्रचलित आहे. हेरंब म्हणजे दीनजनांचा तारणकर्ता होय. वक्रतुण्ड, एकदंत, महोदय, गजानन, विकट आणि लंबोदर ही गणपतीची देहविशेष दर्शविणारी नावे आहेत. एकदंत म्हणजे ज्याला एक दात आहे तो. गणपतीस एक दात असण्याच्या अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात. प्रथम कथेनुसार, परशुरामाने युद्धात गणपतीचा एक दात उपटला. दुसर्‍या कथेनुसार कैलास पर्वतावर गणपतीने रावणास अडवले म्हणून रावणाने गणपतीचा एक सुळा मोडला. आणखी एका कथेनुसार खेळाखेळातील लढाईत कार्तिकेयाने गणपतीचा एक दात भग्न केला. महोदर आणि लंबोदर शब्दांचा अर्थ अनुक्रमे महा म्हणजे मोठे उदर (पोट) असणारा व लंब वा लांबडे उदर (पोट) असणारा असा आहे. ही दोन्ही नावे गणपतीचे स्थूलत्व दाखवतात. विघ्नराज वा विघ्नेश्वर शब्दाचा अर्थ सकल विघ्न वा बाधांचा अधिपति असा आहे. पुराणात सर्वत्र गणपतीचा विघ्नाधिपती म्हणून उल्लेख आढळतो. सकल बाधांचा अधिपति व नियंत्रक असल्यामुळे गणपतीस हे नाम प्राप्त झाले.

गणपतीचा प्रथम उल्लेख प्राचीनतम हिंदू धर्मग्रंथ असलेल्या ऋग्वेदात मिळतो. दोन ऋक मंत्र (गणानाम गणपतीम् हवामहे… व विषु सीदा गणपते. वैदिक गणपतीचा स्पष्टपणे निर्देश करतात. जरी हा वैदिक गणपती व सध्या पूजिला जाणारा पौराणिक गणपती एक नसला तरी वेदोत्तर काळात ऋग्वेदातील गणपती-ब्रह्मणस्पती-वाचस्पती पासूनच पौराणिक गजवदन-गणेश-विघ्नेश्वर हे रूप निर्माण झाल्याचे संशोधक मान्य करतात.

ऋग्वैदिक गणपतीची दुसरी नावे होती -बृहस्पती, वाचस्पती. ही देवता ज्योतिर्मय मानली जाई. तिचा वर्ण लालसर सोनेरी होता. अंकुश, कुर्‍हाड ही या देवतेची अस्रे होती. या देवतेच्या आशीर्वादाशिवाय कोणतेही इष्टकाम संभव होणार नाही असे मानले जाई. ही देवता कायम ‘गण’ नामक एका नृत्यकारी दलासोबत विराजमान असे व देवतांची रक्षकही मानली जाई.

दुसर्‍या मतानुसार भारतातील अनार्यांच्या हस्तिदेवता व लम्बोदर यक्षाच्या एकत्रिकरणातून गणेश संकल्पना निर्मिली गेली. गणेश या मूळच्या अनार्य देवतेचे आर्यीकरण झाले असावे हा दुसरा कयास लावण्यात येतो. गणेशाचे वाहन उंदिर याच आदिम संस्कृतीचे प्रतीक म्हणून राहिले असावे. इसवीसनाच्या चौथ्या शतकातील कालिदास, इसवीसनाच्या सहाव्या शतकातील भारवी, इसवीसनाच्या पाचव्या शतकातील पंचतंत्र वा भरताच्या नाट्यशास्त्रातही गणेश देवता दिसत नाही. गुप्त काळापासूनच या देवतेची स्वतंत्र पूजा प्रचलित झाली असे अभ्यासक मानतात.

विनायक रूप- मानवगृह्यसूत्र व याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये शाल, कटंकट, उष्मित, कुष्माण्ड राजपुत्र व देवयजन इत्यादीचा विनायक म्हणून उल्लेख आहे. महाभारतातील विनायक हाच आहे. याचे काम विघ्न उत्पादन करणे असे. पुढे हाच विघ्नकर्ता गणपती विघ्नहर्ता मानला जाऊ लागला. याज्ञवल्क्य स्मृतीनुसार विनायक हा अम्बिकेचा पुत्र होय.गणेशाचा पार्वतीपुत्र उल्लेख येथेच प्रथम होतो.कार्तिकेयाचे अनेक गण वा पार्षदही पशुपक्ष्यांचे मुखधारित असतात. इसवीसनाच्या सहाव्या शतकातील ‘भूमारा’त याप्रकारच्या अनेक गणांचा उल्लेख सापडतो. गणेश म्हणजेच गण-ईशाचे ह्त्तीमुख असण्याचे हेही कारण असू शकते. काही ठिकाणी गणेश व यक्ष/नागदेवता यांची वर्णने मिसळल्याचे दिसते. गणपतीच्या ह्त्तीमुखाचे हेही कारण असावे. पुराणांमध्ये ह्त्तीमुखधारी यक्ष आहेत. यक्ष हे गणपती प्रमाणे लंबोदर असतात. याज्ञवल्क्य संहिता’ या ग्रंथात विनायक व गणपतीच्या पूजेचे विवरण सापडते. इसवी सनाच्या सातव्या शतकात रचलेल्या ललित माधव ग्रंथात गणपतीचा उल्लेख आहे.

गणेश पुराण व मुद्गल पुराण या ग्रंथाच्या रचनाकाळात मतभेद आहेत. यांची रचना साधारणपणे इ.स. ११०० ते इ.स. १४०० मध्ये झाल्याचे मानले जाते. सामान्यपणे गणेश पुराण हा आधीचाव मुद्गल पुराण नंतरचा ग्रंथ मानतात. गणपती अथर्वशीर्षाची रचना इसवीसनाच्या सोळा ते सतराव्या शतकाच्या मध्यापर्यंतच्या काळात झाली.

साहित्यात महानुभाव पंथ-मराठी साहित्याच्या प्रारंभ काळापासून गणेशाचे उल्लेख आहेत. मराठी भाषेमधील आद्य वाङमयकार असलेल्या महानुभाव पंथातील कवी नरेंद्र यांच्या रुक्मिणी स्वयंवर ग्रंथात गणपतीचा असा उल्लेख येतो –

“ तेया गणरायाचे उदार रूपडे थोरपण जिंकले होडे ।
कवीस शब्दब्रह्मीची राणिव कोडे, जेणे पाहिले तो सिंदुरे आंडंबरे ।।
गोर मेरु जसा, तयाचे ठायी सिद्धीचे सर्ग, नानाविध वसती भोग ।
तेण आधारे अग्नेय सुखावले।।”

संत साहित्य-

ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीतील खालील नमनाची ओवी सुप्रसिद्ध आहे –

ओम नमोजी आद्या | वेदप्रतिपाद्या | जयजय स्वसंवेद्या | आत्मरूपा ||
देवा तुचि गणेशु| सकलमतिप्रकाशु| म्हणे निवृत्तीदासु | अवधारिजोजी ||[६०]

नामदेवांनीही गणेशस्तवनाचा अभंग लिहिला आहे. त्यात ते म्हणतात –

लंबोदरा तुझा, शोभे शुंगदंड करीतसे खंड दुश्चिन्हांचा ||
चतुर्थ आयुधे शोभतासी हाती भक्ताला रक्षिती निरंतर ||

तुकोबा गणपतीला नाचत येण्याची विनंती करतात –

गणराया लौकरी येई । भेटी सकलांसी देई ।।
अंगी सिंदूराची उटी । केशरकस्तुरी लल्लाटी ।।
पायी घागर्या वाजती । नाचत आला गणपती ।।
तुका म्हणे पाही । विठ्ठल गणपती दुजा नाही ।।

गोसावी नंदन हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध गणेशभक्त होते. त्यांनी ज्ञानमोदक हा ग्रंथ रचला आहे.

लोकसाहित्य व लोकसंस्कृती गणपती संतवाङमय व शास्त्रपुराणांबाहेर पडून लोकसंस्कृतीतही अनेक ठिकाणी आला आहे. तमाशातला प्रारंभीचा गण गणेशस्तवनाचा असतो. यात गणपती ऋद्धीसिद्धींसह नाचत येतो.

पठ्ठे बापूराव आपल्या कवनात म्हणतात – तुम्ही गौरीच्या नंदना । विघ्न कंदना । या नाचत रमणी । जी जी जी ||

कोकणातील गणपतीच्या नाचाची गाणी प्रसिद्ध आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील बाल्यांचा गणपतीचा नाच दमदार व लक्षवेधी असतो. बाल्यांचे गणपतीचे एक गाणे असे – यावे नाचत गौरीबाळा । हाती घेऊनी पुष्पांच्या माळा । सर्वे ठायी वंदितो तुला | यावे नाचत गौरीबाळा।

लोकगीतामध्येही गणपतीचे वर्णन येते. कार्तिकेय गणपती भावांचा झगडा, शंकरपार्वतीचे बालकौतुक असे अनेक विषय यात आहेत. एका लोकगीतातले वर्णन असे –

“ हिथं बस तिथं बस, गणू माज्या बाळा ।।
आमी जातो आमी जातो, सोनारू साळा ।।
सोनारीन बाई ग सोनारू दादा ।।
बाळाचं पैजण झालंका न्हाई ?
फिरून येजा फिरून येजा गवराबाई गवराबाई ।।
हिथं बस तिथं बस, गणू माज्या बाळा ।।”

गवराबाईने म्हणजे गणपतीच्या आईने (गौरीने) गणेशबाळासाठी सोनाराकडे पैजण करायला टाकले आहेत आणि सोनाराने ते अजून दिले नाहीत असे वर्णन या गीतात आहे.

माहिती संकलन  –

Leave a Comment