गरबा नव्हे, गर्भ दीप !
आपल्या शेतीप्रधान देशात शेती संदर्भातील मुख्य कामे आटोपली की विविध सण साजरे केले जातात. मेहनत आणि हवामानामुळे खर्च झालेली शारीरिक ताकत पुन्हा प्राप्त करण्यासाठी शक्तीची आराधना केली जाते. सृजनाचा सांकेतिक उत्सव साजरा होतो. आनंद साजरा होऊ लागतो. घटस्थापना करून सलग ९ रात्री साजरा होणारा नवरात्रीचा सण हा त्याचा एक महत्वाचा भाग आहे. दिवसभर उपवास, पूजा, होमहवन, सप्तशतीसारख्या ग्रंथांचे पठण इत्यादी उपासनेनंतर रात्री देवीच्या भोवती फेर धरून नृत्य केले जाते. तामिळनाडू, महाराष्ट्र, राजस्थान अशा अनेक राज्यांमध्ये फेर धरून ही धार्मिक नृत्य–आराधना केली जाते. पण आता सर्वात प्रसिद्धी पावलेले आणि लोकप्रिय झालेले नृत्य हे गुजरातचे असून गरबा आणि दांडिया हे त्याचे दोन प्रकार !
आता जरी याला गरबा म्हटले जात असले तरी मूळ संस्कृत शब्द ‘ गर्भ दीप ‘ असा आहे. एका छिद्रे असलेल्या मातीच्या घटामध्ये दिवा तेवत ठेवला जातो. हा घट उत्तमप्रकारे सजवून देवीच्या मूर्ती किंवा प्रतिमेसमोर ठेवला जातो. दिवा हा जीवनाचे प्रतीक असून घट हे ब्रह्मांडाचे प्रतीक आहे. हा दिवा सुरक्षित राहावा म्हणून घटाच्या गर्भामध्ये ठेवला जातो आणि तो घट, सगळ्या प्राणिमात्रांची माता असलेल्या अंबेच्या पायाशी ठेवला जातो. गर्भदीप या संस्कृत शब्दावरून गरबा शब्द रूढ झाला. या घटाला असलेल्या अनेक छिद्रांमुळे आतील दिव्याला प्राणवायूचा पुरवठा तर होतोच पण त्याचे वाऱ्यापासून रक्षणही होते. पूर्वी विद्युत दिव्यांचा अति झगमगाट नव्हता. त्यावेळी अनेक घरांमधून अनेक घट आणून ते जमिनीवर एकत्र ठेवले जात असत. अशा अनेक घटांच्या छिद्रांमधून बाहेर येणाऱ्या प्रकाशाच्या कवडशांमध्ये हे नृत्य खूप मनोहारी दिसत असे. या नृत्याला परंपरागत गाणी, वाद्ये, आणि टाळ्या यांची जोड लाभत असे. आता नवीन युगाला साजेसे तांब्याचे, स्टीलचे, खूप सजावट केलेले गरबादीप बाजारात उपलब्ध आहेत.
या प्रथेचे आणखीही अनेक अध्यात्मिक पदर आहेत. देवी आणि दिव्याभोवती फेर धरून नृत्य करतांना त्याचे रिंगण डावीकडून उजवीकडे सरकत राहते. देवालयामध्ये याच पद्धतीने देवाभोवती प्रदक्षिणा घातली जाते. स्वतः भोवती फ़िरतांनाच मातृरूप देवीभोवती फिरणे हे जन्म, मृत्यू , पुनर्जन्म या चक्राशी संबंधित आहे. घटामधील दिवा म्हणजे जीवन, हे नश्वर आहे पण रिंगणाच्या मधोमध उभी असलेली जगन्माता अंबाबाई मात्र स्थिर आहे. म्हणजेच मातृत्व हे अजरामर आणि सातत्य असलेले आहे.
सप्तशती कथेप्रमाणे अत्यंत क्रूर असुरी शक्तींशी देवीने विविध रूपात लढून विजय प्राप्त केला. या देवीपासून शक्ती प्राप्त करण्यासाठी स्त्रिया हे नृत्य करतात. हा स्त्री शक्तीचा जागर असल्याने पूर्वी पुरुषांचा यात सहभाग नसे. पण बाकीच्या सर्व धार्मिक गोष्टीत पुरुषांचा सहभाग असायचाच ! आजही आपल्या देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी, या ९ दिवसात फक्त फलाहार करून, उपवास करतात. गरबा या नृत्याचा , कांही जण सूफी संस्कृतीशी संबंध जोडत असले तरी गरबा हे नृत्य, त्याची गीते, त्याचा ताल, पद्धत ही अस्सल गुजरातचीच असली पाहिजे.
सर्वांना रविवारपासून सुरु होणाऱ्या नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !
सोबत – माझ्या दिव्यांच्या संग्रहातील २ गर्भदीपांची छायाचित्रे !
माहिती साभार – Makarand Karandikar | मकरंद करंदीकर | makarandsk@gmail.com