गावदेवी माता, शिरगाव, कुळगाव, बदलापूर –
बदलापूर… उल्हासनदीच्या तीरांवर वसलेले गाव. सोपारा, कल्याण बंदरा वरून निघणारा माल नाणेघाट मार्गे घाटावर येण्याच्या आधी कोकण व घाट यामधील महत्वाच गाव. मौखिक कथेच्या आधारे येथे घोडे बदलले जायचे म्हणून बदलापूर नाव पडले सांगितलं जात. इतिहास संशोधक श्री नानासाहेब चाफेकर यांनी ‘आपल गाव बदलापूर’ व ‘पेशवाई च्या सावलीत’ अशे दोन ग्रंथ लिहले आहेत. त्यांच्या मते येथे ‘बदले’ अडनावाची शिंपी व्यापारी येथे होते. त्यांच्या बदले अडनावामूळे बदलापूर हे नाव पडले .(गावदेवी माता, शिरगाव)
बदलापूर हे नाव का पडले हे ठोसपणे असा सांगणारा कोणताही पुरावा इतिहासकारांना सापडत नाही. पण ‘बदलापूर कुळगाव’ या नावाचा उल्लेख इतिहासात तिन चार वेळा येतो.
वसई मोहीमेच्या वेळी चिमाजीअप्पा यांचा मुक्काम ‘बदलापूर’ येथे होता. एका पत्रानुसार वसईच्या मोहिमेत वासुदेव जोशी यांनी लिहलेल्या पत्रात ‘कुळगावी’ मुक्कामी केल्याचा उल्लेख येतो. वसई मोहीमेच्या वेळी इंग्रजांनी मलंगगड हस्तगत केल्यानंतर तेथील अधिकारी हार्टल ‘बदलापूर, येथील कुळगावास मुक्कामी होता.
१७८१ मध्ये हरिपंत फडके व रघुनाथ पटवर्धन हे कोकणात उतरल्या नंतर या हार्टलच्या मदतीला त्याचा सहकारी गॉडर्ड हा धावून आला. तेव्हा बदलापूर येथे हरिपंत व त्याची चकमक झाली. त्यावेळेस बाजीपंत हे तोफा व गारदी घेउन बदलापूरास होते. बदलापूर चा कसबे बदलापूर तर्फ चोण तालुके राजमाची प्रांत कल्याण असही म्हंटल जात. चोण नावाच्या मुख्य महालात बदलापूरचा समावेश होता.
नानासाहेब पूर्वी औंध संस्थानात मोठ्या हुद्यावर होते. त्यांनी उल्हासनदीवर जो लहान पूल होता जो आत्ता नष्ट झाला आहे .हा पूल औंधच्या प्रतिनिधींच्या सहकार्याने बांधला होता. पुर्वी ही नदी होडीने ओलांडून बदलापूरगावात जावे लागत असे. बदलापूर म्हंटले की कुळगावच नाव प्रथम डोळ्यासमोर येत.
‘आगले’ लोक १३व्या शतकात मुंगी पैठणच्या बिंबराजाच्या सैन्या बरोबर मुंगीपैठणहून कोकणात आले . बिंबराजाने सैन्यानिशी कोकणात येऊन अलिबाग, आवास, सासवणे आणि सागरगडावर सरदाराचा पाडाव केला. आणि स्वतः राज्यकारभार पाहू लागला. त्याने प्रजेला गावठाणे वसवून दिली आणि मिठागरे बांधून दिली. मिठागरांत काम करणारे ‘मीठा-आगरी’ म्हणून ओळखले जाऊ लागले. तर जे शेती व गुरढोर सबंधीत किवा दुग्ध व्यवसाय करू लागले ते ‘ढोर आगरी ‘म्हणून ओळखले जाऊ लागले.
कालांतराने जो बदलापूरच्या शेतजमिनीचा भाग होता तेथे आनेक कुळ (कुळ म्हणजे घराणे ) येउन राहीली तो भाग म्हणजेच बदलापूरचा कुळगाव भाग होय. प्रत्येक गावाचे ग्रामदैवत व घराण्याची कुलदेवता असते. या कुळगावची ग्रामदेवता आनंतनगर मधील तळ्याजवळील गावदेवी आहे.
बदलापुरातील ऐतिहासिक घडामोडींचा व मंदिरांचा ठेवा शिवकाल ते पेशवेकालापर्यंत मागे जात असला तरी आता यापेक्षाही प्राचीन काळातील इतिहासाचे महत्त्वाचे दुवे अभ्यासकांच्या शोधातून पुढे येऊ लागले आहेत. बदलापुरातील शिरगाव परिसरात शिलाहारकालीन राजवटीतील ‘गधेगाळ’ हा राजाज्ञा दर्शवणारा शिलालेख आढळला आहे.
बदलापूर कुळगावच्या चार दिशेला चार गावदेवी असून या चार बहिणी मानल्या जातात. त्यातील एक शिरगाव मधील गावदेवी. भव्यसभामंडप व गाभारा असे दोन भाग असून गाभा-यात देवीचे दोन तांदळा आहेत. यावर देवीचे मुखवटे चढवले आहेत. ( मंदिरात असणारे दोन तांदळा हे जेष्ठा व कनिष्ठा म्हणून संबोधले जातात. )
नवसाला पावणारी ह्या देवीचा उत्सव मोठ्या प्रमाणात केला जातो. या गावदेवीची पालखी निघत नाही . (पालखीचा मान हा तळ्याजवळील गावदेवीचा आहे.) या गावदेवीचा नवरात्रात मोठ्या प्रमाणात सण साजरे केले जातात. प्रत्येक शुभ प्रसंगी देवीची खणानारळाने ओटी भरली जाते. देवीची विधिवत पुजा ही दर मंगळवारी व शुक्रवारी केली जाते. या दिवशी देवी ची साडी बदलली जाते. महादेव कोळी ,कातकरी ,काथोडी इतर ही समाज ह्या देवीला मानाने पुजतात.
देवीच्या उत्पत्ती बद्दल सांगायच झाल तर दंतकथे नुसार फार पूर्वी या भागात फार मोठ जंगल असल्याने वाघ येण्याची भिती जास्त होती. ज्यावेळी गावात वाघ येत असे तेव्हा आवाज येत असे की घाबरू नका मी रक्षण करीन तुमचं . ज्या भागातून आवाज येत असे तेथील जमिनीला नांगर लावला . नांगराचा फाळ लागताच देवी तांदळा रुपात बाहेर आली. हेच ते देवीच स्वयंभू स्थान . ( या भागात अदिवासी समाजा पैकी ठाकरं ,कातकरी ,काथोडी ह्या लोकांची वस्ती होती. या अदिवासी लोकांच मुख्य देव म्हणजे वाघोबा. हे लोक वाघाची पूजा करतात. वाघ हे देवीच वाहन आहे.त्यामूळे श्रध्दे नुसार ही गावदेवी वाघा पासून रक्षण करीत असे )
काथोडी व काथकरी ( कातकरी )हे जंगलात राहणारे असून यांचा मुख्य व्यवसाय हा जंगलातील झाडा पासून काथ गोळा करणे किवा काथ कमवणे आहे. ‘काथ’ या शब्दा पासून अदिवासी समाजाचे हे दोन वर्ग तयार झाले.
मंदिराच्या बाहेर काही तांदळारुपात गावाचे रक्षक म्हणून त्यांची पुजा केली जाते. मंदिराची देखभाल ट्रस्ट कडून केली जात असली तरी गावातील दहा स्त्रिया पैकी एक या गावदेवी माता ची नित्यपूजा केली जाते.
संदर्भग्रंथ –
पेशवाई च्या सावलीत.
माझ गाव बदलापूर .
रियासत
सुभे कल्याण
महाराष्ट्र दर्शन
समाज व ज्ञाती.
संतोष मुरलीधर चंदने. चिंचवड, पुणे