महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,98,765

मराठेशाहीतील शेवटचा फिरंगी मनसबदार | जनरल पेरॉन

Views: 1468
8 Min Read

मराठेशाहीतील शेवटचा फिरंगी मनसबदार | जनरल पेरॉन

मित्रानो, आज आपण उत्तर मराठेशाहीतील एका वेगळ्या व्यक्तीकडे वळणार आहोत. लेखाच्या शीर्षकावरून आपल्याला कळले असेलच की आज आपण फ्रेंच सरसेनापती जनरल पेरॉन बद्दल बोलणार आहोत. मराठेशाहीचा इतिहास ज्या परकीय व्यंक्तींच्या उल्लेखाविना अपूर्ण राहील अशी एक व्यक्ती म्हणजे जनरल पेरॉन होय. फ्रांसमधील आपल्या मूळगावी उमेदीच्या काळात कष्टात दिवस काढणाऱ्या, रस्त्यावर हातरुमाल विकून पोटाची खळगी भरणाऱ्या या माणसाने हिंदुस्तानात येऊन आपले एक प्रचंड साम्राज्य निर्माण केले. त्याची ही कथा जितकी सुरस आहे तितकीच ती वेदनामय देखील आहे. निवृत्ती नंतर आपल्या गावी जाताना त्याने हिंदुस्थानातून अफाट संपत्ती नेली खरी, पण त्याचे शेवटचे आयुष्य आपल्या देशातच एखाद्या कैद्यासारखे गेले.त्याच्या हिंदुस्थानातील विश्वासघातकी वर्तणुकीमुळे फ्रेंच लोकांना त्याचे नाव घेण्यास लाज वाटते.या माणसाने आपल्या देशाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली अशी सामान्य फ्रेंच लोकांची भावना होते. अशा या वेदनामय प्रवासाची ही रोमहर्षक कहाणी!(मराठेशाहीतील शेवटचा फिरंगी मनसबदार)

जन्म व पूर्वाश्रमीची कारकीर्द:  पेरॉनची सुरुवातीच्या कारकिर्दीचा काळ म्हणजे सन १७५५ ते १७९६चा कालावधी होय. त्याचा जन्म १७५५मध्ये सार्थे फ्रांस ( Chateau du Loire, Sarthe,France) येथे झाला. त्याचे मूळ नाव ‘पीएरे क्यूलीअर’(Pierre Cuillier) असे होते, हिंदुस्थानात आल्यावर काही वर्षाने  त्याने आपले नाव बदलून त्या काळातील प्रथेनुसार सुटसुटीत पेरॉन असे करून घेतले. त्याच्या वडिलांचा कापडाचा व्यवसाय होता, पेरॉन लहान असताना तो धंदा बुडाला. त्यामुळे पेरॉनला आपल्या पायावर उभे राहणे भाग पडले. आपल्या श्रीमंत नातेवाईकांकडून मदत मिळण्याचा मार्ग बंद झालेला पाहून तो गाव सोडून १७७४मध्ये राजधानीच्या गावी निघाला व तेथे त्याने हातरुमालाचा व्यवसाय सुरु केला. शेजारच्या ‘नंतेस’ (Nantes) या गावी जाऊन हातरुमाल किरकोळ स्वरूपात विकण्याचा त्याच्या धंद्यात त्याला यश आले नाही, तेव्हा त्याने व्यवसाय न करता एका तोफा करणाऱ्या फौंड्रीत नोकरी पत्करली.  तेथे त्याने तोफा तयार करण्याच्या कामात बऱ्यापैकी प्राविण्य संपादन केले. नंतर आयल ऑफ फ्रांस (Isle of France) च्या एका सैन्य तुकडीत त्याने स्वयंसेवक म्हणून नाव नोंदणी केली. त्यानंतर त्याने फ्रान्सच्या नेव्हीमध्ये नोकरी पत्करली असे दिसते कारण १७८०मध्ये तो जेव्हा हिंदुस्थानात आला तेव्हा तो एक सामान्य सेलर होता. दुसऱ्या एका माहितीनुसार तो त्यावेळी फ्रेंच जहाज सार्दिन वर एक कनिष्ठ अधिकारी होता. सुरुवातीला त्याचे जहाज दक्षिण हिंदुस्थानात मलबारच्या आसपास लागले असावे. त्यावेळेस दक्षिण हिंदुस्थानातील राज्यात त्यांचे झालेलं स्वागत पाहून पेरॉन भलताच खुश झाला व त्याने आपल्या तीन सहकार्यासहित त्या जहाजावरुन पोबारा केला आणि तो मलबारच्या किनारपट्टीवर उतरला.

तेथून त्याने हिंदुस्थानात अंतर्गत उत्तेरत प्रवास केला आणि १७८१मध्ये तो गोहदच्या राण्याच्या लष्करात सामील झाला. त्यावेळी गोहदच्या राण्याच्या सैन्याचा प्रमुख स्कॉटिश सान्गस्टर होता आणि त्याच्या हाताखाली टॉम लेगे आणि मिचेल फेलीसो हे दोन युरोपिअन अधिकारी होते.या सुमारास पीएरे क्यूलीअर याने आपले फ्रेंच नाव टाकून सुटसुटीत असे पेरॉन नाव धारण केले. त्या काळात अशी सोपी नवी नावे ठेवून घेण्याची पद्धतच होती. याच पद्धतीने वाल्टर रेनहार्ड ने ‘सुमेर ‘ नाव घेतले ज्याचे बोली भाषेत रुपांतर सोम्बरे केले गेले. जॉर्ज हेसिंग चे नाव जोरुस साहेब झाले तर लुईस बारगुईन चे नाव लुई साहेब,जॉर्ज थॉमस याचे नाव जेहाजी साहेब, जेम्स शेफर्ड चे जेम्स साहेब पडले. रॉबर्ट सुथरलँड चे रूप सतलज साहेब, कॅप्टन सिम्स चे नाव संक साहेब, कॅप्टन ब्राऊनरींग हा या बाबतीत भलताच दुर्दैवी ठरला.त्याचे नाव स्थानिक भाषेत बुरांडी ठेवले गेले.  पीएरे क्यूलीअरने आपले नाव पेरॉन केले तरी स्थानिक लोकांनी त्याचे रूपांतर पिरू साहेब केले.(Peeru is equivalent to turkey in local language). आज ही पुण्यातील सदाशिव पेठेत पेरूगेट हे नाव अभिमानाने  झळकताना दिसते त्याचे श्रेय पेरॉनला दिले पाहिजे असे वाटते. (पेरूगेट या ठिकाणी पेरॉनची लष्करी छावणी होती असे म्हणतात).

पेरॉन याने आपली सुरुवातीची कारकीर्द साध्या नोकरीच्या स्वरूपात सुरु केली व सुरुवातीची दोन वर्षे त्याला शिपाई म्हणून काम करावे लागले. हिंदुस्थानात येण्यापूर्वी डी बॉयन ला जसा लढायांचा अनुभव होते तसा  पेरॉन याला नव्हता हे त्यामागचे कारण असावे. हिंदुस्थानातील एतद्देशीय राजाकडे पहिली नोकरी असल्याने त्याला हलकी कामे करावी लागली,फार तर सान्गस्टरच्या हाताखालील मदतनीसचे काम त्याला मिळाले. या सुमारास परिस्थितीच्या रेट्यामुळे त्याने लग्न केले आणि मॅडल (Mdlle Dixidom) नावाच्या युवतीशी त्याचा विवाह पार पडला.त्या वधुचे आईवडील त्यावेळेस पॉण्डेचेरीमध्ये राहत होते आणि तिचा भाऊ उत्तरेत लष्करात नोकरी करत होता. त्यानंतर गोहदच्या राण्याचा लढाईत पराजय झाल्यावर त्याने आपल्या कवायती फौजेचा पसारा आवरला. त्यामुळे बेकार झालेल्या पेरॉन याला  भरतपूरच्या जाट राण्याकडे नोकरी करावी लागली. त्यावेळी त्याचा कमांडर लॅस्टिनो(Lestineau) होता. हा काळ साधारण १७८४चा असावा. त्याचा पगार वाढून त्यावेळेस त्याला महिना ६०रुपये मिळत होता.येथे त्याने काही वर्षे सेवा केली व चकसान व आग्रा येथील लढयात भाग घेतला. त्याचा कमांडर हा महादजी शिंद्यांचा मित्र असल्याने १७८९मध्ये त्याने दिल्लीच्या लढाईत पण मराठयांकडून भाग घेतला. या वेळेस गुलाम कादिर याच्या पाठलागावर असताना लॅस्टिनोच्या ताब्यात गुलाम कादिरकडील मौल्यवान संपत्ती असलेली पिशवी आली. ही संपत्ती दिल्लीच्या किल्ल्यातून लुबाडलेली जवाहीर व सोन्याच्या मोहरानी भरलेली होती. तेव्हा  लॅस्टिनोच्या तोंडाला पाणी सुटले व त्याने आपले सैन्य आपला दुय्यम अधिकाऱ्याच्या ताब्यात दिले व महादजींच्या आज्ञा मोडून तो पसार झाला. तो व त्याने हडप केलेली संपत्ती याचा पत्ता कधीच लागला नाही.( आपल्या भारतमातेची अशी किती संपत्ती कुठे कुठे लुटली गेली हे त्या साक्षात ईश्वरालाच ठाऊक!  )

लॅस्टिनोच्या सैन्याची वाताहत झाल्याने पेरॉन पुन्हा बेकार झाला, पण यावेळेस त्याने महादजीकडील वरिष्ठ लष्करी अधिकारी राणेखानकडे नोकरी पत्करली. राणेखानने त्याला एका कंपनीचा पुढारी बनवले परंतु काही महिन्यात ती कंपनी बंद झाल्याने पेरॉनवर परत बेकारीची कुऱ्हाड कोसळली. या वेळेस त्याचा मित्र मोंटागने (Montogny)याने मदत करून त्याला बेगम सुमेरूकडे नोकरी मिळवून दिली. दुर्दैवाने बेगमने आपल्या सैन्याचा गेल्या १५ महिन्याचा पगार दिलेला नव्हता तेव्हा अशा नवीन माणसाची भरती करणे तिला अयोग्य वाटले. त्यामुळे त्याचा नोकरीवर पुन्हा गदा आली. हा १७९०चा सुमार होता आणि भारतात येऊन त्याला आता ९ वर्षाचा काळ लोटला होता आणि त्याच्या अपेक्षेप्रमाणे आतापर्यंत तरी त्याजकडे म्हणावी तशी आर्थिक सुबत्ता आली नव्हती. अशा प्रकारे टायच्या आयुष्यात आशानिराशेचा खेळ सतत चालू होता. पण त्याने हिम्मत सोडली नाही.

आता मात्र त्याच्या आयुष्यातील महत्वाचा वळणबिंदू आला. महादजींनी डी बॉयन याला त्यांच्यासाठीची अजून एक ब्रिगेड उभारायला सांगितले होते आणि त्यामुळे डी बॉयन यावेळेस सक्षम अधिकाऱ्यांच्या शोधात होता.डी बॉयन पेरोनला वैयक्तिक माहितीचा होता आणि लढाईतील शिपाई म्हणून व फौंड्री मधील कुशल सुपरवायझर म्हणून त्याचे कौशल्य तो जाणून होता. त्यामुळे डी बॉयन याने त्याला आपल्याकडे कॅप्टन लेफ्टनंट म्हणून भरती केले व त्याच्याकडे बुऱ्हाणपूर बटालियनचे नेतृत्व सोपविले.

या काळात पेरॉनची कार्यक्षमता, धैर्य व वक्तशीरपणा यामुळे डी बॉयन चांगलाच प्रभावित झाला. १७९०मध्ये जयपूर व जोधपूर येथील नरेशांच्या विरुद्ध मराठ्यांना पाटण व मेडता येथे लढाईची वेळ आली.  पेरॉन या दोन ही लढायांत हजर होता आणि विशेषकरून पाटणच्या लढाईत त्याचे युद्धकौशल्य दिसून आले. या लढाईतील विजयानंतर डी बॉयन आपल्या दुआबातील मुख्यालयावर परतला आणि अजमेरचा  बंदोबस्त त्याने सहकारी पेरॉनवर सोपविला. पेरॉन ते कर्तव्य उत्कृष्टपणे बजावले.

पुढे १७९२मध्ये पेरॉन याने दोआबमध्ये कूच केले परंतु पुढच्या कामगिरीसाठी त्याची लगेच निवड केली गेली. कनौदचा राजा मराठ्यांच्या विरुद्ध कारस्थाने करीत होता तेव्हा त्याला सरळ करण्यासाठी सोबत चार बटालियन देऊन डी बॉयन याने पेरॉनची पाठवणी केली. (मराठेशाहीतील शेवटचा फिरंगी मनसबदार)

संदर्भ:
शिंदेशाही इतिहासाची साधने भाग ८ (शिंदेशाहीतील शेणवी मंडळींचा अस्सल पत्रव्यवहार),
Military Adventures of Europeans in Hindusthan, Herbert Compton,
मराठी रियासत भाग ७, सरदेसाई गो. स.,

संकलन व लेखन: प्रमोद करजगी

Leave a Comment