महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,12,053

जनरल पेरॉन | मराठेशाहीतील शेवटचा फिरंगी मनसबदार भाग २

Views: 1346
12 Min Read

मराठेशाहीतील शेवटचा फिरंगी मनसबदार | जनरल पेरॉन –

कनौदचा वेढा: रेवाडी प्रांतातील कनौदचा किल्ला अतिशय बळकट होता आणि पूर्वी तो शाह आलमच्या दरबारातील एक सरदार नजफ कुलीखानच्या ताब्यात होता.खानाच्या मृत्यूनंतर तो त्याच्या विधवा पत्नीच्या ताब्यात गेला. तिला शरण येण्यास डी बॉयन याने कळविले पण तिने नकार दिला. त्या विधवा बाईशी बोलणी चालू असताना इस्माईल बेग तिच्या मदतीसाठी पुढे आला. खरे तर मेडत्याच्या पराभवानंतर तो मराठ्यांना शरण आला होता व त्यांच्या हुकूमाखाली वागायला तयार होता. परंतु त्याचा कल पूर्वीच्या सत्तेकडे होता आणि तुकोजी होळकरांच्या चिथावणीवरून तो नजफच्या बेगमेकडे गेला. शिंद्यांच्या उत्तरेतील वचक कमी करण्यासाठी तुकोजीने केलेली ती चाल होती. तेव्हा त्याने शिंद्यांच्या विरुद्ध २० हजार फौज व ३० तोफा घेऊन बेगमच्या मदतीसाठी जाण्याचे ठरवले. (जनरल पेरॉन)

ही बातमी लागल्यावर डी बॉयन याने पेरॉन तातडीने पाठवले व इस्माईल बेगचा वाटेतच समाचार घेऊन त्याला जिवंत किंवा मृत अवस्थेत आणण्याचा आज्ञा केली. कनौद जवळ पोचल्यावर पेरॉनला कळून चुकले की शत्रू किल्ल्यात जाऊन सुरक्षित बसला आहे तेव्हा त्याने लगेच किल्ल्याला वेढा घातला. एखाद्या मोहिमेत स्वतः नेतृत्व करण्याची पेरॉनची ही पहिलीच वेळ होती आणि त्यात त्याने चांगली चुणूक दाखवली. इस्माईल बेगने किल्ल्याबाहेर पडून मराठ्यांना प्रतिकार केला तरी पेरॉन याने त्याच्या जोरदार हल्ला करून २ तासाच्या लढाईत त्याचे २हजार सैनिक कापून काढले व त्याला आश्रय घेण्यासाठी किल्ल्यात जाण्यास भाग पाडले.

सुरुवातीच्या लढाईत इस्माईल बेगचा पराजय झाला असला तरी पुढील चार महिने त्यांनी किल्ल्याच्या आश्रयाने चांगली लढत दिली.कनौदच्या किल्ल्याच्या मातीच्या जाड भिंतीपुढे पेरॉनचा तोफखाना निष्प्रभ ठरला आणि त्याच्याकडे पुरेशी सैन्यसंख्या नसल्याने त्याला किल्ल्याचा ताबा घेता येईना. वेढा बरेच महिने लांबत जाईल असे वाटत असताना किल्ल्यात एकाएकी बुद्धिबळ खेळणाऱ्या बेगमला डोक्यात एक दगड लागून तिचा मृत्यू झाला. त्यावेळी तिच्या सैन्यात गोंधळ माजून त्यांनी इस्माईल बेगच्या अरेरावी हुकूमाखाली लढायला नकार दिला. बंडखोर सैनिकांनी इस्माईल बेगला किल्ल्याच्या बाहेर हाकलून देऊन किल्ला मराठ्यांच्या ताब्यात देण्याची गुप्त योजना केली परंतु इस्माईल बेगला त्याचा सुगावा लागल्याने त्याने पेरॉनशी वार्तालाप चालू केला.पेरॉन याने डी बॉयनशी संपर्क साधल्यावर डी बॉयन याने त्याला जीवनदान देण्याचे कबुल केले व महादजीच्या इच्छेविरद्ध त्याने ते अमलात सुद्धा आणले.(जनरल पेरॉन)

पेरॉनचा उदय:कनौदच्या लढ्यात पेरॉनवर जीवावर बेतणारा अपघात झाला,त्याच्या हातात एका तोफगोळ्याचा स्फोट झाला ज्यामुळे त्याचा एक हात कायमचा जायबंदी झाला. त्यामुळे त्याचे उत्तरेत नांव ‘एकदस्त’ असे पडले. पण या लढाईतील शौर्याचे त्याला फळ मिळाले आणि त्याला मेजर हुद्द्यावर बढती मिळाली आणि डी बॉयनच्या दुसऱ्या ब्रिगेडचा तो प्रमुख झाला. अशा रीतीने शिंद्यांच्याकडे नोकरीस लागून तीन वर्षे होण्याच्या आतच पेरॉन एका ब्रिगेडचा मुख्य झाला आणि त्याच्या हाताखाली ८ हजार पायदळ, ८शे घोडदळ आणि ४० तोफा एव्हढा सैन्याचा ताफा आला. तसेच त्याचा दरमहा पगार २००० रुपये पेक्षा जास्त झाला. गेल्या काही वर्षांपूर्वी जो माणूस बेकार होता किंवा वर्षाला कसेबसे सातशे रुपये कमवीत होता, त्या दृष्टीने त्याने चांगलीच प्रगती केलेली होती.(जनरल पेरॉन)

सन १७९३ मध्ये पेरॉन हा लखबादादा व राणेखान यांच्या हाताखाली होता व मेवाडच्या मोहिमेत त्याने काम केले. तेथेच त्याला सुभेदाराच्या हाताखालच्या अधिकाऱ्याचा दर्जा मिळाला. ही मोहीम पूर्ण झाल्यावर महादजींनी पुण्यासाठी प्रस्थान ठेवले  आणि पेरॉन आपल्या मुख्यालयात परतला. तेथे फार वेळ त्याला न ठेवता १७९४ मध्ये त्याची दक्षिणेत रवानगी महादजीचे हात बळकट करण्यासाठी करण्यात आली.परंतु पेरॉन पुण्यात पोचायच्या आतच त्यांच्या राजाचा म्हणजेच महादजींचा मृत्यू झाला आणि शिंद्यांच्या दौलतीची सारी सूत्रे दौलतरावांकडे गेली. पेरॉन आणि त्याचे कवायती सैन्याचे १०बटालियन मार्चमध्ये पुण्यामध्ये पोहचलेले असल्याने दौलतीची वारसा हक्काची प्रक्रिया सुरळीत पार पडली असे म्हंटले जाते.

खर्ड्याची लढाई: त्यानंतर १७९५ मध्ये पेशवे दरबार आणि निझाम यांच्यात चौथाईवरून वाद उत्पन्न झाला आणि दोन्ही फौजा लढाईला मैदानात आल्या. या लढाईत शिंद्यांच्या बाजूने डी बॉयनच्या कवायती फौजेची मोठी मदत झाली. डी बॉयनच्या बाजूने पेरॉनच्या हाताखालील पहिली ब्रिगेड, मिचेल फिलॉसच्या हाताखालील स्वतंत्र ६बटालियन, कर्नल हॅसिंग्जच्या हाताखालील ४ बटालियन आणि मोठ्या संख्येने घोडदळ लढायला आले. तुकोजी होळकर शॅव्हेलिअर दुड्रेन्स त्याच्या हाताखालील चार बटालियन व पायदळाची ब्रिगेड घेऊन हजर झाला. भोसल्यांची व इतरांची फौज धरून मराठ्यांची सेना १ लाख ४०हजार झाली पैकी २४००० कवायती फौज होती. दौलतराव शिंदे जरी लढाईत हजर होते तरी लढाईची सर्व सूत्रे पेरोनकडे होती.

मराठ्यांच्या या मोठया प्रमाणातील जमलेल्या सैन्याला तोंड देण्यासाठी निझामाने सुद्धा १ लाख १० हजार  सैनिकांची मोठी फौज जमा केली ज्यामध्ये १७ हजार सैनिक हे शिस्तबद्ध अशा पायदळातील होते त्यापैकी ११ हजार सैनिक हे एका प्रतिष्ठित फ्रेंच सेनापती रेमंडच्या ताब्यात होते. बाकीच्यापैकी तीन तीन हजार हे बॉयड या अमेरिकन सेनापतीच्या अधिपत्याखाली व फिन्गलास नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याखाली होते.(जनरल पेरॉन)

११मार्च १७९५ रोजी दोन्ही कडील सेना परिंदाजवळ भिडल्या ज्यावेळेस निझाम हा खर्ड्यापासून कूच करीत होता. निझामाच्या सैन्याच्या उजव्या बगलेवर मराठ्यांनी तोफखान्याने जोरदार हल्ला चढविला त्यावेळेस निझामचें नेहमीचे सैनिक तेथून दूर सरकले व रेमंडच्या हाताखालील कवायती फौजेने एका उंच ठिकाणावर आपल्या २४ तोफा जमवल्या, त्याच्या खाली निझामचें घोडदळ उभे राहिले.  हे पाहून पेशव्यांचा मुख्य सेनापती परशुरामभाऊ हे हल्ल्याला तोंड देण्यास सरसावले, मध्यभागी शॅव्हेलिअर दुद्रेनेकची फौज व पेशव्यांच्या घोडदळासह ते स्वतः होते तर उजव्या बगलेवर बिरारच्या राजाचे सैन्य होते , दौलतराव शिंद्यांचे पायदळ त्यांच्या डाव्या बाजूला होते. निझामाच्या घोडदळाने मराठ्यांच्या मध्यभागावर हल्ला चढवून लढाईला तोंड फोडले, निझामाकडील येव्हल्स मिझमचे घोडदळ आदल्या दिवशीच्या एका चकमकीत सरशी मिळाल्याने जोशात होते. यावेळेस त्यांनी केलेला हल्ला जोरदार होता, त्यावेळेस परशुराम भाऊ जखमी झालेले व मराठ्यांची मधली फळी विस्कळीत होऊन गोंधळ झाला. मधल्या फळीवर असा गोंधळ चालू असताना मराठ्यांची डावी व उजवी पायदळ पुढे घुसली आणि ती निझामाच्या फौजेच्या अगदी समीप आली. पेरॉन याने अत्यंत हुशारीने हालचाली करून तो मोक्याच्या जागेवर आला व पहिल्या रांगेतील ३५ तोफांची जोराची सरबत्ती त्याने चालू केली. यावेळी निझामचें रेमंडचे घोडदळ मागे गेले परंतु त्याचे पायदळ मात्र जागेवर ठामपणे उभे राहिले. त्यांनी मराठ्यांशी लढाईला सुरुवात केली आणि कदाचित त्या दिवशीच्या अखेरीस त्यांना जय मिळाला असता. परंतु आशिया खंडामधील लढाईत बऱ्याच वेळेस शुभ शकुन व अपशकुन लढयाचे निर्णय ठरवतात तसे यावेळी झाले. निझाम लढाईला आला तेव्हा त्याने आपला जनानखाना सोबत आणला होता. त्यांच्यापैकी निझामाची सर्वात आवडती बेगम ही लढाईतील जोराचा आवाज व गोंधळ ऐकून घाबरून गर्भगळीत झाली. भीतीने तिने निझामाला त्या लढाईतून परत फिरण्याचा आग्रह चालवला.त्यावेळी तिला सुरक्षित कवच देण्यासाठी निझामाने रेमंड यास आपले सैन्य तिच्या भोवती एकत्र करण्यास सांगितले. रेमंड याने आज्ञा पाळण्यास सुरुवातीस नकार दिला परंतु निझामाच्या वारंवार सूचनेमुळे त्याने दिवस अखेरीस माघार घेतली.पेरॉन याला हिंदुस्थानांतील लढाईचा पुरेपूर अनुभव असल्याने त्याने जितका वेळ शक्य आहे तोपर्यंत आपले हल्ले चालू ठेवले व संधी प्रकाशात बंदुकांचा मारा करून बढती मिळवली.(जनरल पेरॉन)

तोपर्यन्त रेमंड याला इतके उलट सुलट आदेश मिळत होते की त्याची फौज पूर्ण गोंधळात पडली.शेवटी कंटाळून व दमणूक होऊन ती आराम करण्यास विसावली. पण रात्री ११च्या सुमारास दोन्हीकडील पुढच्या फळीतील सैनिकांची अचानक चकमक उडाली.यावेळेस पेरॉन याला आधीच बढत मिळाल्याने त्याने आपली बंदूकधारी फौजेचा जोरदार भडीमार चालू केला. यामुळे निझामचें पायदळ आपल्या बंदुका टाकून देऊन खर्ड्याच्या दिशेने किल्ल्यात आश्रय घेण्यास धावत सुटले.काही वेळ निझामाने या किल्ल्यात आसरा घेतला व रेमंडचे सैन्य जीव तोडून त्याच्या रक्षणार्थ लढले. यावेळेस पेरॉन याने आपले जड तोफदल पुढे सरसावून असा मारा केला की निझामाला सर्व अटी स्वीकारून शरण येणे भाग पडले. या वेळी तहात निझामाने ३०लाख रुपये देण्याचे काबुल केले तसेच साडे तीन लाखाचा भूभाग सुद्धा मराठ्यांना दिला. या अटींच्या पूर्ततेसाठी त्याला आपला मुख्य कारभारी पुण्याच्या दरबारात ओलीस  म्हणून  पाठवणे भाग पडले.

खर्ड्याची लढाई निर्नायकी झाली खरी पण या लढाईमध्ये झाला तितका कमी रक्तपात कधी झाला नव्हता. या लढाईत जवळ पास अडीच लाख सैन्य जमा झाले होते परंतु या लढाईत झालेली हानी अगदी किरकोळ स्वरूपाची होती आणि याला साक्षात स्वतः निझामाचा भ्याडपणा व निष्काळजीपणा जबाबदार होता.तसेच या लढाईत पेरॉनची सेनापती म्हणून कर्तृत्व उठून दिसले आणि त्याचा धनी दौलतराव शिंदेंच्या ते नजरेत भरले यात शंका नाही.

डी बॉयनचे स्वदेश गमन व पेरॉनची बढती: १७९५मध्ये शिंद्यानी उत्त्तरेत जाण्यासाठी प्रस्थान ठेवले आणि कूच करून ते गोदावरी नदीपर्यंत पोचले. या वेळेस शिंद्यांच्या एकनिष्ठ सेनापती डी बॉयन याने राजीनामा देऊन युरोपात परत जाण्याची इच्छा प्रकट केल्याने त्याची तजवीज करायला शिंद्यांना उत्तरेत जाणे भाग पडले होते. पण २५ ऑक्टोबर १७९५मध्ये पुण्यात पेशवे सवाई माधवरावाने आत्महत्या केली.ही बातमी सूत्रांनी दिल्यावर आपला कारभारी बाळोबातात्या यांच्या सल्ल्यानुसार दौलतरावांना पेशव्यांचा वारस नेमण्याच्या कामासाठी सर्व फौज घेऊन पुण्यास परतावे लागले. दुसरा बाजीराव ज्याला आधीच्या पेशव्यांनी आपला वारसदार जाहीर केल्यानुसार नाना फडणीस यांनी त्यांना पेशवेपदावर बसविले.

डी बॉयन याने तरीसुद्धा आपली युरोपला परत जाण्याची इच्छा कायम ठेवली. केवळ आपल्या चमकदार कामगिरीमुळेच डी बॉयन याने हिंदुस्थान सोडण्याचा निर्णय घेतला असे पेरॉन म्हणणे होते असे ऐतिहासिक ग्रंथात नमूद केलेले आहे. यामध्ये पेरॉनचा आढ्यतेखोर स्वभाव व आत्मप्रौढी स्पष्टपणे दिसून येते. डी बॉयनची जागा भरून काढण्यास पेरॉन याने आपली इच्छा दर्शवली तरी पण दौलतरावाच्या मनात त्याच्या कार्यक्षमतांबद्दल खात्री नव्हती. शेवटी डिसेंबरमध्ये बॉयन याने हिंदुस्थान सोडले. हिंदुस्थानातील त्या वेळचे प्रथेनुसार त्याने आपला वारसदार जाहीर करायला हवा होता पण त्याने तसे न करता दौलतरावाला आपली ब्रिगेड बरखास्त करण्यास सांगितले कारण डी बॉयनच्या मते त्या ब्रिगेडची महाभयंकर ताकद एका नादान माणसाच्या हाती जाणे हे भविष्यात धोकादायक ठरू शकेल असे होते.  डी बॉयन गेल्यानंतर त्याच्या पदासाठी पेरॉन व रॉबर्ट सुथरलँड यांच्या स्पर्धा सुरु झाली. याचवेळी मेजर फ्रीमोंट मरण पावल्याने  सुथरलँड हा वरिष्ठ अधिकारी शिलकी राहिला. सुथरलँडच्या दुर्दैवाने तो बुंदेलखंडाच्या मोहिमेत गुंतला असल्याने दौलतरावाच्या नजरेपासून दूर होता. त्याचा फायदा पेरॉनने घेतला व सूत्रे आपल्याकडे घेतली.

१७९५ नंतर बॉयन स्वदेशी परतल्यावर पालटणीचे नेतृत्व पेरॉनकडे आले.हातात आलेल्या संधीचा पूर्ण वापर करून घेत पेरॉन याने शिंदे दरबारातील आपले महात्म्य वाढवले आणि १७९६च्या अखेरीस साहजिकच शिंद्यांच्या कवायती

फौजेचे सरसेनापतिपद आपसूक शिंद्यांच्या दरबारात हजर असलेल्या पेरॉनकडे आले.

मित्रानो, जनरल पेरॉनच्या रोमहर्षक आयुष्याच्या मध्यापर्यंत येऊन पोचलो आहोत. येथे थोडावेळ विसावा घेऊ या आणि उरलेला प्रवास लेखाच्या उत्तरार्धात सुरु ठेऊ या, एका ‘छोट्याशा विश्रांती’ नंतर!! या नंतर सुरु होणार आहे लढायांची मालिका, राजनीतीचे खरेखोटे डावपेच, पेरॉनने दाखवलेले रंग, त्याचे स्वगृही परतणे आणि त्याचा शेवटचा प्रवास!!! (to be continued….)

मराठेशाहीतील शेवटचा फिरंगी मनसबदार भाग १

संदर्भ:
शिंदेशाही इतिहासाची साधने भाग ८ (शिंदेशाहीतील शेणवी मंडळींचा अस्सल पत्रव्यवहार),
Military Adventures of Europeans in Hindusthan, Herbert Compton,
मराठी रियासत भाग ७, सरदेसाई गो. स.,

संकलन व लेखन: प्रमोद करजगी

Leave a Comment