महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,25,328

मराठेशाहीतील शेवटचा फिरंगी मनसबदार भाग ५

By Discover Maharashtra Views: 1330 12 Min Read

मराठेशाहीतील शेवटचा फिरंगी मनसबदार भाग ५ : जनरल पेरॉन (उत्तरार्ध)

पेरॉनचा विश्वासघातकीपणा: यशवंतराव होळकरदौलतराव शिंदे यांच्यातील वैर उफाळून वर आले आणि शिंद्यांचे महत्वाचे ठिकाण उज्जैन येथे १८०१च्या जुलै मध्ये झालेल्या लढाईत होळकरांनी शिंद्यांचा पराभव केला आणि उज्जैन शहर येथेच्छ लुटून घेतले. त्यावेळी दौलतरावाने दिल्लीहून पेरॉन याला मदतीसाठी तातडीने दक्षिणेस येण्याचे बोलावणे पाठवले.या सुमारास पेरॉन हा उत्तरेतील दुसरा एक फिरंग मर्सिनरी, जॉर्ज थॉमस बरोबरीच्या लढाईत गुंतला होता.दिल्लीच्या आसपास हरियाणामधील भागात जॉर्जचे वाढते प्रभुत्व त्याला नको होते म्हणून त्याच्या विरुद्ध पेरोंन याने लष्करी आघाडी उघडली होती. त्यामुळे आपले काम अर्धवट टाकून उज्जैनला जाणे त्याला पसंत नव्हते. तसेच अशा स्थितीत उज्जैनला जाणे म्हणजे संपूर्ण दिल्ली व त्याच्या आसपासचा भाग जॉर्ज थॉमस याला आपले लष्कर हटवून मोकळा करून देण्यासारखे होते. पेरॉनला असा धोका घेणे मंजूर नव्हते.शिंद्यांच्या राजधानीवर कोसळलेल्या संकटाचे त्याला काही सोयरसुतक नव्हते कारण त्याचे स्वतःचे वाढते महत्व त्याला जास्त जवळचे होते. स्वतःच्या स्वार्थापायी त्याने आपल्या धन्याच्या आदेशाकडे साफ दुर्लक्ष केले.(मराठेशाहीतील शेवटचा फिरंगी मनसबदार भाग ५)

दौलतरावाची पेरॉनला मदतीसाठी बटालियन पाठवण्याची पत्रे मात्र जात होती. पण तो या ना त्या कारणाने वेळ घालवत राहिला. एक दोनदा त्याने दिल्लीतून निघण्याचे नाटक केले परंतु तो आजूबाजूला घुटमळत राहिला. पेरॉन याने ५-६ महिने काहीच हालचाल केली नाही तो फक्त चालढकल करीत राहिला. नंतर तो अलिगडला निघून गेला. सप्टेंबरमध्ये जॉर्ज थॉमस याने पेरॉनचा सेनापती कॅप्टन स्मिथ याचा पराभव केला व जॉर्जगड काबीज केला. या दरम्यान पेरॉन याने पैशाच्या अति मोहापायी सावकारीचा धंदा चालू  केला आणि त्याने प्रतापसिंगास काही लाख रुपये उधार दिले होते. आता जॉर्जगडच्या लढाईसाठी त्याला पैसे परत हवे होते. परंतु पैसे परत करण्यास प्रतापसिंग का कू करत होता. पेरॉनला शिंद्यांच्या मदतीला जाण्याची इच्छा नव्हती उलट होळकरांनी दौलतरावास अजून त्रासच द्यावा असे अशी त्याची मनोमन इच्छा होती. शेवटी पेरॉनच्या फौजेतील काही युरोपिअन सरदार दौलतरावाच्या मदतीस गेले. त्यांच्या साहाय्याने नोव्हेंबर १८०१ मध्ये दौलतरावाने यशवंतराव होळकरांचा इंदोर येथे पराभव केला. जानेवारी १८०२मध्ये पेरॉन याने जॉर्ज थॉमसवर मात करून जॉर्जगड पुन्हा ताब्यात घेतला. पण या दरम्यान पेरॉन आणि दौलतराव दोघांच्यात वितुष्ट किंवा संशयाचे वातावरण तयार झालेले होते.

पेरॉनची निवृत्ती, व्यक्तिमत्व व मृत्यू १८०३ ते १८३४: पेरॉनचे लष्करी सामर्थ्य एव्हढे वाढले की तो स्वतःला स्वतंत्र समजू लागला आणि दौलतरावाला जुमानेसा झाला. त्याचा विश्वासघातकी स्वभाव साऱ्या जगाला समजून आला. इकडे दक्षिणेत पेशवे आणि दौलतरावाच्यामध्ये संबंध बिघडलेले होते. यशवंतराव होळकराने पेशव्यांच्या सेनेचा पुण्यावर पराभव केला आणि भावाच्या मृत्यूचा सूड घेत पुण्याची राखरांगोळी केली. या वेळेस पेशव्यांनी दौलतरावास मदतीस पाचारण केले होते. पण तो पेरॉनच्या मदतीवर विसंबून होता. पेरॉन हा आपल्या व्यापात अडकला असल्याने दक्षिणेत पलटणी पाठवण्यास असमर्थ होता. या साऱ्याचा परिपाक आणि इतर अनेक कारणाने पेरॉन इंग्रज अधिकारी जनरल लेकला शरण गेला. १ ऑक्टोबर १८०३ रोजी पेरॉन आपल्या स्वीय सचिवांसह बेकेट (Beckett)लखनौला पोचला. हिंदुस्थानी घोडदळापासून स्वतःला वाचवण्यात तो यशस्वी झाला होता. गव्हर्नर जनरलच्या आदेशानुसार पेरॉनचे त्याच्या लष्करी हुद्द्याला साजेसे मोठे जंगी स्वागत करण्यात आले. त्याला ताबडतोप कलकत्याला पाठवायची सूचना होती पण काही कारणाने त्याला उशीर झाला. लखनौला आल्यावर पेरॉन याने वेलस्लीला पत्र पाठवून येताना वाटेत त्याने आग्रा येथील एका खाजगी इंग्रज बँकरकडे २२लाख रुपये व जडजवाहीर जमा केलेले होते. ते सोडवून मिळावे अशा पद्धतीची विनंती केली. वेलस्लीने चौकशी करून त्याची निर्णय कळविला की कंपनी सरकार पेरॉन व त्याच्या जवळचे साहित्य याची जबाबदारी घेते, त्याने येताना मागे सोडलेल्या कोणत्याही गोष्टीची जिम्मेदारी स्वीकारू शकत नाही. पेरॉनला बसलेला हा एक जबर धक्का होता. युरोपमध्ये पोचल्यावर सुद्धा त्याने या पैशाचा पाठपुरावा कोर्टात व इतरत्र चालू ठेवला. तोपर्यंत जडजवाहिरांची किंमत वाढत वाढत चौपट झाली होती.

पेरॉनच्या या पाठपुराव्यामुळे त्याचे पैसे परत न मिळाल्याने ब्रिटनने खाजगी मालमत्तेवर घातलेला मोठा ‘दरोडा’ असा ओरडा युरोपमध्ये होऊ लागला. ते पैसे जरी मिळाले नाहीत तरी पण पेरॉनच्या स्वतःच्या संपत्तीवर फारसा फरक पडला नाही कारण त्याने येताना इस्ट इंडिया कंपनीमध्ये सुमारे २.८ लाख पौंड रक्कम गुंतवली होती. ८ ऑकटोबरला त्याने कलकत्याला जाण्यास लखनौ सोडले व कलकत्याला पोचल्यावर चंद्रनगर या फ्रेंच वसाहतीमध्ये तो काही दिवस राहिला. त्याला युरोपला जाण्यास जहाज मिळण्यास नवीन वर्ष उजाडले आणि सप्टेंबर १८०५ मध्ये तो युरोपात हॅम्बुर्गला पोचला. तेथे फ्रांसचा पासपोर्ट (व्हिसा) काढून तो पॅरिसला पोचला. पेरॉनच्या आगमनानंतर काही दिवसांनी त्याचा पूर्वीचा हिंदुस्थानातील एक प्रतिस्पर्धी बुरोण सुद्धा युरोपात पोचला. आणि त्याचा व्हिसा अधिकाऱ्याच्या कार्यालयात भेटला. तेव्हा त्यांच्यामध्ये मोठे भांडण झाले, ते बघून व्हिसा अधिकारी सुद्धा बुचकळ्यात पडला. पॅरिसला गेल्यावर बोनापार्टने त्याचे थंडपणाने स्वागत केले. पॅरिसमध्ये फार दिवस न थांबता तो आपल्या फ्रेशनेस (Fresnes) या जहागिरीवर जी त्याने मोंटोरी (Montaire) जवळ विकत घेतली होती तेथे पोचला.त्याची आई आणि बहिणी यांनी त्याचे प्रेमाने व आपुलकीने स्वागत केले. गावात आपले बस्तान  बसल्यावर त्याने फ्रेंच स्त्रीशी मॅडम दु ट्रॉचेत (Du Trochet) बरोबर दुसरे लग्न केले. त्याला दोन मुली झाल्या आणि त्यापैकी एक जवळपास १८९२ मध्ये वारली. पुढे ३० वर्षे फ्रेशनेस मध्ये पेरॉन ऐषोआरामात राहीला. त्याच्या अखेरच्या दिवसात त्याच्यावर प्रजासत्ताकवादी(Republican) विचारांचा असल्याचा आरोप लागून त्याच्यावर फ्रांसमधील गुप्त पोलिसांनी पळत ठेवली. (या मागचे खरे कारण नीट उमजत नाही). त्यामुळे त्याचे आयुष्य आपल्याच आपलंच देशात एका कैद्यासारखे अगदीच बेकार गेले. “परवशता पाश दैवें ज्याच्या गळा लागला” अशी त्याची हालत झाली.

पेरॉन,डी बॉयन, जॉर्ज थॉमस हे अठराव्या  शतकातील तीन मशहूर युरोपिअन मर्सिनरी म्हणून भारतात आले होते आणि त्यापैकी प्रत्येकाने तत्कालीन हिंदुस्थानच्या राजकारणावर आपला ठसा उमटवला. त्यांच्यापैकी डी बॉयन आणि पेरॉन हे शिंद्यांच्याकडे नोकरीला लागले, राहिले, वाढले आणि लखपती म्हणून फ्रांसमध्ये परतले. त्या तिघांची नकळत तुलना होणे साहजिकच आहे. यां तिघांपैकी पेरॉन हा अगदी सामान्य परिस्थितीतून वर आला, तरीपण त्याने राजकीय सत्ता डी बॉयनपेक्षा जास्त बळकावली व उपभोगली. परंतु तो जॉर्ज सारखा धाडशी व निर्णय घेण्यात निपुण नव्हता, तसेच  बॉयनचा स्पष्टवक्तेपणा व आदब त्याच्याकडे नव्हती. थोडक्यात पेरॉन हा स्वप्रशंसामध्ये (Self appraisal) कमी होता असे म्हणावे लागेल. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्यापेक्षा शेवटच्या घडीला वेळ पडल्यास तो अनैतिक मार्गाचा सर्रास वापर करत असे. अन्याय आणि चापलुसी हे त्याच्या स्वभावाचे इतर दुर्गुण होते. त्यामुळे कदाचित एखाद्या इंग्लिश माणसाला त्याच्याकडे कामासाठी जाणे अवघड वाटत असे असे म्हणतात.

हिंदुस्थानात फ्रेंच संघराज्याचे स्वप्न: पेरॉन हा जरी स्वार्थी, अप्पलपोटी, हावरट आणि मतलबी असला तरी एक सैनिक म्ह्णून निश्चितपणे महान होता. त्याने केलेल्या लढाया विशेष करून सेंधवा, कनौद, मेडता आणि खर्डाच्या लढाया त्याच्या शौर्याची साक्ष देतात. त्याने एकाच वेळी हिंदुस्थानातील तीन बलाढ्य सेनापतीशी झुंझ दिली होती ते महान सेनापती म्हणजे लखबादादा, बाळोबा तात्या आणि जॉर्ज थॉमस होत. या तिघांच्या विरुद्ध त्याने जय मिळवला यातच त्याचे शौर्य आणि सैनिकीबाणा दिसू येतो. बॉयनचे पूर्वी अस्तित्वात असलेले सैन्य त्याने वाढविले आणि लढाईच्या सतत तयारीत ठेवले. दुसऱ्या बाजीरावाने वसईचा तह करून इंग्लिश लोकांसमोर शरणागती पत्करली तरी त्या परिस्थितीत सुद्धा हिंदुस्थानात फ्रेंच सैन्य बोलावून उत्तरेत फ्रेंच संघराज्य स्थापन करण्याचे त्याचे स्वप्न तो पाहू शकला यातच त्याच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो.

पेरॉनचे मूल्यमापन त्याच्या देशातील एका फ्रेंच लेखकाने केलेले आहे ते अंतर्मुख करायला लावणारे आहे. तो म्हणतो,’ ब्रिटिशांच्या अधिकाऱ्याला शरण येऊन पेरॉन याने हिंदुस्थानातील मराठे, शीख राजपूत या सर्वांचा केसाने गळा कापला आहे. आपल्या स्वार्थापायी त्याने शिंद्यांच्या मालकीची लाखो रुपयांची संपत्ती हडप करून स्वतःबरोबर  फ्रांसमध्ये आणली. त्याने हिंदुस्थानचे जेवढे नुकसान केले तेवढे नुकसान पन्नास वर्षात एखादी दुष्ट निष्ठुर संघटना पण करू शकणार नाही. त्याच्या अशा काळ्या कृत्याने त्याने फ्रेंच देशाला काळिमा फासण्याचे काम केले आहे.’

वयाच्या ७९ वर्षी सन १८३४मध्ये पेरॉन यांचे फ्रेशनेस येथे मरण पावला. तेथे त्याची कबर बांधण्यात आली खरी परंतु ‘Here lies’ (‘मरण पावलेल्याचे’ ) नाव त्याच्या कबरी वर खोदलेले नाही. जगात काही जण असे असतात की ज्यांना उद्दिष्ट मिळवण्यासाठी कोणत्याही मार्गाचा उपयोग करणे गैर नाही असे मानतात. त्यामध्ये पेरॉनचे नाव घेतले जाईल. असा हा हिंदुस्थानातून परत आलेला शेवटचा फ्रेंच सरदार जगाच्या पाठीवर शांतपणे पहुडला आहे. “नाही चिरा, नाही पणती” अशा अवस्थेत!

डी बॉयन व पेरॉन यांच्यातली तुलना: डी बॉयन व पेरॉन हे दोघेही फ्रांस मधून आलेले, आपापले नशीब काढायला हिंदुस्थानात शिरलेले. आपल्या प्रदीर्घ मुक्कामात दोघांनीही आपले हेतू १००% सिद्धीस नेले. दोघांनीही शिंद्यांच्याकडे सेवा केली. पेरॉन हा सामान्य सेलर म्हणून आला तर बॉयन हा पूर्वीचा अनेक युद्धाच्या जखमा अंगावर घेऊन आलेला. पेरॉनला त्या मानाने त्याला साजेशी नोकरी मिळणे अवघड गेले. बॉयन हा आपल्या धन्याशी अखेरपर्यंत एकनिष्ठ राहिला, पण पेरोनकडे तो गुण नव्हता. शेवटच्या काळात तर तो स्वतःला दौलतरावशी तुल्यबळ समजू लागला. त्याची पैशाची व सत्तेची अफाट हाव त्याच्या नाशास कारणीभूत ठरली असे वाटते. अर्थात महादजी शिंदे यांच्याकडे जे गुण होते ते अभावाने दौलतरावांकडे होते. दौलतरावाचे आपल्या सेनापतीवर नियंत्रण नव्हते जसे महादजीचे पूर्णपणे होते. आपल्या सेनापतीच्या प्रत्येक लहान सहान हालचालीवर महादजींची नजर असे.(मराठेशाहीतील शेवटचा फिरंगी मनसबदार भाग ५)

महादजींची आज्ञा मोडणे कोणाला शक्य नव्हते. तरी पण महादजी व डी बॉयन यांच्यात काही घटनांमध्ये मतभेद झाले खरे. तरी पण दोघांनी सामंजस्य दाखवून एकमेकाला सांभाळून घेतले(Mutual respect). ही सांभाळून घेण्याची वृत्ती पेरॉन व त्याच्या मालकाकडे नव्हती. दौलतरावला त्याने ऐन मोक्याच्या वेळी धोका दिला. त्याचे परिणाम शिंदेशाहीला नव्हे तर मराठेशाहीला भोगावे लागले. त्यामुळेच फ्रांसमधील सेवोयमध्ये डी बॉयनचे स्मारक ‘हत्तीचा कारंजा’ (Fountain of Elephant) या ठिकाणी प्रवासी आवर्जून भेट देतात आणि त्याच्या स्मृतींना उजाळा देतात, परंतु पेरॉनच्या स्मृतिस्थळाकडे फारसे कोणी फिरकताना दिसत नाही. मला वाटते, ‘Mean justifies the end OR End justifies  the means’ is an age old classic debate  याचेच हे उत्तम उदाहरण आहे.

जीवनाच्या दृष्टिकोनातील अंतर: डी बॉयन आणि पेरॉन यांच्यातील अजून एक महत्वाचा फरक म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनात होता. निवृत्त झाल्यावर बॉयन याने आपली बरीचशी पुंजी आपल्या गावात सुधारणा करण्यात खर्ची केली. त्यात त्याने शाळा व इस्पितळे बांधली, रस्त्यांचे रुंदीकरण केले, सुंदर असे शॉपिंग मॉल व उद्याने काढली. एकंदरीत गावात आपली प्रतिष्ठा वाढेल व आपल्या लोकांचे जीवनमान उंचावेल अशी व्यवस्था त्याने केली. पेरॉनने यापैकी काहीच केले नाही. त्याच्या रिपब्लिकन मतांच्यामुळे त्याला सरकार दरबारी त्रासच झाला व त्याच्यावर पोलिसांची संशयाची दृष्टी कायम राहली. त्यांच्या वर्तुणुकीतील अशा विरोधाभासामुळे एकाचा फ्रेंच नागरिकांना अभिमान वाटला तर दुसऱ्याबद्दल त्यांच्या मनात कायमची अढी निर्माण झाली. तरीपण पेरॉनकडे काही चांगले विचार होते असे वाटते. त्याने फ्रान्सला नेपोलियनला खलिता पाठवून हिंदुस्थानात सैन्य पाठवायला सांगितले होते ज्यायोगे उत्तरेतील त्याचे साम्राज्य एक फ्रेंच वसाहत म्हणून मान्यता पावले असते. परंतु पॅरिसमध्ये बसलेल्या ‘श्रेष्ठींनी’  नेहमीप्रमाणे निर्णय घेण्यात व अंमलात आणण्यात उशीर केला. त्यांचा निर्णय होऊन सैन्य हिंदुस्थानात उतरेपर्यंत पेरॉनची परत जाण्याची वेळ येऊन ठेपली होती. त्यामुळे त्याचा पेरॉनने बांधलेले इमले हवेतच राहिले.

संदर्भ: Military Adventures of Europeans in Hindusthan, Herbert Compton,शिंदेशाही इतिहासाची साधने भाग ८ (शिंदेशाहीतील शेणवी मंडळींचा अस्सल पत्रव्यवहार) , मराठी रियासत भाग ७, सरदेसाई गो. स.

संकलन व लेखन: प्रमोद करजगी

Leave a Comment