महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,13,558

जनरल वैद्य स्मारक, कॅंम्प, पुणे | General Vaidya Memorial

By Discover Maharashtra Views: 1310 5 Min Read

जनरल वैद्य स्मारक, कॅंम्प, पुणे –

कॅंम्पमध्ये जनरल अरुणकुमार वैद्य यांचे एक स्मारक आहे. ते ज्या रस्त्यावर आहे त्या रस्त्याला त्यांचेच नाव दिले आहे. हे  स्मारक पारंपारिक छत्री पद्धतीने बांधले आहे. यात समोर जनरल अरुणकुमार वैद्य यांचा अर्धपुतळा बसवलेला आहे. तर बाकीच्या ३ बाजूंना शिलालेख कोरलेले आहेत. या स्मारकाच्या चौथऱ्यावर त्यांनी रेजिमेंट ते सेनाध्यक्ष या कालावधीत काम केलेल्या विविध पलटणी / तुकड्या यांची चिन्ह कोरलेली आहेत.

जनरल वैद्य स्मारक, कॅंम्प, पुणे | General Vaidya Memorial

जनरल अरुणकुमार वैद्य यांचा जन्म २७ जानेवारी १९२६ रोजी झाला. त्यांचे शालेय शिक्षण अलिबाग आणि पुणे इथे झाले. मुंबईतील एल्फिन्स्टन महाविद्यालयात उच्च शिक्षण घेत असतानाच त्यांनी इ.स. १९४४ रोजी सैन्यात कॅडेट म्हणून प्रवेश मिळविला. पुढे इ.स. १९४५ रोजी डेक्कन हॉर्स या चिलखती दलात त्यांची सेकंड लेफ्टनंट या पदावर नेमणूक करण्यात आली. इ.स. १९४८ च्या निजामाच्या हैदराबाद संस्थानावरील कारवाईत त्यांनी दौलताबाद, परभणी या भागांत कॅप्टन या नात्याने महत्त्वाची कामगिरी पार पाडली. पुढे त्यांनी डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमधील शिक्षणक्रम पूर्ण केला. त्यानंतर ते लडाखमध्ये एक वर्ष कामगिरीवर होते. काही काळ दिल्ली येथे सैनिकी सचिवाच्या विभागात लेफ्टनंट कर्नल म्हणूनही त्यांनी काम केले. इ.स. १९६५ मध्ये त्यांची डेक्कन हॉर्स या पलटणीचे कमांडर म्हणून नियुक्ती करण्यात आली.

इ.स. १९६५ च्या भारत-पाक युद्धात त्यांच्या नेतृत्वाखाली डेक्कन हॉर्स या पलटणीने खेमकरणच्या लढाईत उत्कृष्ट कामगिरी केलो. त्यांच्या तुकडीने शर्मन रणगाड्यांच्या साहाय्याने पाकिस्तानच्या पॅटन रणगाड्यांचा धुव्वा उडविला. या युद्धात जनरल वैद्य यांनी दाखविलेल्या अतुलनीय पराक्रमाबद्दल भारत सरकारने त्यांना महावीरचक्र बहाल करून त्यांचा गौरव केला. त्यानंतर ब्रिगेडिअर या पदावर त्यांना पदोन्नती देण्यात आली. पूर्व विभागात १६७ पर्वतीय ब्रिगेडचे समादेशक म्हणूनही त्यांनी काम केले. त्या वेळी नागा बंडखोरांना पकडण्याची यशस्वी मोहीम त्यांनी पार पाडली. त्याबद्दल त्यांना अतिविशिष्ट सेवापदक देण्यात आले.त्यानंतर जनरल वैद्य यांची नेमणूक अहमदनगरच्या आर्मर्ड कोअर सेंटर अँड स्कूल येथे समादेशक म्हणून झाली. पुढे मेजर जनरल म्हणून पहिल्या चिलखती दलाचे त्यांनी नेतृत्व केले.

चक्रा, देहलरा आणि बसंतर येथे पाकिस्तानबरोबरच्या इ.स. १९७१ च्या युद्धात त्यांनी पाकला नामोहरम केले. त्यांच्या तुकडीने पाकिस्तानात २० कि.मी. पर्यंत मजल मारून त्यांचे ६० रणगाडे नष्ट केले व बसनारजवळच्या महत्त्वाच्या पूलावर  नियंत्रण मिळवले. या त्यांच्या कुशल रणनीतीबद्दल भारत सरकारने त्यांना दुसऱ्यांदा महावीरचक्र प्रदान केले. दोन वेळा महावीरचक्र मिळविणारे जनरल अरुणकुमार वैद्य हे एकमेव सेनाधिकारी होय. दिल्ली येथे मिलिटरी ऑपरेशन या विभागाचे संचालकपदही त्यांनी काही काळ सांभाळले. त्यानंतर सदर्न कमांड पुणे येथे चीफ ऑफ स्टाफ म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला. पूर्व सेना विभागाचे समादेशक म्हणूनही त्यांनी काम केले. याच काळात आसाममधील दंगलींना आळा घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला. लेफ्टनंट जनरल एस्‌. के. सिन्हा यांची सेवाज्येष्ठता डावलून सरकारने अरुणकुमार वैद्य यांची भूसेनाध्यक्ष म्हणून नेमणूक केली. सियाचिन भागात नवीन ठाणी उभारून भारतीय सैन्य बारा महिने पाकिस्तानी सैन्यावर लक्ष ठेवू शकेल, अशी व्यवस्था केली.

त्यांच्या सेनाध्यक्षपदाच्या कारकिर्दीतच पंजाब मधील अमृतसर येथील सुवर्णमंदिरातून खलिस्तानवादी सशस्त्र अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ म्हणून ओळखली जाणारी सैनिकी कारवाई करण्यात आली. तत्कालिन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या आदेशाप्रमाणे त्यांनी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात सैन्य घुसवून ऑपरेशन ब्ल्यू स्टार यशस्वी केले. जनरल कृष्णस्वामी सुंदरजी व मेजर जनरल के. एस्‌. ब्रार यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली. ६ जून १९८४ ला सुवर्ण मंदिरात लपून बसलेला खलीस्तानवादी नेता भिंद्रनवाले आणि त्याचे सशस्त्र अनुयायी यांच्या बरोबर भारतीय लष्कराची चकमक उडाली. मंदिराच्या पावित्र्याला धक्का न पोहोचावा म्हणून थोडी अधिक सैनिकांची हानी पत्करून जनरल वैद्य यांनी लष्करी पद्धतीने ही कारवाई पूर्ण केली.

१ जानेवारी १९८६ रोजी ते निवृत्त झाले आणि पुण्यामध्ये स्थायिक झाले. पुण्यास स्थायिक झाल्यानंतर आपल्या पत्नी मुलीसमवेत त्यांचे आनंदी आयुष्य चालू होते. परंतु ऑपरेशन ब्ल्यू स्टारचा उल्लेख असलेली टाइप केलेली धमकी पत्रे त्यांना येऊ लागली. अखेर १० ऑगस्ट १९८६ रोजी सकाळी ११:४५ वा. पुण्यातील क्वीन्स गार्डन भागात २ खलिस्तानी अतिरेक्यांनी त्यांच्या मोटारीचा पाठलाग करून त्यांची गोळ्या घालून निर्घृण हत्या केली.

जनरल वैद्य यांच्या मारेक-यांपैकी सुखा याला एका महिन्यानंतर पुणे पोलिसांनी पिंपरीमधून अटक केली. याचा सहकारी जिंदा याला दिल्लीतून अटक केली गेली. दोघांनी कोर्टात आपण जनरल वैद्य यांना मारल्याचं कबूल केलं, पण तो गुन्हा होता असं मानायला दोघे तयार नव्हते. कारण सुवर्ण मंदिरातली कारवाई हा शीख धर्माचा अपमान होता आणि तो करणाऱ्यांना आम्ही धडा शिकवला अशी त्यांची धारणा होती. या दोघा मारेक-यांना फाशीची शिक्षा दिली गेली.

जनरल अरुण कुमार वैद्य यांनी वयाची चाळीस वर्षं लष्करी सेवेत काढली. भारतीय लष्करातल्या अत्यंत विभूषित अशा अधिकाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. २ महावीर चक्रे, एक परम विशिष्ट सेवापदक, एक अति विशिष्ट सेवा पदक या लष्करी सन्मानांबरोबरच त्यांना पद्मविभूषण हा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मानही मिळाला होता.

संदर्भ:
https://marathivishwakosh.org/

पत्ता :
https://goo.gl/maps/TTpCAYLBSU9MAgbv7

आठवणी इतिहासाच्या FB Page

Leave a Comment