महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,09,207

घनगड | Ghangad Fort

Views: 4222
7 Min Read

घनगड | Ghangad Fort

पुणे आणि रायगड जिल्ह्यांच्या सीमेवरून पसरत गेलेली सह्याद्रीची रांग ही भटक्यांना नेहमीच साद घालणारी. सह्याद्रीच्या या भागातुन अनेक घाटवाटा खाली कोकणात उतरताना दिसतात. कोकणातील पाली गावातून घाटमाथ्यावर येण्यासाठी प्राचिन काळापासून नाणदांड घाट, सवाष्णीचा घाट, भोरप्याची नाळ हे तीन घाटमार्ग आहेत. कोकणातल्या बंदरांमध्ये उतरणारा माल घाटावरील बाजारपेठांमध्ये आणला जात असे. या मार्गांचे रक्षण करण्यासाठी बंदरापासून बाजारपेठे पर्यंत किल्ल्यांची साखळी बनवलेली होती. घाटाच्या खाली असणारे सुधागड, सरसगड ,मृगगड तर वरील भागात असणारे घनगड(Ghangad Fort),तेलबैला कैलासगड, कोराईगड याची साक्ष देतात. घाटमाथ्यालगतचा हा भाग या परिसरात येणाऱ्या छत्तीस गावांमुळे छत्तीस कोरबारसे म्हणुन ओळखला जातो.

सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर आड बाजूला दिमाखात वसलेला छोटेखानी किल्ला म्हणजे घनगड (Ghangad Fort) ! गडाची उंची समुद्रसपाटीपासून २४०० फुट तर एकोले गावापासुन ६०० फुट आहे. एकोले हे गडाचे पायथ्याचे गाव लोणावळ्यापासून भुशी धरण- कोरीगड-सालतर-भांबुर्डेमार्गे ३५ किमी अंतरावर आहे. या मार्गावर रहदारी फ़ारशी नसल्याने खाजगी वहानाने गेलेले चांगले. या रस्त्यावर भांबुर्डे गावाच्या पुढे एकोले गावाचा फाटा लागतो. या फाट्यावर डावीकडे नवरा-नवरी-भटोबाचे सुळके आपलं लक्ष हमखास वेधून घेतात. येथुन एकोले गाव व घनगड किल्ला (Ghangad Fort) ३ कि.मी. अंतरावर आहे. एकोले गावात शिरतानाच डावीकडून एक मळलेली पायवाट किल्ल्यावर जाताना दिसते या वाटेने घनगडावर जाण्यासाठी एक तास लागतो.

Ghangad Fort किल्ल्यावर जाण्यासाठी हि एकमेव वाट आहे. या पायवाटेने जाताना एका बंगल्याचे कुंपण लागते. कुंपण संपल्यावर डाव्या बाजूला एक वाट झाडीत जाते. येथे शिवमंदिराचे अवशेष असुन त्यात शिवपिंडी, नंदी, वीरगळ व दगडी तोफगोळे पहायला मिळतात. मंदिराचे अवशेष पाहून परत वाटेवर येऊन वर चढुन गेल्यावर काही मिनिटात आपण गारजाई देवी मंदिरापाशी पोहोचतो. या मंदिराच्या दरवाजाच्या डाव्या बाजूच्या भिंतीत श्री आई महाराजाची व किले घनगडाची असा तारीख नसलेला शिलालेख कोरलेला आहे. हा शिलालेख अगदीच अलीकडच्या काळातील वाटतो. मंदिरात गारजाई देवीची मुर्ती असुन मंदिराच्या समोर एक चौकोनी दिपमाळ व काही वीरगळ पडलेले आहेत. मंदिराच्या समोर एक भलामोठा दगडी तोफगोळा आहे.

घनगडावर (Ghangad Fort) मुक्काम करावयाचा झाल्यास हे मंदिर उत्तम आहे पण पाण्याची सोय मात्र नाही. या मंदिराच्या डाव्या बाजूने जाणाऱ्या वाटेने चढून गेल्यावर ५ मिनिटात आपण किल्ला व शेजारचा डोंगर यामधील खिंडीत पोहोचतो. खिंडीतून डावीकडील बाजुस कोकणच्या बाजुने गेलेली खोल दरी दिसते. हा गडाचा बाहेरील भाग असुन येथे या दरीवर व समोरच्या डोंगरावर लक्ष ठेवण्यासाठी कड्यात एक गुहा खोदलेली आहे. तेथे पोहोचण्यासाठी या कड्यातच खोबण्या खोदल्या आहेत. या छोट्या गुहेतून खालच्या परिसराचा सुंदर देखावा आपल्याला दिसतो. गुहा पाहून गडाच्या मुख्य दरवाज्यापाशी यावे. गडाच्या तटबंदीवर डागडुजी केलेली असुन दोन बुरुजांमधील दरवाजात जाण्यासाठी पायऱ्या आहेत. या पुर्वाभिमुख प्रवेशव्दारातुन गडात प्रवेश केल्यावर समोरच कातळात कोरलेल्या दोन गुहा दिसतात. यात ८-१० जणांना सहज रहाता येईल. प्रवेशव्दाराच्या उजव्या बाजूस एक प्रचंड मोठा खडक वरच्या कातळातून निसटून खाली आलेला आहे. हा दगड कातळाला रेलून उभा राहील्यामुळे येथे कमान तयार झालेली आहे. या कमानीतून पुढे गेल्यावर वरच्या बाजूस कातळात कोरलेली एक छोटी गुहा असुन या गुहेत वाघजाई देवीची अलीकडील काळातील भग्न झालेली दगडी मूर्ती आहे.

गुहेच्या पुढे एक कातळ टप्पा असुन तो पार करून एक पाण्याचे टाके पाहता येते. शिवाजी ट्रेल ह्या संस्थेने येथे लोखंडी दोरी बसवल्याने हे टाके पहाणे सोपे झाले आहे. ते पाहून परत प्रवेशव्दारापाशी यावे. प्रवेशव्दाराच्या डाव्या बाजूला १५ फुटाचा कडा आहे. हा कडा पार केला की आपण थेट किल्ल्यातच प्रवेश करतो. या ठिकाणी असलेल्या पायऱ्या इग्रजांनी सुरुंग लावून उध्वस्त केल्याने वर सहजपणे जाता येत नव्हते पण शिवाजी ट्रेल ह्या संस्थेने येथे आता लोखंडी शिडी बसवलेली आहे. शिडीच्या शेवटच्या पायरीसमोर कातळात कोरलेले टाक आहे. यातील पाणी गार व चवदार असून बारमाही उपलब्ध असते. शिडी चढून गेल्यावर कड्याला लागुनच कातळात कोरलेल्या पायऱ्याची वाट सुरु होते. या वाटेने पुढे गेल्यावर आपण घनगड व बाजूचा डोंगर यामधील वरच्या भागात पोहोचतो. या ठिकाणी कातळात कोरलेली एक गुहा असुन हिचा उपयोग टेहळ्यांना बसण्यासाठी होत असावा. ही गुहा पाहून परत पायवाटेवर येऊन १०-१२ पायऱ्या चढून गेल्यावर उजव्या बाजूला कातळात कोरलेली गुहा दिसते.

गुहेच्या पुढे पाण्याची ४ कोरलेली टाक आहेत. त्यातील पहीले टाके उघडयावर असुन दुसरे खांब टाके आहे. तिसर टाक जोड टाक असुन खडकात कोरले आहे. चौथ टाक छोट असुन त्याची अलीकडेच सफाई झाल्याने त्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. येथुन मागे फिरून काही पायऱ्या चढल्यावर आपण पुर्वाभिमुख पडक्या प्रवेशव्दारातून थेट गडाच्या माथ्यावर प्रवेश करतो. आजमितीस दरवाज्या शेजारचे बुरुज व भिंती फक्त उभ्या आहेत. यातील एका बुरुजात तळघरासारखे बांधकाम आहे पण येथे मोठया प्रमाणात पडझड झाल्याने आत शिरता येत नाही. गडाच्या माथ्यावर प्रचंड गवत माजले असून बरेचसे अवशेष या गवतामुळे दिसत नाहीत. प्रवेशव्दाराच्या उजव्या बाजूला असलेल्या पायवाटेने थोड पुढे गेल्यावर कोरड पडलेल पाण्याच टाक आहे. त्याच्या वरच्या बाजूला पायऱ्या असलेल पाण्याच टाक आहे.

बालेकिल्ल्यावर पाण्याची एकुण चार टाकी असुन दोन कोरडी पडलेली आहेत. पुढे गडाच्या टोकाला सदरेच्या इमारतीचे अवशेष आहेत. गडमाथ्यावर झेंड्याच्या आजुबाजुला देखील बरेच ठिकाणी बांधकामाचे अवशेष दिसतात. दरवाजाच्या डाव्या बाजुच्या टोकाला दुमजली मोठा बुरुज असुन त्याचा वरील मजला पुर्णपणे कोसळलेला आहे. यात तोफेसाठी झरोके आहेत. हा बुरुज पाहून दरवाजाकडे आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. किल्ल्याच्या माथ्यावरून आजूबाजूचा विस्तीर्ण घाटमाथा आणि कोकण याचे सुंदर दर्शन होते. सुधागड, सरसगड आणि तैलबैलाची भिंत हा परिसर तसेच नाणदांड घाट ,सवाष्णीचा घाट ,भोरप्याची नाळ या कोकणातील घाटवाटा दिसतात. गडाचा माथा छोटा असल्यानं अर्ध्या तासात पाहुन होतो. संपुर्ण गड फिरण्यास मात्र दिड तास लागतो.

इतिहासात डोकावले असता शिवकाळात या किल्ल्याचा उल्लेख आढळत नाही परंतु पेशवेकाळात बरेचदा या किल्ल्याचा तुरुंग म्हणुन वापर केलेला आढळतो. घनगडचा प्रवास कोळी सामंताकडून निजामशहाकडे आणि पुढे आदिलशहाकडे आणि नंतर मराठ्यांकडे झाल्याचा उल्लेख येतो. याचा उपयोग कोकणात उतरणाऱ्या वाटांवर नजर ठेवण्यासाठी व कैदी ठेवण्यासाठी केला जात होता. सदाशिवरावभाऊंच्या तोतयास या किल्ल्यावर कैदेत ठेवण्यात आले होते. मुंबई – पुण्याहून पहाटे खाजगी वहानाने निघाल्यास कोराईगड, तेलबैला( मधील खाचेपर्यंत) व घनगड हे तीनही किल्ले एका दिवसात पहाता येतात.

माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Leave a Comment