महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,22,315

घंटाळी देवी मंदिर

By Discover Maharashtra Views: 1792 6 Min Read

घंटाळी देवी मंदिर आणि परिसर –

ठाण्याचा ‘घंटाळी पथ’ हा शहरातील एक प्रमुख रस्ता समजला जातो. या रस्त्यावरच सुमारे २५० वर्षांपूर्वीचे पुरातन घंटाळी देवीचे मंदिर आहे. त्या मंदिरावरूनच या रस्त्याला घंटाळी पथ नाव पडले. घंटाळी शब्दातच नादमयता आहे. या तीन अक्षरी शब्दात घंटा आणि टाळी हे दोन शब्द असून ते नादाचेच प्रतीक आहेत. देवीचा नवस फेडताना काम झाले तर घंटा बांधेन, असा नवस फेडण्याची प्रथा होती व आहे. म्हणून देवीचे नाव ‘घंटाळी देवी’ पडल्याचे सांगण्यात येते. घंटाळी देवी मंदिर नौपाडा प्रभागातील घंटाळी परिसर आज चकाचक झाला आहे. सिमेंट काँक्रिटचे रस्ते, रेल्वे स्थानक व एसटी स्टँडजवळचा परिसर, बाजारहाट करण्यासाठी सर्व सोयीसुविधा आणि मुख्य म्हणजे सुसंस्कृत वातावरण व २५० वर्षांपासून असलेला जागरूक देवीचा निवास आदी अनेक गोष्टींमुळे घंटाळी परिसर हा लोकांच्या आकर्षणाचा विषय आहे. घंटाळी भागाचा नुसता उल्लेख जरी झाला तरी योगाचार्य श्रीकृष्ण व्यवहारे यांनी स्थापन केलेले घंटाळी मित्र मंडळ व त्यांचा योगप्रचार, प्रसाराचे कार्य डोळ्यासमोर उभे राहते.

घंटाळी देवीचा नवरात्रोत्सव आठवतो. घंटाळी मैदानातील वलयांकित नेत्यांच्या सभा मनात रूंजी घालतात. हिंदू जागृती मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे कार्यक्रम आठवतात. घंटाळी पथाची सामाजिक व सांस्कृतिक श्रीमंती खूप मोठी आहे. याच रस्त्यावर रक्ताचे नाते सांगणारी अग्रगण्य वामनराव ओक रक्तपेढी आहे. लोकांचे आयुष्य सुधारणारे मेधा मेहेंदळे यांचे तन्वीशता आरोग्यकवच आहे. घंटाळी प्रबोधिनीचे विधायक काम आहे. सांस्कृतिक भूक वाढविणारे व्यास क्रिएशन्सचे पुस्तकालय आहे. घंटाळी सहनिवास नावाची जुनी मोठी गृहनिर्माण सोसायटी आहे. पाइल फाऊंडेशनच्या चार इमारतींमधील लोक येथे राहतात. ज्येष्ठ माजी नगरसेवक विलास सामंत यांनी सुरू केलेली अभ्यासिका आहे. खेळण्यासाठी व प्रदर्शनासाठी घंटाळी मैदान आहे. एकाच वाक्यात वर्णन करावयाचे झाल्यास घंटाळी पथ म्हणजे आबालवृद्धांचे मेतकूट आहे.

पण साठ वर्षांपूर्वी घंटाळी भाग कसा होता हे वाचून आज नव्या पिढीचा त्यावर कदाचित विश्वास बसणार नाही. जुन्या काळी येथे जंगल होते. झाडाझुडपांनी व वनराईने हा भाग व्यापलेला होता. मातीचे कच्चे रस्ते होते. पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी साठत असे. दलदल, चिखल, खडी व मातीचं साम्राज्य रस्त्यावर असे. पहाटे व सकाळच्या वेळी टेंभी नाका परिसरातील माणसे घंटाळी देवीकडे फिरायला म्हणून येत असत. खंडू रांगणेकर, प्रभाकर हेगडे ही तरुण मंडळी तेथे फिरायला आलेली अनेकांनी पाहिली आहेत. त्याकाळी रस्त्यावर दिवे नव्हते. शेतीवाडी, झाडेझुडपे आणि भातशेतीने अनेक भाग व्यापलेले होते. संध्याकाळी एकट्या-दुकट्याने या भागात येताना लोक घाबरत असत. मोजकी घरे आणि मोजक्या दुकानांशिवाय अन्य कसलाही गजबजाट या भागात नव्हता. गृहनिर्माण सोसायट्या नव्हत्याच. मोजक्या चाळी होत्या. सध्या तन्वीशताचे दुकान ते आनंद परांजपे यांचे ऑफीस या भागात पूर्वी मोठा बुंधा असलेली बकुळीच्या फुलांची झाडे खूप होती. काही ठिकाणी आंब्याचे वृक्ष होते. सकाळी कोकिळेचा मधूर गुंजारव आणि रात्री रातकिड्यांचे किर्र आवाज ही घंटाळी भागाची ओळख त्यावेळी होती. १९७४नंतर घंटाळी पथाचे रूप हळूहळू पालटू लागले. १९८६ साली ठाणे महापालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर सुधारणांना गती येऊन आज घंटाळी भाग चकाचक होऊन तो शहराचं हृदय बनला आहे.

कोळी आणि पाठारे प्रभूंची देवी –

घंटाळी देवीचे २५० वर्षांपूर्वीचे पुरातन मंदिर ही घंटाळी पथाची शान आहे. कोळी आणि पाठारे प्रभू समाजाची ही कुलदेवता असल्याचे सांगण्यात येते. घंटाळी देवीची मूर्ती स्वयंभू आहे. घंटाळी देवी महिषासूर मर्दिनी आणि दुर्गा अशा तिन्ही देवींच्या मूर्ती एका आसनावर आहेत. दुसऱ्या गाभाऱ्यात महादेवाची पिंड तर तिसऱ्या गाभाऱ्यात राम, लक्ष्मण, सीता व हनुमान यांच्या मूर्ती आहेत. १९०२मध्ये रामाचे देऊळ बांधले गेले. इ.स. १८८२च्या ठाणे जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये घंटाळी देवीचा उल्लेख आहे. पेशव्यांकडून या मंदिराला दरवर्षी चार रुपये वर्षासन मिळत असल्याचा उल्लेख सापडतो. मंदिराचे पुजारी अनिल व श्रीपाद जोशी हे बंधू गेली अनेक वर्षे मंदिराची व्यवस्था पाहत आहेत.

दरवर्षी देवळात नवरात्रात उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. नऊ दिवस अनेक कार्यक्रम तेथे होतात. नऊ दिवस विद्युतदीपांची रोषणाई व आरास केलेली असते. स्त्री-पुरुष भाविक मोठ्या संख्येने देवीच्या दर्शनाला येत असतात. माघी पौर्णिमा, हनुमान जयंती हे उत्सवही उत्साहाने साजरे होतात. मंदिराच्या प्रांगणात कैलासपती नावाचा पुरातन वृक्ष असून तो दुर्मी स्वरूपात मोडणारा आहे. या वृक्षाचे फूल शंकराच्या पिंडीच्या आकाराचे असते. हे त्याचे खास वैशिष्ट्य असून त्याच्या सुगंधाने वातावरण प्रसन्न होते. झाडाची पाने आणि बुंध्यापासून फांद्यांपर्यंत शंकराच्या जटांसारख्या पारंब्या हे या वृक्षाचे वेगळेपण अधोरेखित होणारे आहे. घंटाळी देवी मंदिर हे खाजगी मंदिर असून ते रावसाहेब केशवराद भास्करजी कोठारे यांच्या पूर्वजांनी बांधल्याचे सांगण्यात येते. आता त्याची मालकी कोठारे यांची नात कस्तुरीबाई झावबा यांच्याकडे आहे. आदिशक्तीचे रूप असलेली घंटाळी देवी म्हणजे घंटाळी पथाचा ऑक्सिजन म्हणावा लागेल.

घंटाळी पथ हा केवळ रस्ता नाही. तो संस्कृती व नादमयता जपणारा मार्ग आहे. नवरात्रात मंत्र, श्लोक, स्तोत्रे व आरत्यांचे आवाज येथे कानावर पडतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या घरांमधून रामरक्षा, परवचा, मनाचे श्लोक सदैव ऐकू येतात. गणपती उत्सवात आरत्या व मंत्रपुष्पांजलीचे आवाज सर्वत्र घुमतात. नवरात्रोत्सवाच्या रेकॉर्डब्रेक जत्रेमधून ओटीचे सामान, फुले आणि अगरबत्तीचा गंध येथे दरवळतो. मार्च ते जून महिन्यादरम्यान दरवर्षी गढींमधील हापूस आंब्यांची सुगंधी चव सर्वांना मोहवते. एकाच वाक्यात वर्णन करावयाचे झाल्यास घंटाळी शब्दातील नादाप्रमाणेच या रस्त्याने संस्कृती व नादमयता जपली आहे.

पूजा आंब्रे

Leave a Comment