घाटगे मराठा घराणे -भाग १
घाटगे घराणे – मराठे सरदारांमध्यें घाटग्यांचें कुटुंब प्रमुख आहे. हे मूळचे खटाव गांवचे राहणारे व मलवडीचे देशमुख. ब्राम्हणी राज्यांत त्यांस माण प्रांताची देशमुखी व सरदेशमुखी मिळाली. कामराजे घाटगे हा त्यांचा मूळ पुरूष. इब्राहिम आदिलशहानें स.१६२६ त नागोजी घाटगे यास सरदेशमुख व झुंजारराव हे किताब दिले. विजापूरच्या राज्यांतून त्यास जहागिरीहि पुष्कळ होत्या. “सर्जेराव”, “प्रतापराव” इत्यादि अनेक किताब या कुटुंबास मिळाले आहेत.
इ.स.१६३३ त दौलताबाद मोंगलांच्या हातीं लागल्या वर विजापुरचें सैन्य स्वदेशीं परत येत असतां त्याच्या मोहो बतखान नामक मोंगल सरदाराशीं ज्या चकमकी झाल्या त्यांपैकीं एकींत नागोजी घाटगे मारला गेला.
अवरंगजेब व मीरजुमला हे आदिलशहाच्या मुलखांत चालून आले तेव्हां सर्जेराव नांवाचा एक घाटगे विजापूरकरांकडून लढत होता (१६५७).
इ.स.१६५९ त विजापूर दरबाराकडून शिवाजी राजाच्या पारिपत्याकरितां पाठविण्यांत आलेल्या अफजुलखानाबरोबर झुंजारराव म्हणून एक घाटगे असून तो शिवरायांच्या हातीं सापडला होता. त्यास शिवरायांनी मोठया सन्मानपूर्वक विजापुरला रवाना केलें. या झुंजाररावाचा बाप शहाजी राजांचा मोठा मित्र होता. स. १६६१ च्या पावसाळयानंतर आदिलशहा कर्नाटकांतील बंडें मोडण्याकरितां त्या प्रांतीं गेला तेव्हां हा झुंजारराव त्याच्या बरोबर होता.
पुढें (१६७५) हा व निंबाळकर यांनीं शिवरायांनी नुकतींच घेतलेलीं पन्हाळा वगैरे ठाणीं विजापूरकरांस परत घेऊन दिली पण शिवरायांनी झुंजाररावाचा पराभव करून तीं ठाणीं पुन्हां काबीज केलीं १६७८ शाहूच्या कारकीर्दीत घाटगे हे कोल्हापूरकर संभाजीकडे गेले. परंतु कोल्हापूरकराशीं त्यांचें नेहमीं भांडण चाले म्हणून ते पेशव्याशीं मिळून मिसळून असत. खडर्याच्या लढाईंत घाटगे हे आपले पथक घेऊन पेशव्यांकडे हजर होते.
सखाराम (सर्जेराव) घाटगे :-
१७९६ सालच्या सुमारास या घराण्यांतील ज्या दोघां पुरूषांचीं नांवें इतिहासांत विशेष प्रसिध्दीस आलीं, त्यांतील एक यशवंतराव व दुसरा सखाराम होय. यशवंतरावाची बहीण कोल्हापूरकरास दिली होती.यशवंतराव व सखाराम या दोघांत वतनासंबंधीं कांहीं भांडण होऊन त्यांच्यामध्यें एक चकमक झाली. तींत सखारामाचा पराजय होऊन तो पळून येऊन परशुराम भाऊच्या चाकरीस राहिला. कांहीं दिवसांनीं त्यानें भाऊचीं नौकरी सोडून नाना फडनविसाची धरली. नानानें त्याजकडे १०० स्वारांचें आधिपत्य दिलें होतें. सन १७९६ त नाना पुणें सोडून गेले तेव्हां सखाराम हा शिंद्यांच्या चाकरींत शिरला; येथेंहि त्यांस १०० स्वारांचेंच आधिपत्य देण्यांत आलें. त्यानें आपल्या चातुर्यानें शिद्यांचा कारभारी रायाजी पाटलाची मर्जी संपादिली.
सखारामाची मुलगी सुस्वरूप म्हणून प्रसिध्द असल्यामुळें तिच्याशीं विवाह करण्याच्या उद्देशानें स्वत दौलतराव शिंदेहि त्याची खुशामत करी. शिंद्याशीं संबंध जोडण्यास सखारामहि उत्सुक होताच, परंतु जितकें आपण ओढून धरूं तितका आपला फायदा जास्त असें समजूंन आपण ओढून धरूं तितका आपला फायदा जास्त असें समजून तो शिंद्यास मुलगी देण्यास वर कांकू करी. रावबाजी याला उत्तरहिंदुस्थानांत नेण्याकरितां बाळोबा तात्यानें सखारामाचीच योजना केली. तेव्हां ह्यानें बाजीरावास सांगितलें कीं तुम्हाला पेशवाई मिळवून देण्यासाठीं मी शिंद्याचें मन वळवितों आणि शिवाय शिंद्यास आपली मुलगी देतों. मात्र आपण पेशवे झाल्यावर शिंद्यास दोन कोट रूपये द्यावें व मला शिंद्याची दिवाणगिरी व कागलची जहागिरी मिळवून द्यावी. तें रावबाजीनें कबूल केलें.
माहिती संकलन द्वारा -विशाल बर्गे इनामदार