महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,43,180

घाटगे मराठा घराणे – भाग २ 

By Discover Maharashtra Views: 2649 6 Min Read

घाटगे मराठा घराणे – भाग २

घाटगे मराठा घराणे – सखाराम (सर्जेराव) घाटगे :-
पुढें सखारामानें मायकेल फिलोज याच्याकडून विश्वासघात करवून नानांस शिंद्याच्या गोटांत आणवून नंतर फिलोज कडून त्यांनां व बरोबर आलेल्या सर्व बडया बडया मंडळींसह कैद केलें. त्यांच्या बरोबरचे स्वार व शिपाई यांना लुटून लंगडे, लुळे केले, व कांहींनां तर ठार मारलें. नंतर घाटग्यानें केवळ नानांच्याच नव्हे तर त्यांच्या अनुयायांच्याहि घराची मनस्वी लुटालूट केली. तेव्हां यांपैकीं कांहीं मंडळींनीं त्याच्या लूट मिळुविण्याकरितां आलेल्या शिपायांशी तोंडहि दिलें. एखाद्या शत्रूनें अकस्मात् हल्ला चढवावा अशी त्यावेळीं पुणें शहराची स्थिती झाली होती. सर्व रात्रभर व दिवसादेखील शहरांत गोळीबार चालत असे. सर्व बाजूंनीं रस्ते अडवून ठेविले जात व शहरांत हलकल्लोळ, लुटालूट व रक्तपात याशिवाय दुसरें कांहीं दिसत नसे. सर्व लोक घाबरून गेले होते. व रस्त्यांतून जाणारी मंडळी जमावानें व सशस्त्र जात (पुण्यांतील सर्जेरावी-नवयुग, १९२२). पुढें (१७९८) मार्च सखारामाच्या मुलीचा दौलतराव शिंद्याशीं विवाह झाला. हीच प्रसिध्द बायजाबाई शिंदे होय.

दौलतरावानें मागितलेले दोन कोट रूपये देण्यासाठीं पेशव्यांनी घाटग्यास शिंद्याची दिवाणगिरी देऊन बाळोजी कुंजराच्या मदतीनें पुण्यांतील लोकांपासून पैसे गोळा करण्याच्या कामावर त्याला नेमिले. यावेळीं पैसे गोळा करण्याकरितां घाटग्यानें जे उपाय योजले ते अत्यंत अमानुष होते (डफ) शनिवार वाडयांत जुनी कारभारी मंडळी कैदेंत होती, त्यांनां त्यानें बाहेर काढून ते आपला पैसा कोठें आहे तें सांगेपर्यंत त्यांच्या अंगावर कोरडे ओढून, त्यांच्या जवळून बलात्कारानें सर्व पैसा काढून घेतला. शहरांतील व्यापारी, सराफ वगैरे ज्या ज्या लोकांजवळ पैसा आहे असें वाटत होतें त्यासर्वांनां पकडून त्यांचा इतका छळ करण्यांत आला कीं, त्यांतील कांहीं मंडळीं त्यायोगें मरणहि पावली. गंगाधरपंत भानू यांस पैंशासाठीं तापलेल्या तोफेवर बांधलें असतां तो तेथल्या तेथेंच मरण पावला. महादजीच्या दोघा वडील बायकांनीं दौलतरावावर आपल्या धाकटया सवतींशी व्यभिचार केल्याचा आरोप केला, तेव्हां घाटग्यानें बळजबरीनें त्यांनां पकडून खूप मार दिला व त्यांची अतिशय विटंबना केली (१७९८). (डफ. पु.३.पृ.१६२). त्यामुळें बायकांच्या बाजूस असलेल्या मुजप्फरखानाची व सखारामाची दोनदां चकमक उडाली.

सखारामाच्या वर्तनास कोणाकडूनहि प्रतिरोध न झाल्यामुळें शेवटीं तो इतका बेताल झाला कीं, तो शिंद्यासहि जुमानीना. फकीरजी गाढवे याच्या साहाय्यानें लोकांपासून बळजबरीनें पैसे उकळण्याचें काम त्यानें चालविलेंच होतें. शिंद्यांच्या सैन्यांतील चार अधिका-यांस तर बायांच्या बंडांत सामील असल्याच्या केवळ संशयावरून त्यानें तोफेच्या तोंडीं दिले.शेवटीं आपला स्वत:चाच उपमर्द होऊं लागल्यानें चीड येऊन व पेशव्यांच्या आज्त्रेवरून आणि लोकांच्या शिव्यापाशास कंटाळून शिंद्यानें सखारामास पकडून कैदेंत टाकलें (१७९८). परंतु बाळोबातात्यानें रदबदली करून त्याला कैदेंतून सोडविलें (१८००). कैदेतूल सुटतांच त्यानें पुन्हां शिंद्यावर पगडा बसविला व बाळोबातात्याच्या विरूध्द एक पक्ष उपस्थित केला आणि शिंद्याचें मन वळवून बाळोबास व त्याच्या अनुयायांस कैद करवून नगरच्या तुरूंगात त्यांची रवानगी केली. बाळोबा कैदेंत लवकरच मरण पावला. त्याचा भाऊ धोंडीबा यास सखारामानें तोफेच्या तोंडीं दिलें. नारायणराव बक्षी (शिंद्याचा सेनापति) याच्या अंगास दारूचे बाण बांधून ते पेटविण्यांत आले; त्याबरोबर त्या दुर्दैवी माणसाचें शरीर आकाशांत उडून त्याच्या चिंध्या चिंध्या झाल्या. हेंहि कृत्य सखारामानें केले.

पुढें दौलतरावानें पटवर्धनावर स्वारी केली त्यावेळीं सखारामानें कोल्हापुरकरांची मदत शिंद्यास मिळवून दिली होती (१८००). यानंतर तो उत्तर हिंदुस्थानांत जाण्यासाठीं निघाला तेव्हां त्यानें सखारामाच्या हाताखालीं पांच पलटणी व दहा हजार स्वार देऊन त्यास पुण्यास ठेवलें. परंतु सखारामानें पुण्याच्या दक्षिणेकडील मुलुखांत लुटालुटीची मोहीम सुरू केली (१८०१).
पुढें तो पुण्यास आला व पैशाकरितां बाळोजी कुंजराच्या घरांत धरणें देऊन बसला. त्यानें पेशव्यांच्या दरबारांतील एकाहि माणसाचा अपमान करण्याचें बाकी ठेविलें नव्हतें. शेवटीं बाळोजी कुंजरानें सावकारांवर वराता देण्याकरितां ह्मणून त्याला आपल्या घरीं बोलावून व त्याचा मोठा आदर सत्कार करून थोडया वेळानें कागद आणण्याचें मिष करून तो तेथून जाऊं लागला. बाळोजी तेथून उठला कीं घाट ग्यास कैद किंवा ठार करण्यांत यावें असा पूर्वी संकेत झाला होता. परंतु बाळोजीचा हेतु ओळखून सखारामानें स्वत उठून व बाळोजीचा हात धरून त्याला आपल्या बरोबर आणलें व आपण घोडयावर बसून तेथून निघून गेला. नंतर त्यानें आपल्या सर्व सैन्यासह पुणें शहर लुटून जाळून फस्त करण्याची बाजीरावास धमकी दिली. परंतु बाजीरावानें इंग्रज वकिलाच्या मध्यस्तींने तो प्रसंग टाळला.

याच सुमारास सखारामास शिंद्याचें माळव्यांत निघून येण्याविषयीं निकडीचें बोलावणें आल्यावरून तो पुण्याहून निघून दौलतरावास नर्मदापार जाऊन मिळाला. शिंद्यानें त्यांस १०,००० घोडदळ व कवाइती पायदळांच्या चौदा पलटणी देऊन इंदूर लुटण्याकरितां पाठविलें. तेव्हां यशवंतराव होळकरहि कांहीं कवायत शिकविलेल्या पलटणी, ५००० बिनकवायती पलटणी व २५००० स्वार घेऊन चालून आला. दोन्ही पक्षांत कांहीं दिवस किरकोळ चकमकी झाल्यावर शेवटीं होळकरानें शिंद्याच्या लष्करावर जोराचा हल्ला केला; तथापि त्यांत त्याचा पराजय होऊन इंदूर लुटलें गेलें. इंदूर हातीं आल्यावर सखारामानें तेथें इच्छेस येईल त्याप्रमाणें पशुतुल्य क्रुरपणाचीं व अंगावर शहारे आणण्यासारखीं कृत्यें केलीं (डफ पुस्तक ३, पृ.२०१). पुढें इंग्रजांचें यशवंतराव होळकराशी युध्द चाललें असतां शिंद्यानें होळकरास मिळावें अशी सखारामाची आरांभापासून इच्छा होती व त्याप्रमाणें (१८०४ आक्टोबर) दोलतराव हा ब-हाणपुराहून उज्जनीकडे जावयास निघाला होता.

भरतपूरच्या जाटानें इंग्रजांशीं तह केल्यावर, होळकर व शिंदे एक होऊन अजमेरला आले तेव्हां सर्जेराव हाच शिंद्याचा दिवाण होता. व त्याचें मत वरीलप्रमाणें होळकराप्रमाणेंच शिंद्यानेंहि इंग्रजांशीं युध्द चालू ठेवावें असें होतें. तथापि पुढें सर्जेरावच्या जुलमी वर्तनामुळें स्वत च शिंद्यानें त्याला कामावरून दूर केलें. यानंतर शिंदे व होळकर यांनीं इंग्रजांशीं तह केला. त्यांत दोघांनींहि अत:पर सर्जेरावच्या सल्ल्यानें न चालण्याचा व त्याला आपल्या पदरीं चाकरीस न ठेवण्याचा करार केला (१८०५) परंतु पुढें लवकरच हा करार रद्द करण्यांत आला. व घाटग्यानें शिंद्याच्या कारभारांत पुन्हां वर्चस्व संपादन केलें. पुढें एकदां वाठारच्या निंबाळकर नांवाच्या एका शिलेदारास शिंद्यांच्या इच्छेविरूध्द जहागीर देण्याचें घाटग्याच्या मनांत येऊन त्या गडबडींत मानाजी फांकडयाचा मुलगा आनंदराव शिंदे यानें सखारामास जागच्याजागीं भाल्यानें भोसकून ठार केलें (१८०९-१०). डफनें याला राक्षस म्हटले आहे (पु.३.पृ.३२४). याला सर्जेराव असा किताब होता. याच्याच वंशांत कोल्हापूरचे माजी राजे शाहूछत्रपती यांचा जन्म झाला होता.
(डफ.पु.३; खरे-ऐ.ले. संग्रह पु.१० ११ १२).)

घाटगे मराठा घराणे.

माहिती संकलन द्वारा -विशाल बर्गे इनामदार

Leave a Comment