महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,09,750

घेरा प्रचितगड

Views: 2605
2 Min Read

घेरा प्रचितगड –

कसबा संगमेश्वर मधून उजवीकडे जाणारा रस्ता थेट शृंगारपुर पर्यंत जातो. नागमोडी वळणाचा रस्ता सप्तेश्वरच्या डोंगराखालून जात असतो. झाडी गर्द होत जाते. काही वेळाने प्रचितगड आणि त्याच्या शेजारचा सुळक्याचे अकस्मात दर्शन होते. आपण ऐन सह्याद्रीच्या कुशीत चाललेले असतो. शृंगारपूरचा फाटा सोडून आपण नायरी-तिवरे कडे वळलो की झाडी अजून दाट होते आणि मनुष्यवस्ती विरळ. हा सगळा परिसर घेरा प्रचितगड म्हणून ओळखला जातो. गर्द झाडीने भरलेला. माणसाचा वावर अजिबात नसलेला. इतिहासात महत्वाचे स्थान असलेला. घेरा प्रचितगड. सह्याद्रीची मुख्य रांग समोर एखाद्या भिंतीसारखी आडवी आलेली दिसते. तिवरे गाव समोर येते आणि रस्ता डावीकडे वळण घेतो. जेमतेम एखाद कि.मी. गेल्यावर रस्ता संपतो.

आता जंगलातून करायची फक्त पायपीट. धोधावणे या बारमाही धबधब्याकडे. वाटेत काही धनगरवाडे. त्यातलेसुद्धा निम्मे आता ओस पडलेले. मंडळी तिवरे गावात मुक्कामाला गेलेली. एक सरकारी शाळा ती पण आता बंद. रस्ता नदीच्या प्रवाहाच्या शेजारून चढ-उतार करत चाललेला. संपूर्ण निर्मनुष्य टापू. पक्षी मात्र मोठ्या संख्येने. भातशेतीतून जाणारा रस्ता पुढे दाट वेलींच्या सावलीतून धबधब्याकडे जाणारा. वाटेत काही चुकार गुरं चरताहेत..त्यांच्या पाठीवर बगळे बसलेत.

सगळं कसं सुशेगाद. पाठीशी रुबाबदार प्रचितगड. त्याच्या मागे अजस्र सह्याद्री. कोणे एके काळी हा सगळा भाग व्यापारी मार्गामुळे गजबजलेला. तिवरे घाटातून पाटण, गोठणेला जाणारा हा रस्ता. आता मात्र घाटावरचा सगळा भाग चांदोली अभयारण्य झाल्यामुळे निर्मनुष्य. रुंदीव, चांदेल ही गावेपण उठलेली. त्या भागातल्या जुन्या ट्रेकच्या आठवणी जागवत शांत निवांत प्रदेशात केलेली अर्ध्या दिवसाची भटकंती. उनाड भटकंती. अर्धा दिवस नाही पुरत इथे. दोन दिवस तरी हवेत. प्रचितगडाच्या अंगाखांद्यावर बागडायला. परत एकदा इथे मुक्कामाला यायचंय. प्रचितगडला भेटायचंय. नेरदवाडीवरून मळे घाट चढून जायचंय. किर्र जंगलात, ओढ्याकाठी एखादी रात्र काढायचीये. पुन्हा एकदा इकडे यायचंय.

आशुतोष बापट

Leave a Comment