श्री घोरवडेश्वर, शेलारवाडी –
पुण्यावरून सोमाटणे फाट्याकडे जाताना तळेगाव दाभाडे जवळ शेलारवाडी नावाचे एक गाव आहे. तिथे शेलारवाडीची फारशी परिचित नसणारी लेणी आहेत. सोमाटणे फाट्याच्या अलीकडे श्री घोरवडेश्वर पार्किंग असा फलक रस्त्याच्या डाव्या बाजूला दिसतो. तिथे एक मोकळे मैदान आहे. त्यात काळ्या पाषाणातल्या नंदीचा एक छोटासा नंदी मंडप आहे. त्याच्या समोर दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत. त्या पायऱ्या चढून वर डोंगरावर गेल्यावर ११ लेण्यांच्या समूहाशी आपण पोहोचतो. या लेण्यांच्या आसपास पाण्याची तब्बल २८ टाकीही खोदलेली आहेत. इ.स. ३ शतकाच्या अखेरीस किंवा इ.स.४ शतकाच्या आरंभी ह्या लेण्यांची निर्मिती झाली असावी.
या लेणीसमूहात एकच चैत्यगृह आहे. त्यातल्या दालनाची लांबी ७.७ मी., रुंदी ६ मी. आणि उंची २.५ मी. आहे. डाव्या बाजूला ३, उजव्या बाजूला ४, तर मागच्या बाजूला २ अशा एकूण ९ छोट्या खोल्या या दालनाला जोडून खोदलेल्या आहेत. मागच्या बाजूला असणाऱ्या २ खोल्यांच्या मध्ये पण दालनात मूळ स्तूप होता. तो स्तूप कालौघात पूर्ण नष्ट झाला असला, तरीही मूळ स्तूपावरची कोरीव दगडी हर्मिका अजूनही छताला लटकून शाबूत राहिली आहे. स्तूपाच्या वर्तुळाकार पायाचे जागी आता श्री घोरवडेश्वर विराजमान आहे.
तिथल्या भिंतीवर ब्राह्मी लिपीतील एक शिलालेख आहे. सिद्धम् ! थेरानाम भयत सिथाना अतेअसिनिया पवैत्रकय घट (1) य बलिका सधाय बुधा अच चेतियाघरो देयधाम मलपिता उदीसा सह च सवेही भिख (खू) कुलेही सहच अयरी (य) ही भतविरयेही समर्पितो. याचा अर्थ असा की, भदंतसिंहाचा शिष्य असणाऱ्या धपरच्या मुली बुधा आणि सघा (संघा) यांनी आपल्या आईवडिलांच्या स्मृतिखातर सर्व भिक्षू आणि गुरुजनांसाठी चैत्यदालनाची ही अपूर्व भेट अर्पण केली आहे. चैत्य दालनाशेजारची खोली व ओवरी आता ढासळली आहे. पण तिथेही आणखी एक शिलालेख आहे. सिद्धम धेनुकाकडे वाथवह हालकियस कुडुबिक्स उसभनकस कुडुविनिय सियागुत निकय देयधम लेनसह पुते व नंदगहपतिना सको. या लेखावरून उसभनक हा कुणबी शेतकरी त्याची बायको सिअगुतनिका आणि मुलगा नंद हे धेनुककड या गावात राहत होते. त्यांनी हे लेणे दान केले आहे. (म्हणजे त्याचा खर्च देणगी म्हणून दिला आहे.)
श्री घोरवडेश्वराचे दर्शन घेऊन उजव्या बाजूला असलेल्या पायवाटेने पुढे गेल्यावर अजून वर काही दालने दिसतात. बाहेरच्या बाजूला नंदी, हनुमान आणि एक समाधी आहे. पायऱ्या चढून वर गेल्यावर दगडात कोरलेले खांब आणि छतावरची नक्षी दिसते. त्यातल्या एका शंकराची पिंड आहे.
आजूबाजूच्या शेलारवाडी, धामणं, साळुंब्रे, सांगवडे, गहुंजे, शिरगाव, सोमाटणे, गोडुंबे, दारूबे, चिखले अशा पंचक्रोशीतील गावांमधून हजारो लोक महाशिवरात्रीला येथे येतात.
संदर्भ:
सहली एक दिवसाच्या, परिसरात पुण्याच्या – प्र. के. घाणेकर
इये महाराष्ट्र देशी – प्र. के. घाणेकर
पत्ता :
https://goo.gl/maps/PYB2C6AzG8MEknGd9
आठवणी इतिहासाच्या FB Page