महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,12,589

वेरुळचा घृष्णेश्वर आणि भोसले

Views: 1560
3 Min Read

वेरुळचा घृष्णेश्वर आणि भोसले –

भोसले म्हटले म्हणजे आपल्याला सर्वप्रथम आठवतात ते छत्रपति शिवाजी महाराज! छ. शिवाजी महाराजांमुळे हिंदुस्थानाच्या इतिहासात भोसले वंशाच्या इतिहासाचे, मराठा साम्राज्याच्या इतिहासाचे आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या इतिहासाचे एक सुवर्णपान तयार झाले. आणि त्या इतिहासाच्या सुवर्णपानाची लखाखी त्यांच्या शेकडो वर्षांनंतर आजपर्यंत जीवंत आहे. आपल्या कारकीर्दीत ज्वलंत आणि जीवंत करणारे ह्या वंशाच्या वंशपुरुषांचा इतिहास जेथून सलग मिळतो आणि त्यावर बहुतांशी विश्वसनीय साधनांचे आणि इतिहास अभ्यासकांचे एकमत आहे, ते वंशपुरुष म्हणजे बाबाजी भोसले. त्यांच्या दोन पुत्रांपैकी पहिला मालोजी आणि दूसरा विठोजी. हे उभय बंधु हिंदुस्थानाच्या दक्षिणेत राहत होते. ते ज्या भागात राहत होते, तो भाग निजामशहा बादशहाचा होता. ह्याच भागात ह्या बंधूंकडे वेरुळ वगैरेच्या पाटीलक्या होत्या.(वेरुळचा घृष्णेश्वर आणि भोसले)

शिवभारतकार म्हणतो त्याप्रमाणे, बादशाही दरबारात यांनी स्वकर्तुत्वाने स्वतःचे उच्च स्थान निर्माण केले होते. मालोजी आणि विठोजी जसे पराक्रमी आणि प्रतापी होते, तसेच ते धर्मपरायणही होते. ह्याच भागातील वेरुळमध्ये एक शंभूमहादेवाचे देऊळ होते. बादशाही आक्रमण आणि अत्याचारामुळे हे देऊळ उजाड झाले होते. म्हणायला हा शंभूमहादेव बारा जोतिर्लिंगांपैकी एक होता. आणि ह्याचे नाव होते घृष्णेश्वर! धर्मपरायण अश्या मालोजी आणि विठोजी ह्या बंधूंनी ह्या घृष्णेश्वराच्या देऊळाचा जीर्णोद्धार केला. ‘दास मालोजी बाबाजी व विठोजी बाबाजी भोसले’ हा देऊळावरील शिलालेख आजही ह्या भावांच्या धर्मपरायणतेची साक्ष देतो.

वेरुळचा जीर्णोद्धार केल्यानंतर ह्या बंधूंनी घृष्णेश्वराच्या अभिषेकाची आणि पूजा-अर्चनेची व्यवस्थाही लावली. ही व्यवस्था होती वेरुळच्या शेडग्यांकडे!

घृष्णेश्वराचा जीर्णोद्धार झाल्यानंतर मालोजी व विठोजी यांनी देवाच्या पूजा-अर्चनेसाठी तसेच अभिषेकासाठी तिमणभट बिन दामोदरभट यांच्याकडे व्यवस्था दिली व त्यांना वृत्तीही करून दिली. कदाचित घृष्णेश्वराच्या आणि शेडग्यांच्या व्यवस्थेबद्दल मालोजीची पत्नी उमाबाई हिने पुढाकार घेतला असावा. म्हणूनच शहाजीराजे एके ठिकाणी, “तिमणभट बिन दामोदरभट या श्री देवाचा अभिषेक मातुश्री उमाई आवा साहेब दिधला होता”, असे म्हणतात. मालोजी आणि विठोजी नंतरही यांच्या पुत्रांनी ही अभिषेकाची वृत्ती सुरुच ठेवली.

वेरुळच्या दामोदरभटांना दोन मुले होती. पहिला तिमणभट व दूसरा विठ्ठलभट. विठ्ठलभट इ. स. १६४६ च्या आधीच निवर्तला होता. तिमणभट ह्याकाळापर्यंत होता. पण कदाचित वृद्धापकाळामुळे त्याने सारी व्यवस्था आपला पुत्र महादेवभटाकडे दिली असावी. पुढे ही व्यवस्था महादेवभट व याचा भाऊ विश्वनाथभट पाहत होता. विठ्ठलभटाच्या पुत्राचे नाव रघुनाथभट. विठ्ठलभट निवर्तल्यानंतर रघुनाथभट व तिमणभटाचे दोन पुत्र यांच्यात अभिषेकाच्या वृत्तीबद्दल वादही झाले असावेत.

शहाजी राजांनी इ. स. १६४५ पासून सालीना १७ होनांची व्यवस्था तिमणभट सेडगेच्या पुत्रास म्हणजेच महादेवभटास लाऊन दिली. कदाचित ह्यापुर्वी सन १६२९ मध्येही अशीच व्यवस्था केली होती. ह्याचबरोबर इ. स. १६४३ मध्ये त्रिंबकजीराजे (विठोजीपुत्र किंवा शरीफजीपुत्र) यानेही महादेवभटाकडे ही व्यवस्था दिली होती. ह्याच व्यवस्थेसाठी संभाजीराजे (विठोजीपुत्र/शहाजीपुत्र) यांनी १७ होन दिलेले होते. १६४५ मध्ये शहाजीराजांनी केलेल्या व्यवस्थेचा वर उल्लेख आहेच. पुढे १६५१ मध्ये विठोजीपुत्र मंबाजी यानेही रघुनाथ विठ्ठल व महादेव तिमण यांना ह्या व्यवस्थेसाठी ६ होनांचे वर्षासन दिले होते. त्याचबरोबर १६६१ मध्ये खेळोजी (विठोजीपुत्र) यानेही १२ रुपये वर्षासन दिले. पुढे इ. स. १६६५ मध्ये हेच १२ रूपये वाढवून ४० रुपये करण्यात आले.

अश्याप्रकारे मालोजी व विठोजी यांनी जीर्णोद्धार केल्यानंतर घृष्णेश्वराचे पौरोहित्याची व्यवस्था त्यांच्या वंशजांनी लावली.

©अनिकेत वाणी

Leave a Comment