महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,98,580

जेष्ठ इतिहासकार गो.स.सरदेसाई

Views: 2971
6 Min Read

जेष्ठ इतिहासकार गो.स.सरदेसाई –

रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील गोविल या खेड्यात १७ मे १८६५ या दिवशी झाला. त्यांचे वडील सखारामपंत त्याच गावात शेतीचे काम करून मोठ्या कष्टाने जीवन जगत होते. गोविंद सखाराम यांचे आजोबा छत्रपती शिवाजी महाराज व पेशवे यांची सेवा करत होते .लहानपणी गोविंद सखाराम यांनाही वडिलांबरोबर शेतीच्या कामात मदत करावी लागे. त्यांचे प्राथमिक शिक्षण शिपोशीच्या शाळेत झाले. नंतर ते इंग्रजी शिकण्यासाठी रत्नागिरीला गेले. तेथे त्यांना रावबहादूर गणेश व्यंकटेश जोशी व मोरेश्वर वामन कीर्तने या दोन विद्वान शिक्षकांचा सहवास लाभला. कीर्तने यांच्या कन्या गंगुताई यांच्याशी गो.स.सरदेसाई यांचा विवाह २९ फेब्रुवारी १८८४ मध्ये झाला.

रत्नागिरीच्या हायस्कूलमधून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर सरदेसाई यांनी पुण्यात फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. र्फग्युसनमध्ये प्रथम वर्ष पूर्ण करून ते पुढील शिक्षणासाठी मुंबईला गेले. तेथे एल्फिन्स्टन कॉलेजमधून ते इ. स. १८८८ मध्ये बी. ए. झाले. रत्नागिरीच्या शालेय शिक्षणात त्यांना त्यांचे मामा बळवंतराव आठल्ये यांची मदत झाली.

पदवी मिळाल्यानंतर सरदेसाई यांना बापूसाहेब आठल्ये यांच्या ओळखीने बडोदेकर संस्थानिक श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड यांच्याकडे ‘रीडर’ म्हणून काम मिळाले. ते इ. स. १८८९ च्या सुरुवातीस या नवीन जबाबदारीच्या कामी रुजू झाले. महाराजांना वर्तमानपत्रे, पत्रे, पुस्तके इत्यादि वाचून दाखविण्याचे काम त्यांना करावे लागत असे. वर्षभरातच त्यांच्याकडे त्या वेळचे युवराज फत्तेसिंहराव यांना शिकवण्याचे काम सोपविण्यात आले. या कामगिरीची त्यांनी अगदी मनापासून तयारी केली. त्यासाठी ते शिकवावयाच्या विषयांची टिपणे काढीत. अशा टिपणांतूनच पुढे त्यांनी लिहिलेल्या रियासतींचा जन्म झाला.

महाराजांना टापटीप, रेखीव आणि व्यवस्थित कामाची आवड होती. तीच शिस्त सरदेसाई यांच्या अंगी बाणवली. ‘ट्यूटर’ म्हणून काढलेल्या इतिहासाची टिपणे अधिक विस्तारून इ. स. १८९८ मध्ये ‘मुसलमानी रियासत’ या नावाने प्रसिद्ध झाली. याबरोबरच त्यांनी मॅकिया व्हिली यांच्या ‘द प्रिन्स’ आणि प्रो. सिली यांच्या ‘एक्स्पान्शन ऑफ इंग्लंड’ या ग्रंथांचे भाषांतर केले. हे दोन्ही ग्रंथ ‘सयाजीराव महाराज ग्रंथमाला’ या मालेतून प्रसिद्ध झाले.

गो.स.सरदेसाई यांना सयाजीराव महाराजांबरोबर संपूर्ण भारताचा तसेच, इंग्लंड आणि युरोपातील देशाचा पाच वेळा प्रवास करण्याची संधी मिळाली. महाराजांचा विश्वास त्यांनी संपादन केला होता. त्यामुळे आपल्याबरोबर प्रत्येक प्रवासाचे वेळी सरदेसाई असावेत अशी महाराजांची इच्छा असणे स्वाभाविक हेते. अशा प्रवासामुळे सरदेसाईंना जगातील अनेक समाज, लोकरीती, स्वभाव, इतिहास, परंपरा इत्यादि समजून घेण्याची अपूर्व संधी मिळाली. कामातील रेखीवपणा आणि शिस्त याचबरोबर त्यांच्या विचारात प्रगल्भताही आली. महाराजांनी राजवाड्यातील राजपुत्र आणि राजकन्या यांच्या शिक्षणासाठी स्वतंत्र व्यवस्था केली होती. तिचे प्रमुखपदही सरदेसाई यांच्याकडे दिले. हे काम त्यांनी दोन तपांहून अधिक काळ लेले. बहतुक सर्व बडोदेकर राजपुत्र व राजकन्यांचे ते मास्तर होते. त्यांच्याविषयी राजघराण्यात आदर बाळगला जात होता. या कामाबरोबरच त्यांच्याकडे वाड्यातील हिशेब खात्याचेही काम देण्यात आले. ते त्यांनी सुमारे बारा वषेर् केले.

राजवाड्यातील नोकरी-बरोबर त्यांनी इतिहासाचा अभ्यास आणि लेखन चालूच ठेवले होते. ‘हिंदुस्तानचा अर्वाचीन इतिहास’ या मालेतील ‘मुसलमानी रियासत’ पूर्वार्ध, ‘मराठी रियासत’ पूर्वार्ध, मध्यविभाग तसेच ‘ब्रिटिश रिसायसती’चा पूर्वार्ध असे ग्रंथ लिहून प्रसिद्ध केले. इ. स. १९२५ मध्ये त्यांनी महाराजांच्या नोकरीतून निवृत्ती घेतली आणि नंतरचे सर्व आयुष्य पुणे-मुंंबई मार्गावरील कामशेत येथे इंदायणी नदीच्या काठी आपल्या निवासस्थानी इतिहासलेखनाच्या तपश्चर्येत व्यतीत केले. ‘मराठी रियासती’चे पुढचे सर्व लेखन येथेच पूर्ण झाले.

सरदेसाई यांना डॉ. श्यामकांत व श्रीवत्स अशी दोन मुले होती, ती दोन्ही अकाली निधन पावली. सरदेसाईंच्या आयुष्यावर झालेला तो प्रचंड आघात होता. श्यामकांत शांतिनिकेतन येथे आरंभीचे शिक्षण घेऊन पुढच्या शिक्षणासाठी जर्मनीला गेला. तो पीएच.डी. झाला पण तेथेच त्याचे दु:खद निधन झाले. श्रीवत्स अकरा-बारा वर्षे वयातच निधन पावला. सरदेसाई पती-पत्नींना पुत्रशोकाच्या आघातातून बाहेर पडणे अशक्य होते. पण रियासतकारांनी त्यातूनही स्वत:चे मन आवरले आणि ‘इतिहासालाच त्यांनी आपला मुलगा मानलेला आहे.’ हे साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांचे उद्गार खरोखरच समर्पक होते. इ. स. १९४३ मध्ये त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई उर्फ माई यांचेही निधन झाले. असे सर्व कौटुंबिक आघात सोसूनही त्यांच्या लेखनात खंड पडला नाही.

इतिहासलेखनाच्या संदर्भात सरदेसाई यांची सर जदुनाथ सरकार यांच्याशी मैत्री झाली आणि ती मैत्री अखंड पन्नास वषेर् टिकली. अनेक विषयांवर त्यांचे मतभेद होते. तरी त्यांची मैत्री अतूटच राहिली. त्यांचे स्नेसंबंध घरोब्यापेक्षाही अधिक निकटचे होते. सर जदुनाथांनी सरदेसाई यांना ‘ग्रेटेस्ट लिव्हिंग हिस्टोरियन ऑफ द मराठाज’ असे गौरवाने म्हटले आहे. ते सरदेसाईंच्या कार्याचे योग्य असे मूल्यमापन म्हटले पाहिजे. या प्रदीर्घकालीन मैत्रीच्या संबंधातच त्यांनी पेशवे दप्तर, रेसिडेन्सी रेकॉर्डस, ग्वाल्हेरच्या पत्रसंग्रह इत्यादि कामे स्वीकारली. त्यात त्यांना जदुनाथ सरकारांचे बहुमोल सहकार्य मिळत गेले. जदुनाथ सरकारांनाही मराठ्यांच्या इतिसहासातील अनेक प्रश्न सोडविण्यासाठी सरदेसाईंचे फार मोठे साहाय्य झाले.

सरदेसाई यांनी रियासतीचे एकूण तेरा खंड प्रकाशित केले. ‘मुसलमानी रियासती’च्या तीन आवृत्त्या काढल्या. ‘मराठी रियासती’च्या पूर्वार्धाच्या तीन व मध्यविभागाच्या दोन आवृत्त्या काढल्या. ‘ब्रिटिश रियासती’चे पूर्वार्ध व उत्तरार्ध असे दोन खंड प्रकाशित केले. ‘मराठी रियासती’वर आधारित न्यू हिस्ट्री ऑफ दी मराठाज’चे तीन खंड, तसेच, पाटणा विद्यापीठात दिलेल्या व्याख्यानावर ‘मेन करंटस् ऑफ मराठी हिस्ट्री’, असे इंग्रजी ग्रंथ लिहिले. याखेरीज त्यांनी विद्यार्थ्यांसाठी व मुलांसाठी ‘शालोपयोगी भारतवर्ष’, ‘बालोपयोगी महाराष्ट्राचा इतिहास,’ ‘महाराष्ट्राच्या इतिहासाच्या सोप्या गोष्टी’, ‘हिंदुस्थानचा प्राथमिक इतिहास’ लेखनाबरोबरच सरदेसाई यांनी पेशवे दप्तरातील कागदपत्रांचे संशोधन व संपादन करून ४५ खंड प्रकाशित केले. सर जदुनाथांच्या बरोबर ‘पूना रेसिडेन्सी कॉरस्पॉन्डन्स’चे पाच खंड संपादित केले. ‘काव्येतिहास संग्रहा’तील परमानंदांच्या ‘अनुपुराणा’चे संपादन करून त्यांनी ‘गायकवाड ओरिएंटल सेरीज’मध्ये प्रकाशित केले. याखेरीज वेळोवेळी त्यांनी ऐतिहासिक तसेच वर्तमान महत्त्वाच्या विषयांवर विविध लेख नियतकालिकांमधून लिहिले. अशा लेखांची संख्या ३५० वर जाते. आपल्या विविध भाषणांच्या टिपणांचा त्यांचा संग्रही फार मोठा आहे.

रियासतकारांचे निधन २९ नोव्हेंंबर १९५९ रोजी कामशेत येथे झाले. त्यांनी आपला ग्रंथसंग्रह पुणे विद्यापीठाला दिला. तो डेक्कन कॉलेजमध्ये ठेवलेला आहे तसेच, त्यांच्या पत्रव्यवहाराच्या फायली मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात ठेवलेल्या आहेत.गो.स.सरदेसाई.

डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर

Leave a Comment