गोदावरी नदीकाठ, नाशिक (मंदिरे आणि कुंड)
गोदावरी नदीची गणना भारतातील प्रमुख नद्यांमध्ये केली जाते. या नदीला दक्षिण गंगा असे हि म्हटले जाते. गोदावरी नदीची लांबी १,४५० किलोमीटर (९०० मैल) आहे. गोदावरीचा उगम नाशिकजवळ श्री. क्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो.
अमृत मंथनच्या वेळेस अमृताचे थेंब नाशिक येथे गोदावरी नदी मधील रामकुंड व त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त या ठिकाणी पडले. त्यामुळे दर १२ वर्षांनी सिहस्थ कुंभमेळा या ठिकाणी भरतो. देशभरातील साधू, संत-महंत व भाविक स्नानासाठी येतात म्हणूनच गोदावरीला गंगे इतकेच महत्त्व आहे.
रामायण काळात नाशिकचा उल्लेख दंडकारण्य असा आहे. प्रभू रामचंद्रांनी येथे वास्तव्य केले होते. आजही गोदावरीत रामकुंड, सीताकुंड ही पवित्र कुंड आहे. नाशिक मध्ये गोदावरी प्रवाह बदलते, काटकोन वळण घेऊन पूर्वेकडे वाहते. त्यामुळे येथे चुंबकीय क्षेत्र तयार झाले आहे. मानवांच्या अस्थी येथे पाण्यात विरघळतात म्हणून देशभरातून भाविक येथे अस्थी विसर्जनासाठी येतात.
श्री. यशवंतराव महाराज मंदिर :
साधूपुरूष यशवंतरावमहाराज देव-मामलेदार यांचे मंदिर गोदावरीच्या काठी आहे. हे देवालय १८८७ मध्ये देव मामलेदारांनी समाधी घेतल्यानंतर बांधले गेले. यशवंतराव महाराज सटाणा येथे मामलेदार असतांना मोठा दुष्काळ पडला होता. त्यावेळी सरकारी नियम धाब्यावर बसवून त्यांनी गोरगरीबांना मदत केली होती. अत्यंत साधुवृत्तीचे संत पुरूष म्हणून त्यांचा लौकिक होता. एखाद्या सरकारी अधिका-याचे असे जगातले हे एकमेव मंदिर असावे. याच पटांगणात दरवर्षी वसंत व्याख्यानमाला होते.
श्रीसिहस्थ गोदावरी मंदिर :
रामकुंडाच्या उत्तरेस हे मंदिर असून फक्त १२ वर्षांनी, म्हणजेच सिहस्थ कुंभमेळयाचे वेळीच १ वर्षभर हे मंदिर उघडते. वर्षातून दोनदा ज्येष्ठ शु !! १० (दशहरा) व कार्तिक शु !! १५ त्रिपुरी पौर्णिमा दीपोत्सवासाठी हे मंदिर उघडले जाते. या मंदिरात भगिरथीची मूर्ती आहे. सिहस्थ गोदावरीचे मंदिर फक्त नाशिकक्षेत्रीच आहे.
श्रीगंगा गोदावरी मंदिर :
हे मंदिर रामकुंडाच्या पूर्वेला अरूणा संगमाजवळ असून येथे मकर वाहिनी गोदावरी व भागिरथी अशा दोन मूर्ती आहेत. तीर्थयात्रेची गंगाभेट या मंदिरात करतात.
दुतोंड्या मारुती :
गोदावरी घाटावर ज्या काही वास्तू नजरेत भरतात, त्यात प्रामुख्याने दुतोंड्या मारुती चा समावेश होतो. रामकुंड आणि नारोशंकर मंदिराच्या मध्यभागी दुतोंड्या मारुती चे शिल्प १९४२ च्या सुमारास उभारण्यात आले. आज हाच दुतोंड्या मारुती गोदावरीला आलेल्या महापुराची तीव्रता मोजण्याचे एक साधन बनला आहे.
नारोशंकर मंदिर – (रामेश्वर मंदिर)
हे मंदिर सरदार नारोशंकर यांनी १७४७ साली बांधले. मंदिरावर टांगलेली घंटा नारोशंकराची घंटा म्हणून प्रसिद्ध आहे. चिमाजी अप्पाने वसईचा किल्ला फिरंग्यांकडून सर केल्यानंतर तिथून ही घंटा नारोशंकरांनी आणली व देवापुढे टांगली. ही घंटा इ.स. १७२१ साली पोर्तुगालमध्ये ओतली असल्याचा उल्लेख आहे. घंटेचा आवाज तीन कोस दूरपर्यंत जातो, असे म्हणतात.
माहिती साभार – माझी भटकंती फेसबुक पेज