आरमाराचा सुवर्णकाळ म्हणजे आंग्रे घराण्याचा काळ…
आपल्या कर्तुत्वाच्या बळावर आंग्रे इतके मोठे आणि इतके प्रभावशाली झाले की दर्यावर बेपान्हा हुकुमत गाजवत. छत्रपती शिवरायांनी दूरदृष्टीने उभारलेल्या आरमाराचा सुवर्णकाळ म्हणजे आंग्रे घराण्याचा काळ परंतु पश्चिम किनाऱ्यावर म्हणजेचं महाराष्ट्राच्या, देशाच्या एका कडेचे संरक्षण करता करता त्यांनी घडविलेला इतिहास देखील कडेलाच राहिला. अरबी समुद्रात त्यांनी उभारलेले, राखलेले, आणि उध्वस्त केलेले किल्ले अजाही याची साक्ष देतात.
आपल्या कर्तबगारीने, जहाजांशी जवळीक जोडणाऱ्या सागरावर सत्ता सांगणाऱ्या इंग्रज, पोर्तुगीज, सिद्दी साऱ्यांना धाकात ठेवण्याचे कार्य आंग्रे घराण्याने मोठ्या धाडसाने पार पाडीत भारताच्या आरमारी इतिहासाचे पानच लिहिले असे म्हणायला हरकत नाही.
सन १७१०-१२ सुमारास आंग्रे समुद्रावर अशाप्रकारे प्रबळ झाले होते की हिंदुस्थानातीलचं नव्हे तर युरोपियन सत्तांना देखील भारी होऊन राहिले आहेत असे गोव्याचा व्हाईसरॉय पोर्तुगालला आपल्या राजाला लिहिलेल्या पत्रात म्हणतो –
‘महाराज,
आन्र्यांनी सांप्रत उत्तर समुद्र किनाऱ्यावर लुटालूटीची मोहीम सुरु केली आहे. त्यांना ते शक्य आहे, कारण काही बंदरांचा त्यांना आश्रय मिळतो. केवळ हिंदुस्थानातील सत्तांशीच नव्हे तर युरोपियन सत्तांशी देखील त्यांच्या कुरापती चालू आहेत. त्यांनी एवढे मोठे सामर्थ्य संपादन केले आहे, की सगळीकडे त्यांचा दरारा चालू आहे. त्यांच्याशी तह करणे आता केवळ अशक्य झाले आहे असे नाही, तर त्यांची गोष्ट काढणे देखील आता कठीण होऊन बसले आहे. आता फक्त एकच मार्ग उरला आहे आणि तो म्हणजे, त्यांच्याशी युद्ध करून त्यांना नष्ट करण्याचा. न झाल्यास अवघ्याच वर्षांत सर्व राष्ट्रांना ते भारी होऊन राहतील (_ _ _ _) त्यांना नेस्तनाबूत कसे करता येईल ह्या विचारा शिवाय मला दुसरा कोणताच विचार सुचत नाही. तहाचा विचार तर आता सोडून दिलेला बरा….
माहिती साभार – आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची