महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,66,268

पौराणिक गोंदेश्वर मंदिर, सिन्नर

By Discover Maharashtra Views: 3758 4 Min Read

पौराणिक गोंदेश्वर मंदिर, सिन्नर

जुन्नर शहरातून नाशिकला जाण्यासाठी 1:45 वा निघालो होतो. विषय होता आयुर्वेदिक औषध नाशिकला जाऊन आणण्याचा. आम्ही जयहिंद काॅलेज मागे टाकत भरघाव वेगाने नारायणगावच्या दिशेने आमची चारचाकी जात असताना अचानक मोबाईल घरीच जुन्नरला विसरल्याचे लक्षात आले. सोबत चिन्मय होता. त्याच्या मोबाईल माझा नंबर डायल केला तर तो पत्नीने घरी रिसिव केला व बोलली फोन विसरलात. जुन्नरहून सासरे बोरी शिरोलीला जायला निघाले होते त्यांच्याकडे मोबाईल पाठवून देते व तुम्ही तेथेच थांबा म्हणुन पत्नी बोलली व संभाषण कट झाले. विसाव्या मिनीटातच मला मोबाईल मिळाला. हायबाय करत आम्ही निघालो. नारायणगाव, आळेफाटा,संगमनेर मागे टाकत आता सिन्नरच्या पौराणिक गोंदेश्वर मंदिराचे दर्शन घ्यावे म्हणुन थांबलो. वेळ थोडा होता व त्याच वेळेत परिपूर्ण छायाचित्रांसह दर्शन व्हावे हा उद्देश होता. चारचाकी पार्क करत कॅमेरा सोबत घेत बाहेर पडलो. मंदिराच्या बाह्यांगाचे छायाचित्र घ्यावे म्हणुन कॅमेरा ऑन केला व प्रथम क्लिक केला. तेव्हा समजले की कॅमेरा मेमरीकार्ड घरीच लेप्टाॅपमध्ये राहीले. मग काय पुन्हा सिन्नर शहराकडे कार्ड शोधन्यासाठी धाव घेतली. 30 मिनीटांत कार्ड मिळाले व मंदिर दर्शन सुरू झाले.

पुणे नाशिक व मुंबई – शिर्डी मार्गावर सिन्नर नावाच गाव आहे. या गावात रस्त्यालगतच तहसीलदार कार्यलयाच्या उत्तरेला अगदी 300 मीटर अंतरावर हे गोंदेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर केव्हा व कोणी बांधल याचा उल्लेख व शिलालेख मिळत नाही. यादवांच्या राजवटीत १२ व्या शतकात हे मंदिर बांधले असावे असा तर्क या मंदिराच्या रचनेतुन निदर्शनास येतो. या गोंदेश्वर मंदिरा भोवती ५ फूट उंच तटबंदी असुन पुर्वेकडील भिंत बाहेरून ढासळलेली आहे.या तटबंदीत असलेल्या दोन दरवाजातून म्हणजे पश्चिम आणि दक्षिण दिशेकडून मंदिराच्या परीसरात प्रवेश केल्यावर समोर ५ फूटी उंच चौथर्‍यावर (अधिष्ठाण) मध्यभागी गोंदेश्वराचे उंच मंदिर व त्याच्या चार बाजूला असलेली चार छोटी कलाकुसरींनी युक्त मंदिर आपले लक्ष वेधून घेतात.

गोंदेश्वराचे मंदिर संकुलात ५ मंदिर आहेत. हे शिव पंचायतन असून यात मुख्य मंदिर शिवाचे असून चार बाजूला पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णूचे मंदिर आहे. या शिवाय शिव मंदिरा समोर नंदिचा मंडप आहे. शिव मंदिराचे सभामंडप चार खांबांवर तोललेला आहे. मध्यभागी कासव कोरलेले असून खांबांवर व छ्तावर नक्षी कोरलेली आहे. खांबाबर काही शिल्पपट व मुर्ती कोरलेल्या आहेत. मंदिराच्या गर्भगृहात शंकराची पिंड आहे. मंदिराच्या सभामंडपाला पूर्वेकडे असून मंदिराचे मुख्य दार दक्षिणेकडून आहे. मंदिराच्या दरवाजा समोर नंदिचा मंडप आहे. मंदिराचे शिखर भूमिजा पध्दतीचे आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूसही पायापासून छतापर्यंत कोरीवकाम व नक्षीकाम केलेले आहे. सर्वात खालच्या बाजूच्या शिल्पपट्टीवर हत्ती कोरलेले आहेत. मुख्य मंदिराच्या बाजूला असलेल्या मंदिरांवरही कोरीवकाम व नक्षीकाम केलेले आहे.
मंदीर सध्या संवर्धित होणे गरजेचे असून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे हा ऐतिहासिक ठेवा लवकरच संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.

पर्यटकांना येथील आवारात क्रिकेट खेळणा-या मुलांकडून अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे सिन्नर ग्रामस्थ व पुरातत्व विभाग यांनी विशेष लक्ष देत संवर्धन केले तर भविष्यात हेच मंदिर सिन्नरकरांचे मुख्य पर्यटन आकर्षण ठरले जाऊन अनेक बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात मुख्य भुमिका निभावेल असे वाटते. …. येथील छायाचित्र व माहीती घेत आम्ही पुढे गारगोटी मुझीयम पाहण्यासाठी निघालो. वेळ झाली होती 4:00 ची.

लेखक/छायाचित्र – श्री खरमाळे रमेश 
शिवनेरी भुषण
(माजी सैनिक खोडद)
8390008370
वनरक्षक – वनविभाग जुन्नर
संस्थापक -:निसर्ग रम्य जुन्नर तालुका फेसबुक पेज
उपाध्यक्ष – शिवाजी ट्रेल
संचालक – माजी सैनिक संघ जुन्नर तालुका
सदस्य :- रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी

राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला

Leave a Comment