महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,10,334

गोंदेश्वर मंदिर, सिन्नर

Views: 3689
2 Min Read

गोंदेश्वर मंदिर, सिन्नर –

मंदिर स्थापत्य :

नाशिकमध्ये दुर्मिळ आणि प्राचीन मंदिरांचा खजिना आहे. यापैकी सिन्नर येथील पंचायतन प्रकारातील गोंदेश्वर मंदिर एक. यादव काळातील हे मंदिर नाशिकचं सौंदर्य आहे. सुमारे आठशे वर्षांपूर्वी सिन्नरवर यादव वंशातील राजा राव गोविंद यांचे शासन होते. या राजावरूनच मंदिराचे नाव गोविंदेश्वर अन् पुढे गोंदेश्वर पडले असावे. हे मंदिर इ. स. ११६० साली बांधले असावे, असा अंदाज अभ्यासक लावतात. हे एकटे मंदिर नसून, शिवपंचायतन स्वरूपात असणारा हा पाच मंदिरांचा समूह आहे. म्हणूनच गोंदेश्वराचे महत्त्व फक्त सिन्नर अथवा नाशिकपुरते मर्यादित नाही तर महाराष्ट्राच्या स्थापत्यशिल्प वैभवात या मंदिराने भर घातलेली आहे.

सिन्नर येथील गोंदेश्वर मंदिर हे मंदिर पुरातन भूमिज स्थापत्यशैली बांधकामाचा उत्तम नमुना आहे. हे मंदिर पाच मुख्य मंदिरांचा समूह असल्याने त्याला शैवपंचायतन म्हटले जाते. यांतील गोंदेश्वराचे मुख्य शिवमंदिर मध्यावर असून सभोवतीची चार उपदिशांना असणारी मंदिरे पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू यांची आहेत. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पुर्वेला असून दक्षिण व उत्तर दिशेलाही प्रवेशद्वार आहे. मंदिराची संरचना  स्वर्गमंडप, नंदीमंडप, मुखमंडप, सभामंडप व अंतराळ व गर्भगृह अशी असून गर्भगृहावर बांधलेले, आकाशाकडे झेपावणारे मंदिराचे पटईचे शिखर अतिशय देखणे असून अप्रतिम कोरीवकामाने सजवलेले आहे. गर्भगृहात रेखीव शिवपिंड आहे. मंदिराला विस्तृत आवार आहे.

शिल्पकला :

महाराष्ट्रावर सुमारे पाचशे वर्षे यादव राजघराण्यानी राज्य केलं. यादव राजवटीत ‘मराठी’ भाषेच्या साहित्यकृतीनी मराठीचे साहित्यभांडार अलंकृत झाले. असे हे यादव घराणे स्वतःला श्रीकृष्णाचे वंशज म्हणवून घेत. यादवांनी बांधलेले किल्ले, राजवाडे, मंदिरे, मठ, रस्ते, बारव आजही महाराष्ट्रात पाहायला मिळतात. यादव काळात स्थापत्य व शिल्पकला बहरात होती. त्याचा उत्तम नमुना म्हणजे शिवपंचायतन प्रकारातील सिन्नर चे गोंदेश्वर मंदिर.

मंदिरातील शिल्पकाम त्रिमित असून त्यावर पडणार्या परावर्तित प्रकाशाच्या आणि सावलीच्या छटांतून मंदिराचे देखणेपण अधिकच उठावदार दिसते. सभामंडपातील खांब नक्षीने कोरलेले असून त्यावर आणि मंदिरांच्या बाह्य भिंतींवर सुरसुंदरी, देव-देवता, गंधर्व-अप्सरा, पौराणिक आणि रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत.

(मंदिराच्या बाह्य अंगावरील व अंतरंगातील काही शिल्पांची मी माझ्या माहिती नुसार वर्णने केली आहेत. वर्णन करताना कुठे चूक झाली असल्यास आणि जाणकारांनी ती चूक निदर्शनास आणून दिल्यास ज्ञानात भर पडून आनंदच होईल.)

Rohan Gadekar 

Leave a Comment