महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,22,320

समाजप्रबोधनकार गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी

By Discover Maharashtra Views: 2877 6 Min Read

समाजप्रबोधनकार गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी…

गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म पुणे येथे दिनांक १८ फेब्रुवारी १८२३ रोजी झाला. गोपाळरावांचे वडील हरिपंत हे पेशव्यांचे पराक्रमी सेनापती गोखले यांचे फडणीस होते.

लोकहितवादी गोपाळराव हरी देशमुख हे पेशवाईच्या अस्तानंतर उदयास आलेले एक मनस्वी व्यक्तिमत्व होते. एका विहिरीच्या कोनाड्यात बसून वडिलधार्‍यांची नजर चुकवून  इंग्लिश पुस्तकांचे वाचन करणारे ते एक बंडखोर अभ्यासक होते. ज्या काळात ‘ इंग्लिश पुस्तकाने घर विटाळते ‘ असे समजण्याइतपत माणसांच्या मूड गतीने मजल मारली होती, त्याकाळात अट्टाहासाने इंग्लिश ग्रंथाचे वाचन करून ज्ञानविज्ञानाच्या नवनवीन क्षितीजांचे अवलोकन करणारा एक स्वतंत्रप्रज्ञ व संशोधनशील समाजशास्त्रज्ञ म्हणून लोकहितवादी ओळखले जातात. हृदयातून निघून हृदयाचा ठाव घेणाऱ्या निर्भय आणि तोकड्या मराठी वाक्यानी विचार सृष्टीत दिग्विजय संपादन करणारे एक झुंजार व्यक्तिमत्त्व म्हणून सर्वजण लोकहितवादींचे स्मरण करतात. समाजाच्या हिताचा विचार करणाऱा आधुनिक महाराष्ट्रातील पहिला पुरुष म्हणून त्यांचा आदरपूर्वक उल्लेख करावा लागेल.

आज महाराष्ट्रात इतमामाने कार्यरत असणाऱ्या अनेक संस्थांच्या उभारणीत गोपाळरावांचा महत्वाचा वाटा होता. पुण्याचे नगरवाचनालय आणि हुजूरपागा या संस्था गोपाळरावांच्या प्रेरणेने प्रोत्साहीत  झाल्या. नगरवाचन मंदिर हे पूर्वी नेटिव्ह जनरल लायब्ररी या नावाने ओळखले जात असे. पुण्याचे ‘ज्ञानप्रकाश ‘आणि मुंबईचे ‘इंदुप्रकाश ही पत्रे गोपाळरावांच्या आशीर्वादाने बळ धरून उभी राहिली.आर्य समाजाच्या व प्रार्थना समाजाच्या अनेक शाखांचे त्यांनी संयोजन केले. गोपाळराव जातील त्या गावात वाचनालय सुरु करणे आणि शाळा काढणे हा त्यांचा विरंगुळा होता. पुनर्विवाहाला मान्यता आणि प्रतिष्ठा लाभावी यासाठी या प्रबोधनकारांने ‘सामाजिक बहिष्काराला तोंड देऊन ‘पुनर्विवाहोत्तेजक मंडळी ‘या संस्थेच्या कार्याची धुरा वाहिली.

समाजकारण ,राजकारण, धर्मकारण या जीवनाच्या सर्व अंगात लोकहितवादींना परिवर्तन अभिप्रेत होते. प्रारब्धवाद, दैववाद आणि कर्मकांड यांनी काळवंडलेले जीवन विज्ञान आणि प्रयत्नवाद यांनी उजळून निघाले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता.

स्त्रियांचा मानसिक व भावनिक कोंडमारा करणाऱ्या जाचक रूढीवर त्यांनी वज्रकठोर प्रहार केले. बालविवाह, केशवपन ,सती या अमानुष वर्तनप्रकारांचा त्यांनी सातत्याने धिक्कार केला. लोकहितवादींची सगळी धडपड आणि त्यांच्या मनाची अवघी तडफड समाजजीवनाच्या सुदृढतेसाठीच होती.

भारतीय माणूस इंग्रजाहून  बुद्धीने वरचढ असूनही या देशाला परवशतेचे दैन्य भोगावे लागत आहे, याचे कारण अज्ञान आणि आळस हेच होय ,असा लोकहितवादींच्या प्रतिपादनाचा रोख होता. या देशात ज्ञान होते तोपर्यंत ऐश्वर्य होते, परंतु गेल्या दोन हजार वर्षात ज्ञानाचे संवर्धन थांबले .जातिभेद, कर्मकांड आणि व्रतवैकल्ये यांच्या जंजाळात गुंतून पडल्यामुळे आपले स्थान आणि कर्तव्य यांचे कोणाला भान राहिले नाही ,हे गोपाळरावांनी केलेले निदान होते .

समाजसुधारणे एवढाच राज्य सुधारणेतही लोकहितवादींना रस होता .भारतीयांनी पार्लमेंटची मागणी करावी या कल्पनेची वाच्यता  सर्वप्रथम लोकहितवादींनी केली होती.  ते म्हणाले होते ,” सर्व गरिबांनी व श्रीमंतांनी एकत्रित येऊन ब्रिटिशांकडे अर्ज करावा की,हिंदुस्थानचे स्वतंत्र पार्लमेंट असावे .

शेतकऱ्यांच्या दैनिक दशेचे चित्र लोकहितवादींनी आपल्या ‘ग्रामरचना’ या पुस्तकात अचूकतेने रेखाटलेले आहे .हे चित्र बदलावे आणि शेतकरी सुखी व्हावा ,यासाठी अपेक्षित साधना कोणती ? याचेही त्यांनी दिग्दर्शन केले आहे. त्यांची विपुल ग्रंथरचना पाहून  कोणालाही विस्मय वाटेल.त्यांचे शतपत्रे,’ निबंधसंग्रह ‘आणि ‘स्वाध्याय’ हे ग्रंथ अधिक प्रसिद्धीला आले.

अनेक अविवाहित,विधवा  स्त्रिया पोटचे गोळे उकिरड्यावर टाकत किंवा गळा दाबून ठार करीत .अनावर देहधर्मापोटी घडणारा अनाचार ,निष्पाप जीवाचे हत्याकांड घडवून आणत असे .गोपाळरावांनी नाशिक, पंढरपुरासारख्या नगरात अनाथ बालकाश्रम काढून बालगोपाळांची होरपळ थांबवली. गोपाळरावांच्या नसानसात आणि प्रत्येक श्वासात लोकहिताचाच विचार होता.

इ.स.च्या एकोणिसाव्या शतकात होऊन गेलेले मराठी पत्रकार, समाजसुधारक व इतिहासलेखक म्हणून ते प्रसिद्ध  होते.’ प्रभाकर ‘ साप्ताहिकाचे ते संपादक होते. वर्तमानपत्रात लिहिलेल्या एका ‘शतपत्रांचा इत्यर्थ‘ मथळ्याच्या पत्रात त्यांनी सुधारक विचारांच्या  लेखनाचा हेतू स्पष्ट केला आहे. मुळात संख्येने १०० असलेल्या या निबंधांत त्यांनी ‘संस्कृतविद्या‘, पुनर्विवाह‘, पंडितांची योग्यता‘, ‘खरा धर्म करण्याची आवश्यकता‘, ‘पुनर्विवाह आदी सुधारणा‘ ही पाच आणि अधिक तीन अशा आठ निबंधांची भर घातली.

लोकहितवादींनी समाजहिताला प्राधान्य देऊन सर्वांगीण सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठीचा आग्रह धरला होता.आपल्या समाजातील दोषांवर त्यांनी टीका केली .समाजातील अनिष्ट रूढी व परंपरा दूर करून सर्वांगीण सामाजिक प्रगतीचा विचार सर्वांनी केला पाहिजे, समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन स्वतःची उन्नती साधावी. अंधश्रद्धा  ,भोळ्या समजुती व संकुचित विचार यांचा त्याग करावा असे ते सांगत. भारतीय समाजातील जातीव्यवस्था ही समाजाच्या अधोगतीला कारणीभूत झालेली आहे असे त्यांचे मत होते. म्हणून त्यांचा जातीव्यवस्था, वर्णभेद याला विरोध होता. उच्चवर्णीयांनी आपल्या वर्णश्रेष्ठत्वाच्या कल्पनांचा त्याग करून देशहितासाठी नव्या आचार विचारांचा अंगीकार करावा असे त्यांनी म्हटले होते. लोकहितवादींनी बालविवाह, हुंडा, बहुपत्नीत्वाची पद्धती, अशा अनिष्ट प्रथांवर टीका केली. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार मिळाले पाहिजेत. त्यांना शिक्षण व विवाह याबाबत स्वातंत्र्य असावे विधवांना पुनर्विवाह करण्याचा अधिकार असावा, असे विचार त्यांनी स्पष्टपणे मांडले होते. सुधारणावादाचा विचार मांडणारे आणि स्वकियांवर प्रखरपणे टीका करणारे, त्यांचे दोष त्यांच्या लक्षात आणून देणारे तत्कालीन सुधारकामध्ये महत्त्वाचे सुधारक म्हणजे गोपाळ हरी देशमुख हे होत. समाजाचे उन्नती झाली पाहिजे आणि त्यासाठी संघटितपणे सर्वांनी प्रयत्न करावेत असे त्यांना वाटत होते. शिक्षण हे त्यासाठी महत्त्वाचे माध्यम असले पाहिजे, सामाजिक भेद दूर करून समाजामध्ये ऐक्य निर्माण व्हावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आपल्या लिखाणातून त्यांनी समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केला.. तत्कालीन सनातनी समाजाला उद्बोधन करताना त्यांनी समाजाची करीला गरज लक्षात आणून दिली अशा या सामाजिक सुधारणेच्या काळामध्ये लोकहितवादींनी समाजाला योग्य दिशा देण्याचं कार्य केलं

लोकांकडून कृपालोभाची अपेक्षा बाळगणारे गोपाळ हरी देशमुख लोक निंदेचे आघात सहन करीत लोकहिताची वार्ता करीत राहिले. आजही या भूमीला असे लोकहितवादी हवे आहेत.

अशा या थोर समाज सुधारक गोपाळराव देशमुख यांचा ९ आॅक्टोबर १८९२ रोजी निधन झाले.

लेखन –  डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर

Leave a Comment